ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
लक्ष्मी वाढेकर/खामगाव,बुलढाणा :
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाचे प्रचंड संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशी यांसह सर्वच हंगामी पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याऐवजी सरकार केवळ आश्वासनांवरच समाधान मानत असल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत आहे.
राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले असतानाही सरकारकडून पंचनाम्याची प्रक्रिया ढिम्म सुरू असल्याची खंत व्यक्त होत आहे. कोरड्या आश्वासनांनी शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही. ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
दरम्यान, अस्मानी-सुलतानी संकटात पिके पूर्णपणे जमिनीत गाडली गेली आहेत. तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम वा मदतीचे पैसे जमा झालेले नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर झाला असून सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
“भारत हा कृषिप्रधान देश आहे, आणि शेतकरी हा त्याचा पाठीचा कणा आहे. म्हणूनच सरकारने आता तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना उभारी द्यावी, अन्यथा देशाची प्रगती खुंटेल,” असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.