ताज्या घडामोडी

*नाशिकमध्ये १० जानेवारीपासून रंगणार ‘४ थे सह्याद्री मित्र संमेलन’* ——————————– *गड-किल्ले आणि निसर्ग संवर्धनाचा होणार जागर : अ‍ॅड. नितीन ठाकरे*


*नाशिकमध्ये १० जानेवारीपासून रंगणार ‘४ थे सह्याद्री मित्र संमेलन’*

——————————–

*गड-किल्ले आणि निसर्ग संवर्धनाचा होणार जागर : अ‍ॅड. नितीन ठाकरे*

——————————–

*नाशिक :*

सह्याद्रीची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय ओळख जपण्यासाठी, तसेच जबाबदार भटकंतीची संस्कृती रुजवण्यासाठी शनिवार दि. १० आणि रविवार ११ जानेवारी २०२६ रोजी नाशिकमध्ये ‘४ थे सह्याद्री मित्र संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कॉलेज रोडवरील गुरूदक्षिणा ऑडिटोरियम येथे सकाळी ९.३० ते ५.०० या वेळेत हे संमेलन पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मविप्रच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आर्किटेक्ट संजय पाटील यांच्यासह संमेलन आयोजन समितीचे संजय अमृतकर, दिलीप गिते, संदीप काकड, केशव उगले, किरण वाकचौरे, आनंद बोरा, रत्नाकर भामरे, गौरव शिरोडे, योगेश बधान उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांच्या यशस्वी परंपरेनंतर यंदा हे चौथे संमेलन होत आहे. वाढती पर्यटनसंख्या आणि मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांवर या संमेलनात मंथन होणार आहे. संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, सह्याद्री ही केवळ पर्वतरांग नसून आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान वारसा आहे. या चळवळीने राज्यातील विखुरलेल्या ट्रेकर्सना आणि दुर्गप्रेमींना एका छताखाली आणण्याचे मोठे कार्य केले आहे.

 

*कोट*

*सह्याद्रीचा वारसा जपूया : आर्किटेक्ट संजय पाटील*

निसर्गाशी संवेदनशील नाते निर्माण करणे आणि पुढील पिढीमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची गरज आहे. नाशिकला लाभलेला सह्याद्रीचा वारसा जपला पाहिजे. हा समृद्ध वारसा अनुभवण्यासाठी नाशिकच्या निसर्गप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे विद्यमान स्वागताध्यक्ष आर्किटेक्ट संजय पाटील यांनी संमेलनाचा आढावा घेताना सांगितले.

Advertisement

*चौकट*

*प्रमुख पुरस्कारांनी दिग्गजांचा होणार गौरव*

या संमेलनात सह्याद्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सह्याद्री रत्न पुरस्कार : हिरा पंडित सर (साहित्यिक व सामाजिक योगदान)

वाटाड्या ऑफ द इयर: राजेश बर्गे, ट्रेकर ऑफ द इयर: अमोल तळेकर, स्पोर्ट्स क्लाईंबर ऑफ द इयर: धृवी पडवळ, रेस्क्यू टिम ऑफ द इयर : सह्यगिरी रेस्क्यू टिम, मुरबाड, दुर्गसंवर्धन टिम पुरस्कार: राजा छत्रपती परिवार संस्था, महाराष्ट्र, विशेष कामगिरी: इंडियन कॅडेट्स (छत्रपती संभाजीनगर) व ‘भटक्या’ मनोज कापडे.

*चौकट*

*विविध स्पर्धा व उपक्रम*

संमेलनात ‘वारसा दस्तऐवज स्पर्धा’ पार पडली, ज्यामध्ये साईप्रकाश बेलसरे, संकेत कारेकर आणि डॉ. अजय कापडणीस यांनी यश मिळवले. तसेच ‘गडकोट स्वच्छता अभियान स्पर्धेत’ रतनगड, हरिश्चंद्रगड-कळसुबाई आणि अंजनेरी संयुक्त समित्यांना गौरविण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या सोहळ्यात प्रेरणादायी अनुभव कथन, सुरक्षित ट्रेकिंगवर चर्चा, छायाचित्र प्रदर्शन आणि वैचारिक मंथन असे विविध कार्यक्रम होतील.

 *चौकट*

*नाशिककरांनी सहभागी व्हावे*

निसर्गप्रेमी, तरुण पिढी आणि अभ्यासकांनी या चळवळीत सहभागी होऊन सह्याद्रीच्या जतन व संवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहन सह्याद्री मित्र संमेलन, नाशिक या आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

———————

*फोटो कॅप्शन*

*नाशिक : मविप्रच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, स्वागताध्यक्ष आर्किटेक्ट संजय पाटील यांच्यासह संमेलन आयोजन समितीचे संजय अमृतकर, संदीप काकड, दिलीप गिते, केशव उगले, किरण वाकचौरे.*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *