धांदरफळ बुद्रुक येथील विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
धांदरफळ बुद्रुक येथील विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा
आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील ऐतिहासिक व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठोबा मंदिराला अखेर ‘क’ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांनी या मंदिरास ‘क’ प्रवर्गाचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा जाहीर केला. त्यामुळे आता या मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
धांदरफळ बुद्रुक गावासह परिसरातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र आतापर्यंत मंदिराच्या विकासासाठी आवश्यक शासकीय निधी व सुविधा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत होत्या. या मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आता मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज व्यवस्था, दर्शन रांगा तसेच अन्य आवश्यक विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.
या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. धांदरफळ बुद्रुक ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



