संपादकीय :”त्या” व्हायरल मेसेजचा अर्थ -अन्वयार्थ! खुर्च्या बदलतात, चेहरे बदलतात, पण धैर्यवान माणूस कधीच बदलत नाही ; तो इतिहास घडवतो, लाचारीला आव्हान देत राहतो….
संपादकीय :
“त्या” व्हायरल मेसेजचा अर्थ -अन्वयार्थ!
खुर्च्या बदलतात, चेहरे बदलतात,
पण धैर्यवान माणूस कधीच बदलत नाही ;
तो इतिहास घडवतो, लाचारीला आव्हान देत राहतो….
वीस वर्षांची कहाणी, तेवीस बदल्यांची ओळख,
प्रामाणिकतेवर, सत्ताधाऱ्यांची कुरघोडी
सत्य बोलणं हा गुन्हा, प्रामाणिक राहणं ही शिक्षा,
म्हणूनच न झुकणाऱ्याला मिळते वारंवार हद्दपारीची दिक्षा.
सत्ता म्हणते ; “झुक रे!”, तो म्हणतो, “नाही!”,
भ्रष्टाचाराच्या साम्राज्यात हा थेट वीजेसारखा कोसळतोय
प्रत्येक बदली म्हणजे एका माफियाला दिलेलं उत्तर,
प्रत्येक आदेश म्हणजे जनतेसाठी जपलेला विजयमंत्र.
तो डगमगत नाही, न वाकतो कुठे,
कारण त्याच्या नसांमध्ये सचोटीचं रक्त सळसळते.
त्याच्या डोळ्यात लोकशाहीची ज्योत,
त्याच्या शब्दांत न्यायाचा नाद,
आणि म्हणूनच सत्तेला तो सहन होत नाही ;
कारण तो जनतेचा अधिकारी आहे, सत्तेचा नोकर नाही!
तेवीस बदल्या हा पराभव नाही,
तो त्याच्या अंगातील वीरश्रीचा सन्मान आहे;
ही हार आहे फक्त
भ्रष्ट राजकारणाची, लाचार नोकरशाहीची
आणि तोंड बंद ठेवणाऱ्या विवेकाच्या अपमानाची!
“तो अधिकारी नाही, तो जनतेच्या मनातला उठाव आहे,
त्याचा आवाज बंद करता येत नाही —
तोच खरा लोकशाहीचा शंखनाद आहे!”
………..
रोखठोक : “२३ बदल्या : भ्रष्ट राजकारणाची हार, प्रामाणिकपणाचे सन्मानचिन्ह?
प्रशासनात प्रामाणिकपणे काम करणं हा गुन्हा आहे का?
कारण जेव्हा एखादा अधिकारी खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार, माफिया, राजकीय हस्तक्षेप यांच्याविरोधात उभा राहतो, तेव्हा त्याला पदावरून दूर करणं, वारंवार बदली करणं ही आजची राजकीय पद्धत झाली आहे.
२० वर्षांत २३ वेळा बदली झालेला हा अधिकारी याच व्यवस्थेचं जिवंत उदाहरण आहे.
कोणत्याही सरकारने, कोणत्याही सत्ताधारी पक्षाने त्याला पचवून घेतलं नाही. कारण तो त्यांच्या हुकमतीला न जुमानता फक्त कायद्याप्रमाणे चालला.
राजकारण्यांना ‘हो’ करणारे अधिकारी हवेत, पण ‘का?’ विचारणारा अधिकारी मात्र डोळ्यात खुपतो.
म्हणूनच बदली ही शिक्षा म्हणून केली जाते.
पण खरी शिक्षा कुणाला? त्या अधिकाऱ्याला की सर्वसामान्य जनतेला?
वारंवार बदली करून सत्ताधारी भ्रष्टाचारावर झाकण ठेवतात.
आणि अशा बदल्या म्हणजे प्रामाणिक अधिकाऱ्याच्या अंगावरची सन्मानचिन्हं असतात.
म्हणूनच आज जनता म्हणते –
“यांना एकदा निवडणूक आयोगाचं अध्यक्षपद द्या, मग कळेल लोकशाही कशी बळकट होते!”
हे वाक्य जनतेच्या मनातील उद्रेक आहे. कारण लोकांना माहिती आहे, जो अधिकारी सत्तेच्या दबावाला झुकत नाही, तोच खरी लोकशाही वाचवू शकतो.
त्यामुळे २० वर्षांत २३ बदल्या ही त्या अधिकाऱ्याची हार नसून भ्रष्ट व्यवस्थेची हार आहे.
हा अधिकारी सतत बदलीवर असतो कारण तर भ्रष्ट सत्ताधारी त्याला सहन करू शकत नाहीत.
प्रामाणिकपणा ही या व्यवस्थेतली सर्वात मोठी चूक ठरते.
भ्रष्ट, मवाळ, होकारार्थी अधिकारी सुखाने जगतो.
आणि जो रोखठोक “नाही” म्हणतो, त्याला बदल्यांचा वार झेलावा लागतो.
प्रत्येक बदली म्हणजे त्याने दिलेल्या एका माफियाच्या, एका भ्रष्ट मंत्र्याच्या, एका काळ्या धंद्याच्या विरोधातील बेधडक उत्तर आहे.
हाच अधिकारी एकदा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष झाला, तर संपूर्ण व्यवस्था हलून जाईल.
तेव्हा खरी लोकशाही काय असते, हे सत्ताधाऱ्यांना समजेल.
त्यामुळे २३ बदल्या म्हणजे त्या अधिकाऱ्याची हार नाही.
ही हार आहे, भ्रष्ट व्यवस्थेची, लाचार राजकारणाची आणि तोंड बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची!
एव्हढाच काय तो संदेश आहे त्या व्हायरल मेसेजचा..
-कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie



