पोलीस हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न ; कर्तव्य बजावतांना अतिरिक्त तणाव की व्यक्तीगत वाद? पोलिसांचा तपास सुरु
पोलीस हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न ;
कर्तव्य बजावतांना अतिरिक्त तणाव की व्यक्तीगत वाद? पोलिसांचा तपास सुरु
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार गणेश वाळके यांनी आपल्या शिर्डी येथे घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपली जीवन यात्रा संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. पो. हवा. गणेश वाळके यांनी हे पाऊल का उचलले याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु असून घटनेने अहिल्या नगर जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गणेश वाळके यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? खात्यातील वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांचा जाच होता की व्यक्तिगत वादातून त्यांनी हे पाऊल उचलले याविषयी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान घटनेच्या आधी गणेश वाळके यांचे निवास स्थान परिसरात कुणाशी तरी वाद झाल्याचीही चर्चा आहे.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की,गणेश वाळके हे काही दिवसापूर्वी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बदलून आले होते. त्यांचा परिवार शिर्डी येथे राहत असून संगमनेर येथे ये जा करून पोलिस कर्तव्य पार पाडीत आहेत.मंगळवारची मध्यरात्र ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान गणेश वाळके यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. यामागे त्यांचा जीवन संपविण्याचा इरादा होता,तथापी सुदैवाने ते बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाळके यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्या घरावरून उडी मारण्या पाठीमागचे कारण काय. कुठला कौटुंबिक विषय होता का? कर्तव्य पार पाडीत असतांना वरिष्ठांचा दबाव होता की अन्य कुठला बाह्य वादाच्या तणावात त्यांनी हे पाऊल उचलले? हे तपासाचे मुद्दे असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर परेड होती. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याचे नाव काढण्यात आले. मात्र, गणेश वाळके यांचे नाव कायम ठेवण्यात आले होते. गणेश वाळके यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन तीस ते चाळीस गुन्हे माझ्याकडे प्रलंबीत आहेत . या गुन्ह्यांचा तपास कोण करणार?मला दोनवेळा हृदय विकाराचे झटके आले असुन एन्जॉप्लास्टिक झालेली आहे. मी परेड करू शकणार नाही. असे कळवले होते तरी देखील पोलीस निरीक्षक यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून परेडला नेमले. त्यामुळे, पोलीस हवालदार गणेश वाळके यांनी पोलीस निरीक्षक यांना फोन करून परेडला नेमणुक करू नका अशी विनंती केली होती. मात्र, पोलीस निरीक्षक यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे, हे टोकाचे पाऊल गणेश वाळके यांनी उचलले असावे अशी चर्चा संगमनेर शहरातील पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
“गणेश वाळके या कर्मचाऱ्याने उचलले पाऊल टोकाचे आहे. असा प्रसंग उद्भवतो तेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीशी चर्चा करून मार्ग काढता येतो. कार्यालयीन दबाव किंवा परेड संदर्भात जे कारण चर्चेत आणून पुढे केले जात आहे, त्याविषयी संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यांना भेटून देखील मुद्दा निकालात निघाला असता त्याही पुढे जाऊन पोलिस अधीक्षक कार्यालयातून देखील योग्य मार्गदर्शन मिळाले असते. असो, आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी गणेशचे स्थानिक परिसरात वाद झाल्याचे शिर्डी पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.”
– रवींद्र देशमुख
वपोनि, संगमनेर शहर
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांवर कर्मचाऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. पोलीस दबावाखाली नोकरी करत असल्याचा आरोप देखील होत आहे. त्यामुळे, एका कर्मचाऱ्याने थेट जो “कलेक्शन” करतो त्यांना गुन्हे द्या. असे शहर पोलीस ठाण्याच्या व्हाट्सएप ग्रुपवर टाकले. त्यामुळे, काही कर्मचाऱ्यांना चुकीचे दिवस तर काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या दबावाखाली दिवस काढावे लागत आहे. पोलीस हवालदार गणेश वाळके हे दबावाखाली तर नव्हते ना ? दबावापोटी तणावातूनच त्याने बिल्डिंगवरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न तर नाही ना ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.