अपघात झाला..अर्जंट पैसे पाठवा ; फेसबुक अकाउंटवरून पैसे उकळणाऱ्या मेसेजमध्ये वाढ पोलिसांचा सावधानतेचा इशारा
अपघात झाला..अर्जंट पैसे पाठवा ;
फेसबुक अकाउंटवरून पैसे उकळणाऱ्या मेसेजमध्ये वाढ
पोलिसांचा सावधानतेचा इशारा
प्रशांत हिरे / सुरगाणा
वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज होती, अपघात झाला आहे, अर्जेंट पैसे पाठवा, असे मेसेज बनावट फेसबुक अकाउंटवरून पाठवून पैसे उकळण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या अकाउंटचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. ऑनलाइन माध्यमातून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे लोकांकडून पैसे मागितले जात आहेत. या बाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गेल्या दीड वर्षांत सोशल मीडियावरून झालेल्या गुन्ह्यांच्या खूप तक्रारी पोलिसांच्या सायबर सेलकडे आल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे ही बाब आता आवश्यक झाली आहे. त्यामुळे सोशल संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णतः माहीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनांही वाढत आहेत अनेक तरुण-तरुणी कमी वय असूनही खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर प्रोफाइल उघडत आहेत. त्यामुळे ते अगदी सहज ‘सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडत आहेत. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, फेसबुक, व्हॉट्स वरून अश्लील संदेश पाठविणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणे, बदनामीकारक मजकूर किंवा फोटो पोस्ट करणे, फेसुबकचे अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे यांची संख्या जास्त दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या नावाचे बनावट खाते तयार करून सायबर चोरटे मला तत्काळ पैशाची गरज आहे. उद्या सकाळी लगेच परत करतो. मी जरा बाहेर अडकलोय मला पैसे पाठवा, अशा आशयाचे मेजेस फेसबुक अकाउंटवरून त्या व्यक्तींच्या मित्राला पाठवत आहेत. त्यामुळे फेसबुकवरून कोणाचाही पैसे पाठविण्यासाठीचा मेसेज आल्यास संबंधित व्यक्तीकडे खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. नेहमीच सायबर चोरटे नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून आर्थिक गंडा घालण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. अनेकदा मोठ्या व्यक्तीच्या खात्याचे बनावट खाते तयार करून पैसे मागितल्यामुळे अनेकांनी सायबर चोरट्यांच्या हवालीदेखील पैसे केले आहेत. शहरातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी वकील, पोलिस, व्यावसायिक, खासगी नोकरी करणाऱ्यांची बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैसे मागतिल्याचे समोर आले आहे.