क्राईम

एका गोळीबाराने  कायदा-सुव्यवस्था ढासळली का? माध्यमांनो! गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण नकोच…!


एका गोळीबाराने  कायदा-सुव्यवस्था ढासळली का?
माध्यमांनो! गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण नकोच…!
प्रभू रामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेले क्षेत्र म्हणून सुपरिचित पंचवटी भागात सध्या कायदा सुव्यवस्था ढासळल्याबाबत काही मंडळींना प्रचंड चिंता लागली आहे.कालपर्यंत अगदी राम राज्य नांदत असलेल्या या भागात खांदे पालट झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या काळात सक्रिय असलेल्या मात्र महिनाभरा पूर्वी  पर्यंत मातीत गाडल्या गेलेल्या राक्षसी प्रवृत्ती अचानक बाहेर पडल्या. आणि त्या राक्षसी प्रवृत्तींनी कायदा सुव्यवस्था गिळं कृत केली, असा काहीसा प्रचार पंचवटीच्या संदर्भात सुरु आहे.
सन २०१५ पासून सुरु असलेल्या सुंदोपसुंदीच्या गुन्हेगारी कारवायांचा एक अध्याय म्हणून गोळीबार होतो आणि त्या गोळीबाराचे सूत्र जणू काही पंचवटी पोलिसांनीच हलवली अशा अविर्भावात पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.
एका घटनेवरून संपूर्ण कायदा-सुव्यवस्थेला तडा गेला, असे सरसकट मत व्यक्त केले जात आहे.हा प्रकार  गंभीर गुन्हा आहेच, पण त्यामागची कारणमीमांसा लक्षात घेतली पाहिजे. बहुतांश वेळा हे गुन्हे वैयक्तिक कारणांमधून कौटुंबिक वाद, मालमत्तेचे भांडण, व्यवसायातील मतभेद किंवा व्यक्तिगत शत्रुत्वातून  घडतात.आणि पंचवटी सारख्या संवेदनशील पोलिस ठाण्यासाठी ही पहिला घटना नाही. या आधी देखील म्हणजे टीकाकारांनी सांगितलेल्या महिनाभराच्या आधी देखील दर दोन तिन दिवसाआड या हद्दीत त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर रक्ताचे पाट वाहिले आहेत. ही परंपरा पंचवटीसाठी जुनीच आहे.कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिस यंत्रणेचेच काम आहे, याबाबत शंका उपस्थित करायची नाही. मात्र कायदा सुव्यवस्था ढासळली असा दावा करण्याआधी कायदा सुव्यवस्था अबाधित असणे म्हणजे काय? याची व्याख्या होणे जरुरी आहे. सामाजिक शांतता जेंव्हा एनकेन प्रकारे बाधित होते तेंव्हा खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्था ढासळली असे म्हणता येते. या गोळीबाराने या क्षणापर्यंत तरी ती आणीबाणी नाही. याउलट याच हद्दीत यापूर्वी सामाजिक शांतता उध्वस्त करणाऱ्या अनेक घटना घडल्या तेंव्हा कायदा सुव्यवस्था ढासळली नव्हती. इतकेच कशाला गेल्या आठ पंधरा दिवसात शेजारच्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड उघड झालेल्या खुनाचे तीव्र पडसाद उमटले होते. सामाजिक शांतता ढवळून निघाली होती. तेंव्हाही कायदा सुव्यवस्था अबाधित होती. उपनगरमध्ये दोन सख्या भावांचा निर्दयपणे खून करण्यात आला तेंव्हा तर कायदा सुव्यवस्थेचे  कोड कौतुक होते. मग एक गोळीबार पंचवटीची कायदा सुव्यवस्था उद्धवस्त करून गेला. हा निष्कर्ष व्यक्ती द्वेषाचा दर्प पसरवत तर नाही ना? अशी शंका येतेच येते.
पोलिस प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये, गल्लीत किंवा मनात डोकावून नियंत्रण ठेवू शकत नाहीत. कायदा-सुव्यवस्था ढासळली असे म्हणणे म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांचा अतिरेक, संघटित गुन्हेगारीचे वर्चस्व, समाजात भीतीचे वातावरण व नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होणे. एकेकट्या वैयक्तिक वादातून घडलेल्या गुन्ह्याला त्या पातळीवर नेणे वस्तुनिष्ठ ठरणार नाही.
पोलिस यंत्रणेकडून अपेक्षा मात्र नक्कीच आहे की, अशा गुन्ह्यांचा तात्काळ तपास व्हावा, आरोपी जेरबंद व्हावेत आणि समाजात कायदा सर्वोच्च असल्याचा संदेश द्यावा. गुन्हे थांबविणे हे जितके समाजाच्या मूल्यांवर आणि व्यक्तीच्या संस्कारांवर अवलंबून आहे, तितकेच न्यायप्रक्रियेतल्या वेगावर आणि परिणामकारकतेवरही.
म्हणूनच, एकेका  घटनेवरून “कायदा-सुव्यवस्था कोलमडली” असा निष्कर्ष काढण्याऐवजी समाज, पोलीस आणि न्याययंत्रणा या तिन्ही घटकांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणे आवश्यक आहे.
खूनासारख्या घटना बहुतांशवेळा वैयक्तिक वैर, कौटुंबिक कलह, व्यवसायिक वाद किंवा इतर खाजगी कारणांनी घडतात. त्या वेळी पोलिसांची जबाबदारी म्हणजे गुन्हा झाल्यानंतर तात्काळ तपास करून आरोपीला पकडणे, पुरावे गोळा करणे आणि न्यायप्रक्रियेला पुढे नेणे.
कायदा-सुव्यवस्था ढासळली असे म्हणणे म्हणजे गुन्हे अनियंत्रित पद्धतीने, संघटित स्वरूपात आणि सतत वाढत्या प्रमाणात घडत असणे. एक-एकट्या खुनाच्या घटनेवरून असा निष्कर्ष काढणे वस्तुनिष्ठ नाही.
थोडक्यात व्यक्तिगत कारणांतून झालेले  गुन्हे वेगळे आणि सार्वजनिक शांतता व सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे गुन्हे वेगळे.
“गुन्हेगारीचे खापर – पोलिसांवरच का?”
पंचवटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहर हादरलं, हे खरं आहे. पण प्रत्येक गोळीबार, अशा प्रकारची प्रत्येक घटना  थेट पोलिस निरीक्षकांच्या नाकर्तेपणावर टाकणे हा सरळसरळ अन्याय आहे.
 पंचवटीत यापूर्वीही वारंवार अशाच घटना घडल्या आहेत. मग त्यावेळी पोलिस निरीक्षकांना “क्लीन चिट” देऊन, आज अचानक गजेंद्र पाटील यांच्यावर दोषारोप का?
हे केवळ व्यक्ती-प्रेम वा व्यक्ती-द्वेषाचं राजकारण नाही का?
 कायदा-सुव्यवस्था ही एक सतत चालणारी लढाई आहे. गुन्हेगार टोळ्या, अवैध धंदे, राजकीय आश्रय – या सगळ्यांच्या संगनमतामुळे समाजात गुन्हेगारी डोकं वर काढते. त्याला थोपवणं ही प्रक्रिया आहे; एखाद्या अधिकाऱ्याला बळीचा बकरा करून नाही. गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी मदत करा. त्यांना आश्रय, राजाश्रय मिळणार नाही याची खबरदारी घ्या  पोलिसांवर खापर फोडू नका.
प्रशासन, जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी पोलिसांशी खांद्याला खांदा लावून उभं राहिलं तरच पंचवटी सुरक्षित होईल. अन्यथा केवळ एका अधिकाऱ्यावर ठपका ठेवून आम्ही आपल्या जबाबदारीतून सुटू शकत  नाही.
समाज आणि प्रसार माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. आपल्या वृत्तांकनातून गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घ्या.
पोलिस उत्तम काम करत असतील तर त्यांना पाठिंबा द्या; पोलिसांवर नाजूक आरोपांपूर्वी योग्य चौकशी होऊ द्या. एखाद्या अधिकाऱ्याला बळीचा बकरा करून जनविश्वास कमी करणे, प्रतिष्ठा उध्वस्त करणे हे सोपे आणि धोकादायक दोन्ही आहे. गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी प्रशासनाने, जनप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे — आश्रयदेणाऱ्यांवर तीव्र नजर ठेवा, आर्थिक प्रवाह आणि आस्थापनं तपासा, आणि निकषांवरून कारवाई करा.
समाज आणि माध्यमे यांची भूमिका निर्णायक आहे. वृत्तांकनातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ देऊ नका; अहितकारक पद्धतीने हिंमत वाढवणारे किंवा गुन्हेगारांना शोकेस करणारे स्वरूप टाळा. त्याचप्रमाणे, कायदा-व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांनीही जागरूक राहून माहिती द्यावी, सहकार्य करावे आणि न्याय प्रक्रियेवर दबाव न आणता योग्य मार्गांनी आवाज उठवावा.
पंचवटीसारख्या पवित्र  क्षेत्रांची खरी सुरक्षितता ही ‘एकत्रित जबाबदारीनेच साध्य  होईल प्रशासन, नागरी समाज आणि माध्यमे जर खांद्याला खांदा लावतील तरच गुन्हेगारीची मुळे उध्वस्त करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *