अहिल्यानगरचा सुपुत्र पाहणार नाशिक महानगरीचा कारभार! गोदा प्रवरा संगमाइतकेच नितळ मनाचा अधिकारी :-राहुल कर्डीले
अहिल्यानगरचा सुपुत्र पाहणार नाशिक महानगरीचा कारभार!
गोदा प्रवरा संगमाइतकेच नितळ मनाचा अधिकारी :-राहुल कर्डीले
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि नाशिक जिल्ह्याच्या ठाणगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेले २०१५ च्या बॅचचे आयएएस, राहुल काशिनाथ कर्डीले हे नाशिक महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून रुजू होत आहेत. अशोक करंजकर यांच्या गच्छंतीनंतर पदभार स्वीकारणारे राहुल कर्डीले यांच्या समोर महापालिकेच्या कारभारात प्रचंड आव्हाने आहेत. तथापी बालपण आव्हाने स्वीकारण्यातच गेल्याने आव्हानांशी सामना कसा करायचा, याचे बाळकडूच त्यांना मिळाले असल्याने नाशिक महानगरीचा कारभार पाहणाऱ्या राजीव गांधी भवन समोर असलेली ही आव्हाने ते लिलया पार पाडून आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या सहकार, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आहोत आणि गोदा प्रवरेच्या संगमाइतकंच नितळ असलेल्या मनावर आय ए एस डॉ. पी. अन्बलगन, आय पी एस कृष्ण प्रकाश यांच्या कर्तृत्वाचा उमटलेला ठसा सार्थकी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे हे तरुण तडफदार आयुक्त आहेत तरी कोण?
………………………..
कुमार कडलग, नाशिक
………………………..
अहिल्यानगर जिल्ह्याला नेतृत्वाचे वरदान आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून या मातीने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्राला नेतृत्व दिले आहे. प्रशासकीय सेवेतही या जिल्ह्याने नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अगदी अलीकडच्या काळात प्रशासकीय सेवेत एक पिढी सेवा निवृत्त झाली तर मध्यम आणि तरुण वयोगटातील पिढी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या या जिल्ह्याच्या मातीचा सुगंध दरवळेल असे कर्तृत्व करीत आहे.
नाशिक महानगर पालिकेला लाभलेले नवे आयुक्त राहुल कर्डीले प्रशासकीय सेवेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या तरुण पिढीचे नेतृत्व करीत आहेत. चंद्रपूर, वर्धा अशा भागात प्रशासकीय सेवा दिलेले राहुल कर्डीले हे मूळ अहिल्या नगर जिल्ह्याचे असले तरी नाशिक जिल्ह्याशी त्यांचे बालपणापासून ऋणानुबंध आहेत. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. या विद्यालयात त्यांचे वडील काशिनाथ कर्डिले हे शिक्षक होते.
मुलाने सनदी अधिकारी होऊन गोरगरिबांची सेवा करावी, असे काशीनाथ कर्डिले (मूळ गाव गेवराई, ता. नेवासे) यांचे स्वप्न होते. वडिलांचे हे स्वप्न राहुल यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पूर्ण केले आहे. तीन वेळा त्यांच्या मुलाखती झाल्या, मात्र निवड होऊ शकली नव्हती. सन २०१५ मध्ये चौथ्यांदा मात्र त्यांनी यश संपादन केले.
राहुल कर्डिले यांनी यूपीएससी परीक्षेत देशात ४२२ क्रमांक मिळवला आहे. राहुल यांचे वडील काशीनाथ रायभान कर्डिले हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणगाव (ता. सिन्नर) येथे, तर माध्यमिक शक्षण करंजी (ता. पाथर्डी ) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगरच्या विखे महाविद्यालयात झाले. तीन वेळा त्यांच्या मुलाखती झाल्या, मात्र यश आले नाही. चौथ्यांदा मात्र त्यांना यश मिळाले.त्यांचे मेहुणे महेश जिवडे हे पुणे येथे आयकर उपायुक्त आहेत. त्यांच्या प्रेरणेतून राहुल यांनी हे यश मिळवले. राहुल यांची पत्नी प्रियंका कर्डिले या देखील लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तिर्ण आहेत.
अधिका-यांकडून घेतली प्रेरणा:
तीन वेळा अपयश आल्यानंतर देखील आई, भाऊ बहिणीने आधार देत पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले.. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत नोकरी करू नको, अभ्यास कर असे त्यांना घरातून सांगितले जायचे. त्यांच्या या पाठबळामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालो.असे ते अभिमानाने सांगतात. नगरला असलेले तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांचे काम पाहून आपण अधिकारी व्हावे, असे वाटत होते. त्यांची प्रेरणा घेऊन वाटचाल केली. केवळ अधिकारी व्हायचे नाही, तर समाजासाठी काही तरी करून दाखवयाचे आहे. ही जिद्द त्यांच्यात होती.
कार्यक्षम अधिकारी :-
नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदली होण्यापूर्वी राहुल कर्डीले वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले या निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राहुल कर्डीले, त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले, यांना उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीसाठी सरकारकडून शाबासकीची थाप देण्यात आली होती . निवडणूक विषयक महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गौरविण्यात आले होते.
जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवित मतदार नोंदणीचा टक्का वाढविला होता. नेहमीप्रमाणे शासकीय आवाहन, शिबिरांचे आयोजन अशा चौकटीबाहेर जात या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन मतदारांना नोंदणीसाठी आकर्षित केले. नागपूर विभागातून राहुल कर्डीले यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले यांनी देवळी मतदार संघासाठी निवड करण्यात आली होती.
कर्डीले हे वर्धा येथे जिल्हाधिकारीपदावर रूजू होण्यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सामान्यांसाठी केबिनचे दार खुले ठेवणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.वर्ध्याचे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून नवनवे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्डीले कमी वेळात नागरिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरलेत.
शिक्षण मित्र :-
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असतांना प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेले राहुल कर्डीले यांनी सर्व प्रथम जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाला प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रत्येक शाळेत गणिताच्या भिंती निर्माण केल्या. त्यासाठी त्यांनी गणितातील विशेष प्रकरणे निश्चित केले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून गणित भूमितीची विविध प्रकरणे भिंतीवर रंगवल्याने सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नेहमी वाटत असलेली भीती दूर झाली. म्हणूनच त्यांना शिक्षण मित्र म्हटले जाते.अशा या शिक्षण मित्राने नाशिक महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याने मनपा शाळांना नक्कीच प्राणवायू मिळेल.
नाशिककरांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि भ्रष्टाचारमुक्त नाशिक महापालिका म्हणून नाशिकचे नाव भविष्यात आदराने घेतले जाईल. असाच या अहिल्या नगर भूमिपुत्राचा प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवास राहील अशी अपेक्षा ठेवण्यास पुरेसा वाव आहे.