वृत्तकथा :हनी ट्रॅप भाग :१ सौंदर्याच्या सापळ्यात अडकला जीवनाचा पासवर्ड
वृत्तकथा :हनी ट्रॅप भाग :१
सौंदर्याच्या सापळ्यात अडकला जीवनाचा पासवर्ड
……………….या प्रकरणातील सारे पात्र काल्पनिक आहेत. घटनाही कल्पनेने रंगवलेली, तथापी आज समाजाची नितिमूल्ये एव्हढी रसातळाला गेली आहेत, की या कथा कल्पनेशी साधर्म्य सांगणारी एखादी घटना आपल्या बाजूलाच आहे, असा भास वाचताना, ऐकताना होऊ शकतो. असे झालेच तर व्यवस्थेला जाब विचारा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. तेव्हाच ही कथा,वृत्तकथा होईल. ………………………………
तो मॉरीशसच्या ऊबदार वातावरणात सायंकाळ मनोहारी मुडमध्ये व्यतीत करीत होता. पेढीतून आलेली कौटुंबिक आर्थिक सुबत्ता, हाय सोसायटीचे पुणेरी संस्कार, आयुष्याची अशी कुठलीच चिंता नाही.तरीही उद्योजकतेची मानसिकता धमण्यांमधून वाहत असल्याने,आहे त्या संपत्तीत आणखी भर घालायची म्हणून व्यवसाय वाढीचे स्वप्न घेऊन विविध शहरात पाय पसरण्याची धडपड सुरु होती. दरम्यानच्या काळात मॉरीशस, थायलंड या दोन देशात त्याने हॉटेल व्यवसायात पाय रोवले होते. पिढीजात संपत्तीची गुंतवणूक करून पैशांची बाग तयार करण्याचे त्याचे उद्धीष्ट होते. त्याच उद्धीष्ठाच्या पूर्ततेसाठी त्याने नाशिक सारख्या विकासाचे पंख फडफडणाऱ्या शहरात पाय ठेवले. आणि चाचपणी सुरु केली.या प्रवासात एक चूक त्याच्या आयुष्याला उध्वस्त करून गेली.
मॉरिशसच्या हॉटेलमधील एका स्पेशल रूमच्या बाल्कनीत स्कॉचची चव चाखत बसला असतांनाच नाशिकमधून एक फोन येतो. ××× पोलिस ठाण्यातून एपीआय ××× ×××× बोलतोय, आपल्याविरुद्ध एका महिलेची तक्रार आहे. मानसिक, शारीरिक छळ, आर्थिक फसवणूक. स्कॉचचा घोट घश्यात, सिगारच्या धुराचे हवेत निर्माण केलेले वर्तुळाकार वलंय क्षणार्धात विरून जावेत तसे स्वप्नांच्या दुनियेतून तो धाडकन कोसळला……
नाशिक… प्रभू रामचंद्रांच्या सहवासाने पुनीत म्हणून अध्यात्मिक किनार असलेले शहर, त्यात अमृतकुंभातील थेंब गोदामाईच्या प्रवाहात पडल्याच्या आख्यायिका.. पुढे दर बारा वर्षांनी कुंभ मेळा धर्मसोहळा प्रवाहित झाला.मंत्र, तंत्रपाठोपाठ यंत्रांचा आवाजही शहराच्या विकासात आपले योगदान देत असतांना २१ शतकातील शहर म्हणून आकार घेऊन नावारूपाला येऊ लागले. मुंबई पुणे शहरात झालेली संपृप्तता यामुळे नव्या गुंतवणूकदारांना नाशिकची भुरळ पडली. त्यातच नाशिक जिल्ह्याला लाभलेले नैसर्गिक संपत्तीचे वरदान, छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा,स्वातंत्र्य चळवळ साहित्याचा वारसा, सामाजिक सलोखा अशा विविध घटकांनी नव्या गुंतवणूकदारांना नाशिकच्या प्रेमात पाडले. मुंबई आणि पुणे शहरांनंतर नाशिक विकासाच्या नकाशावर सुरक्षित शहर म्हणून नावारूपाला आले, आणि पुणे, मुंबई,नाशिक असा विकासाचा त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणात नाशिक विकासाच्या मार्गावर झपाट्याने धावत असतांना शैक्षणिक आणि आय टी हब म्हणून नवीन ओळख निर्माण झाली. एकूणच विकसित समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे, नैसर्गिक वातावरणाची समृद्धता,मुबलक पाणी या सकारात्मक बाबीमुळे मुंबई पुण्याच्या नागरिकांना सेकंड होम म्हणून नाशिक खुणावू लागले. त्यातून बांधकाम व्यवसायाने बाळसे धरले. रिअल इस्टेटचा व्यवसाय भरभराटीला आला. सर्वाधिक नफा कमवून देणारा व्यवसाय म्हणून भाऊ गर्दीने फुललेल्या व्यवसायात भक्कम पाय रोवण्याचे स्वप्न घेऊन तो नाशिकमध्ये जय्यत तयारीनिशी दाखल झाला.
भांडवलाची चण चण नव्हती. स्थिर स्थावर होण्यास अडचणी आल्या नाहीत. अल्पावधितच बांधकाम व्यवसायात नाव झाले. रियल इस्टेटमध्ये दबदबा निर्माण झाला.भूखंड विकसित करणारा सम्राट, एम्पायर उभे राहिले. नाशिकच्या उद्योग दुनियेत वेगळे स्थान निर्माण झाले.
गुळाच्या ढेपेभोंवती मुंग्या जमा होतात, तसे या दिलखुलास गर्भ श्रीमंत तरुण, दिसायला चार चौघापेक्षा अधिक नसला तरी थोडा उजवा चेहरा भुरळ घालू लागला. सुंदर आणि श्रीमंत तरुणाला जाळ्यात अडकवले तर भरभक्कम कमाई करता येते, ही प्रवृत्ती इथेही चिकटली. आणि नोकरीच्या निमित्ताने लटकली. भाऊ देखील थोडा लाघवीच. विस्तवाजवळ तूप गेले आणि विरघळले. लाघवी, चंचल स्वभाव आणि रोकडे अर्थ कारण याचा पुरेपूर फायदा उठवून त्या सौंदर्यवतीने जाळे टाकले. भाऊ अलगद अडकले. या नात्यात जे जे व्हायला हवे ते ते सर्व झाले.या सौंदर्याची भुरळ एव्हढी पडली की, कंपनीचे सारे व्यवहार त्या सुंदर हातात एकवटले. सारे पासवर्ड ट्रान्सफर. गोपनीयतेच्या तिजोरीचे राखण मादक नजरेच्या ताब्यात गेले. आणि एक दिवस तो सूर्योदय झाला, जो या एम्पायरचा अस्त ठरू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली.
उभयंतांच्या नात्यात जरा दुरावा आला . अर्थात या वळणावर देखील तिचाच पुढाकार होता.पतीला ही भानगड समजली आहे. थोडे दिवस बाहेर काम करते, असे सांगून नोकरी सोडली. पण ते संबंध कायम ठेवले. सम व्यवसायिकाकडे काम करत असतांनादेखील जूने संबंध, ते काम इकडच्या जागेवरून सुरूच होते. एक दिवस समोरून प्रतिसाद येणे बंद झाले. इकडून वारंवार फोन सुरु झाले. भाऊंना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असलेली सारी माहिती तिच्या कस्टडीत असल्याने तीचा संपर्क होणे निकडीचे होते. समोरून प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. अचानक समोरून फोन उचलला गेला. आणि धमकवणीच्या सुरात विचारणा झाली, ” कोण रे तू, का सतत फोन करून त्रास देतोस. पुरुषी आवाजाला उत्तर देतांना भाऊनेही खरं खरं सांगितलं. माझ्या ऑफिसच्या कामासाठी फोन करतो आहे. चोरी उघड झाली. तिचे बिंग फुटले. दोन्ही व्यवसायिकांना तिचे रूप समजले. जे संबंध आधी भाऊशी, तेच संबंध नव्या मालकाशी.. सारा आनंदी आनंद. संवाद हरवला, वाद सुरु झाले. आणि तणावात भाऊने थेट मॉरिशस गाठले.
इकडे सर्व पासवर्ड त्या सौंदर्याच्या कस्टडीत असल्याने एम्पायरचे सारे व्यवहार ठप्प. लाखो रुपयांची रोकड फ्रिज. या विवंचनेतून मार्ग कसा काढायचा?या प्रश्नाचे उत्तर त्या हॉटेलच्या बाल्कनीत स्कॉच रिचवत, सिगारच्या धुराने वर्तुळात शोधत असतांनाच पोलिस ठाण्यातून फोन आला.आपल्या विरुद्ध कार्यालयात नोकरी देऊन, लग्नाचे अमिष दाखवत आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. पायाखालची वाळू सरकली. धुराचे वर्तुळ विरळ झाले. स्कॉच घश्याच्या खाली उतरण्यास नकार देऊ लागली.
पुढच्याच सकाळी भारतात लँड केले. ढासळू पाहणारे एम्पायर सावरण्यासाठी धीर सोडून चालणार नव्हते. पोलिसी सोपस्कार पार पाडले. न्याय मिळण्याची अपेक्षा गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एंट्रीने धुसर झाली. सौंदर्याने इथेही बाजी मारली आणि न्याय दुरापास्त झाला. सौंदर्याने आपले काम चोख बजावले. इथेही सत्य बदनाम आणि अवमानीत केले गेले. खरं तर तीने त्याला जाळ्यात ओढले, तिच्या मर्जीने,तिच्या पुढाकाराने सारे प्रेमाचे तीर्थाटन झाले, आर्थिक, मानसिक, शारीरिक अत्याचार तिकडून झाले, याचे सारे पुरावे सादर करूनही व्यवस्थेने न्याय दिला नाही.महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला तरीही,आजही तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. न्यायव्यवस्था कदाचित न्याय देईलही. पण क्षणिक फायद्यासाठी तपास यंत्रणेकडून झालेला मानसिक, आर्थिक त्रास कसा भरून निघेल.
या प्रकरणातील सारे पात्र काल्पनिक आहेत. घटनाही कल्पनेने रंगवलेली, तथापी आज समाजाची नितिमूल्ये एव्हढी रसातळाला गेली आहेत, की या कथा कल्पनेशी साधर्म्य सांगणारी एखादी घटना आपल्या बाजूलाच आहे, असा भास वाचताना, ऐकताना होऊ शकतो. असे झालेच तर व्यवस्थेला जाब विचारा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. तेव्हाच ही कथा,वृत्तकथा होईल.
शब्दांकन : कुमार कडलग
नाशिक
आगामी :a) हनी ट्रॅप भाग 2:-ब्लॅक कॉफीच्या वाफेतून हॉट हनी पाझरली ;.
….. b)आश्रमातील कुलाचार, श्रद्धेवर बलात्कार
…… c) खाकीने दिला एका खंडणीखोराला जन्म



