भुजबळ साहेब! खरोखर अभिनंदनास पात्र आहात!! ओबीसीसाठी छगन भुजबळ सरसावले; मराठा मंत्री-नेत्यांना लाज वाटते का?
भुजबळ साहेब! खरोखर अभिनंदनास पात्र आहात!!
ओबीसीसाठी छगन भुजबळ सरसावले;
मराठा मंत्री-नेत्यांना लाज वाटते का?
मराठा समाज गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर आहे. आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटीलांसारखे लढवय्ये उपोषणावर बसतात, लाखोंची गर्दी पावसात-उन्हात आंदोलनाला सामील होते. पण राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा मंत्री-नेते मात्र मौन बाळगून आहेत.
दुसरीकडे, छगन भुजबळ मात्र ओबीसी समाजासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसतात. ओबीसी नेत्यांची मुंबईत बोलावलेली बैठक हे त्याचेच द्योतक आहे त्यांनी आपला समाज वाचवण्यासाठी पुढाकार घेतला, समाजाच्या मागण्या दणक्यात मांडल्या.ते त्यांचे कर्तव्यच आहे. ते कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत आहेत, म्हणूनच ते अभिनंदनास पात्र ठरतात.
मग प्रश्न असा आहे की,
मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री नेते काय करतात?
ते का सरसावत नाहीत?समाजाप्रती या मंडळींचे काहीच कर्तव्य नाही का?आरक्षणासाठी धडपडणाऱ्या समाजाप्रती त्यांना लाज वाटत नाही का?
राजकारणात खुर्ची आणि सत्तेची मोहिनी जास्त महत्त्वाची ठरतेय की समाजाची लढाई?
भुजबळ यांनी किमान आपला समाज वाचवण्यासाठी लढाई उभी केली. मग मराठा नेत्यांना गप्प राहून काय सिद्ध करायचं आहे?
राजकीय पार्श्वभूमी :-
कुणी कितीही नाकारले तरी महाराष्ट्राची राजकीय पार्श्वभूमी नेहमीच जातिवादी समीकरणांनी रंगलेली आहे नाकारता येत नाही.. कुणीही उघडपणे मान्य करो वा न करो, पण राजकीय अंकगणितात जात हेच मुख्य सूत्र असतं.त्याच सूत्राचा वापर करून निवडणुकीतील विजयाचे समीकरण सोडवले जाते.छगन भुजबळ देखील त्याच सूत्राचा आधार घेऊन विजयाचे गणीत सोडवत आले आहेत. आणि म्हणूनच
ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ रणकंदन करतात, सभागृहात जिवाच्या आकांताने ओरडतात, शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी झगडतात. हे पाहून कौतुकही वाटतं. किमान कुणीतरी आपल्या समाजासाठी बिनधास्त उभं राहतंय.
मग मराठा समाजाचे नेते कुठे आहेत?
आरक्षणासाठी आपली लेकरं आक्रोश करताहेत,मरणाशी झुंज देतायत, आई-बहीणी आसवे ढाळतायत. हजारो वर्षांचा इतिहास, शौर्य, पराक्रम सांगणारा समाज आज उपाशीपोटी उपोषणावर बसतोय, पोलिसांच्या लाठ्या खातोय. पण, त्या समाजातूनच वर आलेले मंत्री मात्र मौन आरती गातायत.
छगन भुजबळ आपल्या समाजासाठी छातीठोक लढा देऊ शकतात, मग मराठा नेते कुणाच्या भीतीने गप्प आहेत? की लाजेने त्यांचे ओठ गप्प बसले आहेत?
मराठा नेत्यांना विचारावंसं वाटतं —
खुर्च्या मोठ्या की जात?
सत्ता प्रिय की समाज?
पद महत्त्वाचं की पोटाची आग?
आज जर तुम्ही गप्प राहिलात, उद्याची पिढी तुमच्याकडे बोटं दाखवून म्हणेल,
“भुजबळ आपल्या समाजासाठी सरसावले …
पण मराठा नेते मात्र आपल्याच सावलीला घाबरले!”
खुर्चीसाठी मौन :-
महाराष्ट्राच्या राजकारणात एक सत्य पुन्हा अधोरेखित झालंय ज्याला आपल्या समाजाची काळजी आहे, तो रस्त्यावर उतरतो; ज्याला फक्त पद आणि खुर्ची हवी आहे, तो मौन पाळतो.
छगन भुजबळ सरसावले. कारण त्यांच्या रक्तात अजून समाजाबद्दलची तळमळ जिवंत आहे. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं – “ओबीसी आरक्षणावर कुणी गदा आणू नये!” — हा आवाज दणक्यात दुमदुमला.
पण मराठा समाजाचे नेते?
ते कुठे?
तेल लावून केस विंचरतात, मखमली गादीवर बसतात, मंत्रिपदाच्या शपथगृहात फोटो काढून समाधानी होतात.
समाज रडतोय आणि हे नेते मात्र दिल्ली-मुंबईच्या राजकीय गणितात बुडालेत.
मराठा समाजाच्या हजारो वर्षांच्या शौर्याला हे सत्ताधारी नेते आज मौनामुळे खजिल करून ठेवतायत.
म्हणजे एवढ्या गर्दीच्या, एवढ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकही मंत्री, एकही मोठा नेता छातीठोक म्हणू शकला नाही, “हो, आम्ही आमच्या समाजासाठी ठाम उभे आहोत.”
छगन भुजबळ म्हणतात —
“ओबीसी माझं कर्तव्य, माझं देणं!”
पण मराठा नेते म्हणतात —
“सत्ता आमची माता, खुर्ची आमची पितामह!”
म्हणूनच समाज विचारतोय,
भुजबळ समाजासाठी लढताय,
मग मराठा मंत्री नेत्यांना कसली भीती?
की लाज लपवण्यासाठी मुखवटा घालून बसलात?
छगन भुजबळ आपल्या समाजासाठी आक्रमक आहेत.
आणि मराठा मंत्री-नेते आपल्या समाजासाठी गप्प बसून आरती करतात!
इतिहास नोंद घेईल
भुजबळ सरसावले, लढले.
आणि मराठा नेते?
ते खुर्चीच्या गादीवर बसून… स्वतःच्या सावलीलाही घाबरले.
भुजबळ साहेब, अभिनंदनास पात्र!
“भुजबळ साहेब… आपण अभिनंदनास पात्र आहात!
किमान आपण तरी आपल्या समाजासाठी धडाडीने उभे राहिलात.
आपल्या शेजारी रोज मांडीला मांडी लावून बसलेले मराठा जातीचे मंत्री-नेते पाहा…
त्यांच्या ओठांवर कुलूप, त्यांच्या विवेकावर चाप बसलाय.
ते तुम्हाला टाळ्या मात्र वाजवतात, पण स्वतःच्या समाजासाठी आवाज उठवायला त्यांना लाज वाटते.
भुजबळ साहेब,
कधी मोकळ्या वेळात त्यांना कानात एकदा सांगा –
‘अहो, सत्तेच्या खुर्चीचं गोंद इतकं घट्ट चिकटलंय का की समाजासाठी उठता येत नाही?’
किंवा असं सांगा –
‘मित्रांनो, समाज विसरेल की भुजबळ कोणत्या जातीचा आहे… पण कायम लक्षात ठेवेल की मराठा मंत्री-नेते गप्प का बसले होते!’”
कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie