कथा नव्हे व्यथा : प्रवास पेन्शनसाठी :थकलेल्या पायांचा, थरथरत्या हातांचा, हतबल मनाचा!
कथा नव्हे व्यथा : प्रवास पेन्शनसाठी :थकलेल्या पायांचा, थरथरत्या हातांचा, हतबल मनाचा!
…..
“मला दया नको… माझा हक्क दे!”
आजीचे हे शब्दं कुणाच्या तरी काळजाला टोचली पाहिजेत.
माणुसकी जर इतकीच थकली असेल, तर वृद्धत्व जगणं म्हणजे शिक्षा नाही का? हक्कासाठी हात जोडावे लागत असतील, तर व्यवस्थेच्या पायाखालची जमीन हादरली पाहिजे.
ही केवळ पेन्शन नाही – ती स्वाभिमानाची किंमत आहे!
“त्यांचं अवघ आयुष्य त्या फाईलमध्ये आहे. एकेक कागद म्हणजे त्यांनी जगलेलं आयुष्य. पण त्यात पेन्शन नाही आली, तर ते अस्तित्वच शिल्लक राहत नाही.
ही ‘फक्त पेन्शन’ची कथा नाही —
सिस्टिममध्ये माणूस कसा हरवतो, याची वास्तव व्यथा आहे….
—
ती सकाळ उजाडते, पण तिच्यासाठी नाही.
एक म्हातारी, अंगात जुनी काठ पदराची साडी, पायात चप्पल पण एकाजागी चिकटलेली. हातात जुन्या जीर्ण झालेल्या कागदांचं पुडकं.. पिशवीत काहीतरी कागदपत्रं.
ती बँकेच्या दरवाज्यापाशी उभी असते… कधी उभं राहून, कधी भिंतीला टेकून, कधी नजरेत प्रश्न घेऊन.
“मला फक्त पेन्शन पाहिजे बाबा… औषधं संपलीयत… घरात किराणा नाही… आणि ती लहानपोरीची फी बाकी आहे…”
“डोळ्याचं प्रमाणपत्र आणा. आधार अपडेट नाही. सिस्टम डाउन आहे.”
म्हातारी एक क्षण थिजते.
कसली ‘सिस्टम’? कुठली ‘डाउन’?
तीची आयुष्याची सिस्टीम तर आधीच आतून पोखरलेली….
… ही कथा नव्हे व्यथा आहे हक्काचं निवृत्ती वेतन पदरात पाडून आयुष्याची संध्याकाळ झिजवणाऱ्या जीवाची…
……..
अत्याधुनिक जगाला जगण्यासाठी, नव्हे ऐहिक, भौतिक सुखाने परिपूर्ण असलेल्या आय टी तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या शहरातील बँकेत भली मोठी रांग.. या रांगेत
सगळे मोबाईलमध्ये मान घालून उभे असतात..रांगेतच उभी असलेल्या एका म्हातारी आजी मधूनच जोरात ओरडते.
“तीन महिने झाले हो! पेन्शन मिळेना… मी मेल्यावर देणार का?”
बँक कर्मचारी आधीच वैतागलेले.. त्यात आजीबाईंचे आर्तव कानावर पडले.
“आज्जी, सिस्टम डाऊन आहे… उद्या या!”
उद्या… एका कर्मचाराने आजीबाईंना कटविण्याच्या सुरात उत्तर दिले..
कसली सिस्टीम,? कसली डाऊन? Ti
ती होती — सरकारी सेवकाची विधवा.
साहेब गेलं, पेन्शन आली… आणि सिस्टिमनं तिला ‘ऑफलाईन’ केलं
ती बाई साडीच्या पदरात लपवलेली कागदं घेऊन रोज येते.
कधी आधार, कधी मृत्यूपत्र, कधी पेंशन फॉर्म – सगळं तिच्याजवळ आहे.
पण तरी बँकेचा कॅशियर म्हणतो:
“बघूया, रेकॉर्ड नाही दिसत.”
७८ वर्षांची ती म्हणते:
“माझ्या नवऱ्याने ३५ वर्ष नोकरी केली. हक्काचं काही उरलं नसेल का?”
कोणी ऐकत नाही.
—
एक दिवस, ती ओरडली.
“साहेब, ह्या देशात मेल्याशिवाय पेन्शन मिळत नाही का?”
आणि तेव्हा बँकेत क्षणभर शांतता पसरली.
कुणाच्या तरी मनाला बोचलं.
बहुधा त्या व्यवस्थापकाच्या…
—
दोन दिवसांनी तिच्या खात्यावर पैसे जमा झाले.
ती तिसऱ्या दिवशी आलीच नाही.
कदाचित नियतीनं त्या पैशांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती….
बँक व्यवस्थापकानं शाखेच्या बाहेर मात्र एक पोस्टर लावलं –
“ही बँक, रमाबाई देशमुख यांना समर्पित आहे —
कारण त्यांनी आम्हाला ‘फक्त कागदावरून माणूस ओळखू नये’, हे शिकवलं.”
––तात्पर्य :
“पेन्शन तिच्या खात्यात आली…
पण वेळेवर माणुसकी आली असती, तर कदाचित ती अजूनही येत राहिली असती.”
या वयोवृद्धांच्या “भाकरीचा हक्क” मिळवायला एवढी दगदग का?आपण वेळेवर पगार घेतो, मग त्यांची पेन्शन उशीराने का? ज्यांनी देश उभारला, त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी अपमानित का केलं जातं ? बँकेच्या दारात उभ्या असलेल्या असंख्य रमा आजी हा प्रश्न व्यवस्थेला विचारत आहेत..
-कुमार कडलग
दिनांक :१७/०७/२०२५
….. आगामी :-आश्रमातील कुलाचार, श्रद्धेवर बलात्कार!