क्राईम

लोकशाहीच्या उत्सवासाठी लालपरीचे मोलाचे योगदान; मतदान प्रक्रियेसाठी एस टीच्या नऊ हजार बस  धावणार;बसेसअभावी ग्रामीण प्रवाशांचे हाल


लोकशाहीच्या उत्सवासाठी लालपरीचे मोलाचे योगदान;

 

मतदान प्रक्रियेसाठी एस टीच्या नऊ हजार बस

 

 धावणार;बसेसअभावी ग्रामीण प्रवाशांचे हाल

 

नाशिक /प्रतिनिधी

 

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी  बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे ९ हजार बस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.दरम्यान हजारो बसेस निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने ग्रामीण भागातील दळण वळण खोळंबले असून प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली. यासाठी सुमारे ९ हजार २०० एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत. पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची, मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे 511, सोलापूर ४९०, अहमदनगर ४६८, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला दोन दिवसांसाठी प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल.

Advertisement

छत्रपती संभाजीनगर (३७४ बस), बीड (२९३), जालना (१९९), लातूर (१७५), नांदेड (२७८), धाराशिव (१८२), परभणी (१७५), मुंबई (२८०), पालघर (२५०), रायगड (२३७), सिंधुदुर्ग (१२६), ठाणे (२४६), नागपूर (२५०), भंडारा (२१९), चंद्रपूर (२१४), गडचिरोली (१०९), वर्धा १०८), बुलडाणा (२६८), यवतमाळ (२६५), अमरावती (२८१), जळगाव (३८९), धुळे (३१८) येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे इतर विभागांतून बस मागवून बसची पूर्तता केली जाणार आहे.

 

नाशिकसाठी 511 बसेस तैनात:

 

निवडणूक कार्यालयाला सुमारे 2,000 वाहनांची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे 1,000 सरकारी मालकीची असतील आणि उर्वरित खाजगी वाहने भाड्याने घेतली जातील.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निवडणूक कामांसाठी नाशिक विभागात 511 बसेसचे वाटप केले आहे आणि या वाहनांचे विधानसभानिहाय वितरण अंतिम करण्यात आले आहे.

 

बसेसअभावी ग्रामीण प्रवाशांचे हाल:

 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेस नसल्यामुळे गैरसोय झाली होती.वेळेवर बस नसल्याचा फटका प्रवाशांना बसल्याने खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे .

 

 

“भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या काळात वाहनांची नितांत गरज असते.निवडणूक ड्युटीसाठी 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान सुमारे 511 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नियमित प्रवासी सेवेसाठी मर्यादित संख्येने बसेस सुरू राहतील. शेवटच्या क्षणी मागणी असल्यास अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची सुद्धा तयारी आहे”

-किरण भोसले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *