७७ वर्षानंतरही मांगलीदर गाव मूलभूत सुविधांपासून कोसो दूर ; ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार
७७ वर्षानंतरही मांगलीदर गाव मूलभूत सुविधांपासून कोसो दूर ;
- ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार

कळवण तालुक्यातील बहुतांश भाग हा सुजलाम सुफलाम आहे. मात्र तालुक्यातील या मांगलीदर गावात रस्ता नसल्याने, आरोग्य आणि शिक्षणाच्या मुलभूत सुविधा नसल्याने, गावात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एक हजाराच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या या गावात ५१४ मतदार संख्या आहे. मतदारांच्या या निर्णयामुळे तालुक्यात पहिल्यांदा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्न उदभवणार आहे.
या समस्या
* गावात कुठल्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नाही.
* मांगलीदर ते विरशेत रस्ता चांगला नसल्याने बस येत नाही.
* १०८ ची ॲम्ब्युलन्स आजवर बाघितली नाही.
* आरोग्याच्या मुलभूत सुविधा नाही.
* शैक्षणिक सुविधांपासून वंचित
* पशुवैद्यकीय दवाखाना नाही.


“अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू : आज उद्या आमच्या गावाचे चे मुलभूत प्रश्न सुटतील या आशेने प्रत्येक निवडणुकीत आम्ही लोकप्रतिनिधींना मतदान करतो. पण परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे यावेळी जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात गावकरी आहेत.”
-जगन गवळी: सरपंच मांगलीदर
‘आम्हाला कुणी वाली नाही: गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही लोकप्रतिनिधींना मोबाईल रेंजसाठी आग्रह करतो. मात्र कुणालाच काही घेणं देणं नाही. मोबाईल नेटवर्क नसल्याने आमचे खूप नुकसान होते. आपत्कालीन काही प्रसंग उद्भवला तर १०८ ला कधी फोन पण कधी लागला नाही. सगळ्या योजना मोबाईलवर कनेक्ट ओटीपी देतात. आम्हाला योजनांचा लाभ मिळत नाही.”
-छगन गवळी, नागरिक
“तलाठ्यांना पाठवुन माहिती घेतो : मांगलीदर गावातील नागरिकांनी काय निर्णय घेतला ? का घेतला याबाबत तलाठ्यांना पाठवून माहिती घेतो. घटनेने दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार बजावण्यासाठी नागरिकांचे गैरसमज काढण्याचा प्रयत्न करू.”
-रोहीदास वारूळे , तहसीलदार कळवण