उपनगरच्या हद्दीत बेकायदेशीर गॅस फिलिंग? “खल रक्षणाय” कारभाराचे ‘सप’ तोडून ‘काळ’च खरा जितेंद्र असल्याचे सिद्ध करण्याचे पोलिस आयुक्तांना आवाहन
उपनगरच्या हद्दीत बेकायदेशीर गॅस फिलिंग?
“खल रक्षणाय” कारभाराचे ‘सप’ तोडून ‘काळ’च खरा जितेंद्र असल्याचे सिद्ध करण्याचे पोलिस आयुक्तांना आवाहन
नाशिक प्रतिनिधी
एका बाजूला पोलिस आयुक्तालयातील सर्व प्रभारी,पोलिस आयुक्तांच्या आदेशाला सॅल्यूट ठोकून कायदा सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडीत असताना परिमंडळ दोन मधील उपनगर पोलिस ठाण्याचा कारभार मात्र वेगळ्याच दिशेने सुरु असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसत आहे.
गुन्हे शाखेचे तिन्ही युनिट आणि एखादा अपवाद वगळता सर्वच पोलिस ठाण्यांचे डी बी. पथक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहेत. या उलट उपनगर पोलिस ठाण्यात मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला पायघड्या घातल्या जात असल्याची खंत एका पीडिताने दै.प्रहारकडे व्यक्त केली आहे.
या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबाबत प्रभारी अधिकारी किती सजग आहेत, याविषयी अनेक किस्से दै. प्रहारकडे उपलब्ध आहेत. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर महिनो न महिने त्या तक्रार अर्जावर साचलेली धूळ झटकण्यासाठी या पोलिस ठाण्याला वेळच मिळत नाही. तर दुसरीकडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करीत असलेल्या संशयितांची यादी तयार करून एकेकाला पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्याशी तडजोड करायची यातून फुरसत मिळत नसल्याने अनेक तक्रार अर्ज धूळ खात पडुन आहेत.
याखेरीज जेलरोड मार्गावरील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दसक गावातील सद्गुरु मंगल कार्यालय व पेट्रोल पंपाच्या च मागच्या बाजूला एक अवैध गॅस फिलिंगचा धंदा आहे.या धंद्याच्या मालकाच्या ‘नाना’ लीला उपनगर पोलिसांना ठाऊक असूनही त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस केले जात नसल्याने या लीला अधिकच ‘आढाव ‘पणे कायद्याच्या छाताडावर नाचत आहेत. दिवसाला दीडशे ते दोनशे गॅसच्या टाक्या अवैधरित्या गाड्यांमध्ये भरल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे हा अवैध धंदा दाट लोक वस्तीमध्ये आहे.या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच इतक्या मोठ्या प्रमाणावर या व्यक्तीकडे गॅसच्या टाक्या येतात कशा? हा प्रश्न देखील उपनगरच्या तटस्थ भूमिकेमुळे अद्याप अनुत्तरित आहे.
उपनगर पोलीस ठाणे प्रभारींच्या कार्यालयात तक्रार अर्ज घेऊन येणारे, आपली कैफियत ऐकून न्याय द्यावा या अपेक्षेने येणारे अभ्यागत ताटकळत उभे राहतात. दुसरी काळी बाजू ही की गुन्हेगार असलेले,राजकीय परीवेषातील मंडळींना मात्र पायघड्या घातल्या जातात.प्रभारी अधिकाऱ्यांसमोर सहकारी अधिकारी अभ्यागत किंवा केवळ कमाईसाठी लिस्टेड नागरिकांना पोलिस आयुक्त, उपायुक्तांनी सांगितले तरी सोडणार नाही ही भाषा वापरून आपणच सर्व शक्तिमान असल्याचे चित्र निर्माण केले जाते. केवळ कमाईचे ‘सप’जीवंत राहावेत, म्हणून सुरु असलेला हा कारभार आयुक्तालयाच्या प्रतिष्ठेला बदनाम करीत असेल तर, आयुक्तांनीच हे ‘सप’बंद करण्यासाठी पाऊले उचलून ‘काळ’च खरा जितेंद्र आहे हे सिद्ध करावे अशी उपनगर वासियांची अपेक्षा आहे.