ताज्या घडामोडी

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये ;  जिल्ह्यातील लाखो समाज बांधव सहभागी होणार 


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये ;

 जिल्ह्यातील लाखो समाज बांधव सहभागी होणार 

 

नाशिक प्रतिनिधी 

गेल्या ७ तारखेपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिक येथे होत असून १३ तारखेला संपन्न होणाऱ्या या रॅलीत नाशिक जिल्ह्यातील लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला सकल मराठा समाज राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव,रामभाऊ खुर्दळ,आशिष हिरे,सुभाष गायकर,विक्रांत देशमुख,राम निकम,अण्णासाहेब पिंपळे,संदीप खुटे,अजित नाळे,योगेश गांगुर्डे,वैभव दळवी,योगेश कापसे,अविनाश गायकर,दादासाहेब जोगदंड आदी समाज बांधव प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

सकाळी तपोवन,नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच आगमन होणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे.

बॉक्स :-

असा आहे रॅलीचा मार्ग: 

तपोवन – जुना आडगाव नाका – निमानी – मालेगाव स्टॅन्ड – मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे स्वागत होणार आहे त्यानंतर रॅली रविवार कारंजा – गावकरी कार्यालय – देशदूत कार्यालय – मेहर सिग्नल या मार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालया समोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास अभिवादन.सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप तेथे होईल.या रॅलीसाठी ठरवून दिलेले नियम, अटी व सूचनांचे पालन सर्वांनी करण्याचे आव्हान नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

बॉक्स :-

पार्किंग व्यवस्था :-

 संपूर्ण नाशिक शहर,सटाणा देवळा,मालेगाव,नांदगाव,येवला निफाड,सिन्नर येथून येणाऱ्या वाहनांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था तपोवन येथील परफेक्ट डाळींब मार्केट निलगिरी बाग व कुंभमेळ्याचे मैदान तपोवन या ठिकाणी करण्यात आली आहे.तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणारी वाहने व त्र्यंबकेश्वर,इगतपुरी या तालुक्यांतून येणारी वाहने यासाठी गोल्फ क्लब मैदान तसेच कळवण,दिंडोरी या तालुक्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचवटी येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण,पेठ,सुरगाणा तालुक्यातील वाहनांसाठी मराठा विद्या प्रसारक समाज या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली असून सर्व तालुक्यांतील समाज बांधवांनी ज्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची व्यवस्था दिली आहे त्याच ठिकाणी आपली वाहने पार्किंग करून सहकार्य करावे व वाहने पार्किंग करून आपण रॅलीमध्ये सहभागी व्हावे.

Advertisement

…,………

कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडणार नाही याचीही सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मराठा शांतता रॅलीचा उद्देश हा मराठा एकजूटीची ताकद दाखवून देणे हा आहे,त्यामुळे सर्वांनी आपले नातेवाईक,कुटुंबीय, मित्र परिवार व आपल्या संपर्कातील सर्व समाज बांधवांना फोन,मेसेज,प्रत्यक्ष भेटून या रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.

 

बॉक्स :

सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन:

शक्यतो रॅली मध्ये येताना व जाताना आपली स्वतःच वाहनात आपला मुलगा,वडील,भाऊ,बहिण,पत्नी आई किंवा मित्र यांना सोबत घ्या, प्रत्येकाचे वाहनात त्यांच्याच घरातील व्यक्ती त्या वाहनात घेतले तर संख्या वाढेल. शक्यतोवर सहकुटुंब सहपरिवार या रॅलीत सहभागी होण्याचा प्रयत्न करा.

 

त्या दिवशी घरातून बाहेर पडण्यापूर्वी जेवण करूनच घर सोडा व सोबत जास्तीत जास्त खाण्याचे साहित्य इतर समाज बांधवांसाठी आणण्याचा प्रयत्न करा.

 

प्रत्येकाने आपल्या सोबत दोन पाणी बॉटल व दोन भाकरी व सुकी भाजी सोबत ठेवा.रॅलीत लांबच्या तालुक्यातून सामील झालेले आपले जे बांधव व भगिनी आहेत त्यांची काळजीपूर्वक विचारपूस करा व सोबत आणलेले जेवण जर तुम्ही खाणार नसाल तर त्यांना ते द्या…

 

गर्दीमुळे रॅली मार्गात फोन ला नेटवर्क भेटेलच असे नाही त्यामुळे आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींसोबत तुमची ताटातूट झाली तर आपल्या सोबत च्या व्यक्तीला रॅली संपल्यानंतर आपण कुठे एकत्र यायच ते ठिकाण ठरवा व पहिला जो व्यक्ती तिथे पोचेल त्यांनी आपला जोडीदार तिथं पोचेपर्यंत निघु नका. लहान व ज्येष्ठांच्या खिशामध्ये आधार कार्ड व मोबाईल नंबर लिहून एक कागद त्यांच्या खिशात ठेवा.

 

जाताना व येताना रस्त्यावर व रॅलीच्या ठिकाणीं कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्या. कारण जगात आपला मराठा समाज हा शिस्त प्रिय आणि शांततेसाठी आदर्श मानला जातो हे प्रत्येक मराठयांनी विसरू नका.

 

अंधअपंग,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले यांनी रॅली ऐवजी ज्या ठिकाणी सांगता सभेचे आयोजन केलं आहे तेथे म्हणजेच नाशिक येथील सीबीएस समोरील चौकात उपस्थित राहू शकतात.

रॅलीच्या मार्गावर विविध ठिकाणी वैद्यकीय कॅम्प,नाश्ता व पाण्याची व्यवस्था केलेली आहे.आपण सर्वांनी त्या त्या ठिकाणी लावलेल्या स्टॉलवर नाश्ता व पाणी घेऊन एका जागेवर न थांबता पुढे चालायचे आहेत.ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे ठिकाण निश्चित करून दिलेले आहे त्याच ठिकाणी कचरा टाकायचा आहे. कुठेही रस्त्यावर पाण्याचे बॉटल, कागद प्लास्टिक,फेकायच नाहीआहे. आपल्याला आपले शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी पुढील सूचनेचे पालन हे करायचे आहे. आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची शिस्त संयम आणि आदर्श जगासमोर ठेवायचा आहे.याचा पुनःरूच्चार या पत्रकार परिषदेत करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *