ताज्या घडामोडी

कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – माजी कृषिमंत्री थोरात अमृतवाहिनीत कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचा शुभारंभ


कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – माजी कृषिमंत्री थोरात

अमृतवाहिनीत कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचा शुभारंभ

संगमनेर ( प्रतिनिधी )

कृषी क्षेत्र हे मोठे व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीसाठी मोठ्या संधी आहे. कृषी क्षेत्रातील माहितीसाठी कळस कृषी प्रदर्शन हे राज्यात लोकप्रिय ठरले असून अमृतवाहिनीतील या कृषी प्रदर्शनातून नवीन व अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे, प्रदर्शनाचे प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पा.घुले, सौ.शरयूताई देशमुख, लक्ष्मणराव कुटे, कैलासराव वाकचौरे, डॉ.मैथिलीताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, ॲड.के.डी.धुमाळ,संपतराव डोंगरे,रामहरी कातोरे, अजय फटांगरे,नवनाथ आरगडे,आर.बी.राहणे, संदीप वाकचौरे,नामदेव मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ, डॉ.एम.ए.व्यंकटेश, प्रा.जी.बी.बाचकर, हिंदुस्तान फीड लिमिटेडचे एमडी मुरलीधर जगताप थर्मोफिसर कंपनीचे जगजीतसिंग यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी बोलताना माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कळस येथील युवकांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानात बाबत जनजागृती व्हावी याकरता नऊ वर्षांपूर्वी प्रयोग केला आणि तो मोठा यशस्वी झाला. आज कळस कृषी प्रदर्शन हे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ठरले आहे.या प्रदर्शनासाठी मोठे कष्ट असून मागील सहा महिन्यापासून येथे प्रात्यक्षिक प्लॉट सह कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानासाठी काम सुरू आहे.

अकोले व संगमनेर तालुका कायम एक असून बंधू भावाचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. अमृतवाहिनी हे गुणवत्तेचे भाग्यवान नाव असून प्रवेशाच्या वेळी शासकीय महाविद्यालयानंतर अमृतवाहिनीसाठी विद्यार्थी प्राधान्य देतात. देशातील उच्च दर्जाचे महाविद्यालय येथे सुरू होऊन आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी देश व विदेशात कार्यरत व्हावे हा यामागचा उद्देश आहे. खरे तर कृषी कॉलेज यापूर्वी आपण तालुक्यात दिले त्यामधून मुलांचे कल्याणच होणार आहे. आगामी काळात सुद्धा कृषी क्षेत्रात मोठे बदल होणार असून याकरता कुशल तंत्रज्ञ या महाविद्यालयातून निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करताना या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्र शैक्षणिक याचबरोबर दूध व्यवसाय यांच्या सह विविध क्षेत्रांची माहिती दिली जाणार आहे. हॉलंड येथून आणलेले ट्युलिप गार्डन हे मोठे आकर्षण केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, कृषी क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली असून त्यामुळे आज भारत अन्नधान्य क्षेत्रामध्ये सामर्थ्यवान देश झाला आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी पंढरपूर जसे तीर्थक्षेत्र आहे तसेच कृषी क्षेत्रासाठी कृषी प्रदर्शन क्षेत्र व्हावे असे सांगताना कृषी क्षेत्रातील बदल स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये यामधून नवीन मानसिकता होईल असे ते म्हणाले.

तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दुधाचा तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. दूध व्यवसायाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण केली असून या प्रदर्शनामध्ये राज्यातून आणि राज्याच्या बाहेरून सुमारे 200 विविध प्रकारच्या गाई या प्रदर्शनामध्ये आल्या आहेत. या संकरित गाईंचा अभ्यास शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सागर वाकचौरे यांनी आभार मानले.

यावेळी शेतकरी महिला युवक यांच्यासह अमृतवाहिनीतील शिक्षक विद्यार्थी व वेल्हाळे आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

लेझीम पथक व टाळ मृदंगाच्या महिला पथकाच्या स्वागताने लक्ष वेधले

कृषी महाविद्यालयाच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात व सर्व मान्यवरांचे स्वागत करताना महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबी रंगाच्या साड्या व फेटे बांधून लेझीम पथक व टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा केलेला गजर हा संस्मरणीय ठरला. या कृषी दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते यांचे व्यासपीठाकडे आगमन झाले त्यानंतर हवेत कृषी प्रदर्शनाचे फुगे सोडून ढोल ताशांच्या गजरामध्ये उद्घाटन करण्यात आले.

40 एकर परिसरामध्ये विविध स्टॉलसह कृषी प्रात्यक्षिक

थोरात कृषी महाविद्यालयाच्या 40 एकरच्या परिसरामध्ये शैक्षणिक प्रदर्शन, कृषी औद्योगिक प्रदर्शन, फूड स्टॉल, याचबरोबर 69 पिकांच्या 350 जाती असून पाच एकर परिसरामध्ये झेंडू, गहू, हरभरा,मका,सोयाबीन,गुलाब,कारले यांसह विविध पिकांचे उभे केलेले प्लॉट हे लक्षवेधी ठरणारे आहे सर्व महिला व शालेय विद्यार्थ्यांकरता हे कृषी प्रदर्शन मोफत खुले करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *