✍️संपादकीय:- _केवळ शब्द नाहीत, तर असहाय्यतेतून फुलणारा रोष, अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज, आणि समाजाच्या मूकेपणावर ओरडणारी एक अस्वस्थ जाणीव:._ — *एक अनावृत्त पत्र संवेदना ठार झालेल्या व्यवस्थेला!* “तुझी नजर पक्षपाती आहे… तुझा न्याय अंध नाही, तो धादांत खोटा आहे!” ……………………………..
✍️संपादकीय:-
_केवळ शब्द नाहीत, तर असहाय्यतेतून फुलणारा रोष, अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज, आणि समाजाच्या मूकेपणावर ओरडणारी एक अस्वस्थ जाणीव:._
—
*एक अनावृत्त पत्र संवेदना ठार झालेल्या व्यवस्थेला!*
“तुझी नजर पक्षपाती आहे… तुझा न्याय अंध नाही, तो धादांत खोटा आहे!”
……………………………..
हे व्यवस्था,
हे पत्र तुला उद्देशून आहे :—
पण खरंतर हे पत्र तुला उद्देशून नसतं तरी चालेल.
तू वाचणार नाहीस, समजणार नाहीस, आणि मान्य तर अजिबातच करणार नाहीस.
कारण तुझ्या संवेदना आता सरकारी नोटिंगच्या दडपणा खाली ठार मेल्यात.
एका पत्रकाराने फक्त सत्य लिहिलं.
जे घडलं, ते लोकांसमोर मांडलं.
त्यात न कुणाविषयी द्वेष होता,
न कोणाला कमी लेखण्याचा हेतू.
फक्त… वास्तव होतं.
*पण तू काय पाहिलंस?*
त्याने लिहिलेल्या बातमीतही शोधलीस जात.
आणि त्या एका जातीनं तुझं पारडं फिरलं.
तुझ्या सिस्टीमनं लगेच त्याला ‘जातीयवादी ‘ ठरवलं.
एका पत्रकाराची तळमळ , ‘द्वेष’ ठरली.
पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला तू दगड मारलास.
म्हणजे आता सत्य लिहायचं, पण त्या सत्यात कोण येईल याची ‘जात’ आधी पाहायची!
*तू न्याय करतेस की राजकारण?*
आणि दुसरीकडे… तुझ्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावलेली एक मागासवर्गीय महिला, मृत्यूनंतरही न्यायासाठी आसूसली आहे.
ती गरीब होती. मागासवर्गीय होती.
पण आज ती ‘मुक’ आहे… मृत आहे.
तिच्या मरणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना तू पाठीशी घालतेस…
“ते सेवारत होते”, “तेवढी जबाबदारी त्यांची नव्हती”,
“सिस्टीम फेल झाली, व्यक्ती नाही” असं लिहून तू निर्दोष ठरवतेस.
मग आता सांग, तिला वाचवू शकलो नसतो का?
पण तू वाचवलं नाहीस.
तिच्या मृत्यूला तू हातभार लावलास.
आणि तरीही तू शांत आहेस.
पत्रकाराच्या शब्दांवर तू जळतेस, पण तिच्या जगण्या मरण्याविषयी निष्ठुर!
*तुझ्या न्यायाच्या तराजूत विषमता आहे*
सत्य सांगणारा पत्रकार ‘दोषी’
मृत्यू घडवणारा अधिकारी ‘निर्दोष’
*ही कुठली व्यवस्था?*
ही तुझी ‘न्याययंत्रणा’ की ‘सत्तेची गुलामगिरी’?
तुला जात दिसते, जीव नाही
तुला संवेदनशीलता हवी, पण ती अंमलदारांवर लागू नये
तुला मृत्यू फाईलमध्ये हवाय, बातमीपत्रात नाही
हे कसले राज्य?
ही राज्यघटना की व्यवस्थेची शवयात्रा?
*तुला आरशात पाहायची हिंमत नाही!*
तू म्हणतेस ;“आम्ही चौकशी करतो”
पण ती चौकशी आधीच लिहिलेल्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब असते.
तू म्हणतेस ; “न्याय होईल”
पण तो न्याय लोकांच्या मुडद्या मध्ये गाडला जातो..
तू म्हणतेस — “मुक्त पत्रकारिता आवश्यक आहे”
पण तूच पत्रकारांना गद्दार ठरवतेस.
*● शेवटी एकच प्रश्न…*
पत्रकार जर जात पाहून लिहितो, तर तू जात पाहून न्याय देतेस का?
पत्रकार शब्द लिहितो, तू निष्काळजीपणानं प्राण घेतेस –
मग गुन्हेगार कोण?
*हे व्यवस्था,*
तुझं मौन म्हणजे अपराध आहे.
तुझी निवड *Selective outrage* म्हणजे पक्षपातीपणा आहे.
तुझं सत्यावर चालून जाणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे.
तू मूक राहिलीस,
पण आम्ही बोलत राहू,
पत्रकार लिहीत राहील….
ती महिला, जरी आता नसेल,
तरी तिचं मरण तुला प्रत्येक वेळी आठवत राहील….!
*जेव्हा तू पक्षपाती न्याय देशील;*
*तेव्हा आम्ही तुला तुझी लाज विचारू!*
–✍️कुमार कडलग
संपादक
दुनियादारी won’t lie



