राखी बांधलेल्या हातानेच घेतला बहिणीचा जीव ; भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीचे कुंकूही पुसले ; अवघ्या ४८ तासात ग्रामीण पोलिसांनी बांधल्या खुनी भावाच्या मुसक्या
राखी बांधलेल्या हातानेच घेतला बहिणीचा जीव ;
भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीचे कुंकूही पुसले ;
अवघ्या ४८ तासात ग्रामीण पोलिसांनी बांधल्या खुनी भावाच्या मुसक्या

नाशिक प्रतिनिधी
ज्या हातांनी राखी बांधून रक्षणाचे वचन हक्काने मागून घ्यायचे,भाऊबीजेला दिवा ओवाळून इडा पीडा टळून भावाचा संसार फुलावा म्हणून प्रार्थना करणाऱ्या बहिणीला तीच्या कुंकवासह ठार मारणाऱ्या सख्ख्या भावाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा तसेच तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जमिनीच्या वादातून बहिणीसह दाजीला ठार मारण्याचे धाडस, संपत्तीसाठी नात्यातील नैतिक मूल्य किती रसातळाला गेलेत, त्याचेच द्योतक आहे.
या संदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की,दिनांक ०६/११/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वा. चे पुर्वी नाशिक तालुका पोलीस ठाणेहद्दीतील साडगाव शिवारात मयत रामु राधो पारधी, वय ७० व त्यांची पत्नी चंद्रभागा रामु पारधी, वय ६५ या दोघांना त्यांचे राहते घरात अज्ञाताने कोण अज्ञात कारणावरून टणक हत्याराने डोक्याला, बरगडीला व छातीला मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. यातील मयत दोघे मोलमजुरी करून आपला उदनिर्वाह करत होते, त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. सदर घटनेबाबत नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुस्नं २३६/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकरी हरिष खेडकर यांनी घटनास्थळास भेट देवुन घडले. परिस्थितीची पाहणी करून, स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोनि सत्यजीत आमले यांनी घटनास्थळ परिसरात व मयतांचे नातेवाईकांकडे बारकाईने चौकशी केली. तसेच सतत ४८ तास सदर ठिकाणांवर पाळत ठेवुन संशयीत नामे सोमनाथ सावळीराम बेंडकोळी, वय ५०, रा. लाडची शिवार, ता.नि. नाशिक यास चौकशीकामी ताब्यात घेतले. तपासाचे कला-कौशल्य वापरून चौकशी केली असता, त्याने यातील मयत यांना घटनेच्या दिवशी दुपारचे सुमारास लाकडी दांडयाने डोक्यात व अंगावर मारहाण करून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली.
यातील आरोपी सोमनाथ बॅडकोळी हा मयत महिला चंद्रभागा रामु पारधी यांचा सख्खा भाऊ असून जमीनीच्या वादातुन त्यांचेत भांडण झाले होते, त्याचा राग मनात धरून यातील आरोपीने आपली बहिण व दाजी यांना दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशीच सायंकाळचे सुमारास लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करून जिवे ठार मारले असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर आरोपीस वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व पथक करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकरी हरिष खेडकर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोहवा संदिप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोअं. रविंद्र गवळी यांचे पथकाने ४८ तासांच्या आत सदर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.



