क्राईम

गुन्हेगारांचा उन्माद! पोलिसांवर कोयत्याने हल्ला, हवेत गोळीबार; कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या जीवावर उठले गुंड


 गुन्हेगारांचा उन्माद! पोलिसांवर कोयत्याने हल्ला, हवेत गोळीबार;
कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या जीवावर उठले गुंड

श्रीरामपूर | प्रतिनिधी

गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना श्रीरामपूर शहरातील इराणी गल्ली येथे मंगळवारी दुपारी घडली. पाहिजे आरोपीने जमाव जमवून पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या गुन्हे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मुकेश शिवाजी मोहारे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ/2933 अजय विलास सरजिने, पोहेकाँ/1816 संतोष जाधव, पोकाँ/390 प्रितम सानप, पोकाँ/2145 प्रकाश जाधव, पोकाँ/3602 किरण मदने हे अधिकारी-कर्मचारी गु. र. नं. 291/2025 बीएनएस कलम 319 (2), 3 (5) नुसार दाखल गुन्ह्यातील कुख्यात पाहिजे आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) याच्या शोधासाठी श्रीरामपूर येथे आले होते.
दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता हे पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. स्थानिक मदतीसाठी पोकाँ सुशिल होलगीर व महिला पोना सविता उंदरे यांना सोबत देण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथक आरोपीच्या घरावर धडकले.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी आयद सय्यद याने घराच्या पाठीमागील दरवाजातून पलायन केले. पाठलाग करत असताना पोकाँ किरण मदने यांनी आरोपीस पकडले. मात्र, आरोपीने पोलिसांशी झटापट करत गल्लीत जमलेल्या 30 ते 40 जणांना उद्देशून, “पथर फेका… या साल्यांवर काहीच होणार नाही!” असे खुलेआम चिथावणीखोर उद्गार काढले.
त्यावर जमावातील 5 ते 7 गुंडांनी पोलिसांवर हल्ला चढवून आरोपीला सोडविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आरोपी आयद याने “झेरु, मार याला… पोलिस काही करू शकणार नाहीत!” अशी थेट हत्या करण्याची चिथावणी दिली. त्याच क्षणी ‘झेरु’ नावाच्या तरुणाने हातातील लोखंडी कोयत्याने पोकाँ किरण मदने यांच्या डोक्यावर वार केला. मात्र, त्यांनी हात पुढे केल्याने कोयत्याचा घाव त्यांच्या उजव्या हातावर बसला व ते गंभीर जखमी झाले.
परिस्थिती पूर्णतः बिघडत पोलिसांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पोउनि. मुकेश मोहारे यांनी शासकीय पिस्तुलीतून हवेत एक गोळी झाडत जमावाला पांगवले. गोळीबार होताच गल्ली रणांगणासारखी झाली व जमाव पळून गेला. तत्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी बळाचा वापर करून मुख्य आरोपी आयद बाबुलाल सय्यद याला ताब्यात घेतले असून जखमी पोकाँ किरण मदने यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीस मदत करणारा ‘झेरु’ (पूर्ण नाव अज्ञात) व इतर 5 ते 7 हल्लेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
शासकीय कामात अडथळा, पोलिसांवर प्राणघातक हल्ला, जमाव जमवून दहशत माजवणे, हत्या करण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे “गुन्हेगारांचा माज वाढतोय का?” असा थेट प्रश्न उपस्थित झाला असून, पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सामान्य नागरिक किती सुरक्षित, असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *