*सुरगाणा परिसरात पर्जन्यराजाची धुव्वादार बॅटिंग* *वीज गायब, मानवीजीवन अंधारात, निसर्ग मात्र खुलला*
*सुरगाणा परिसरात पर्जन्यराजाची धुव्वादार बॅटिंग*
*वीज गायब, मानवीजीवन अंधारात, निसर्ग मात्र खुलला*
सुरगाणा प्रतिनिधी
तालुक्यात शनिवारी सकाळ पासूनच पावसाने जोर धरला असून धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. यामुळे पिंपळसोंड परिसरात वीज गायब गायब झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.रात्री ,अपरात्री घरा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. साप, विंचू, काटा, वन्य प्राणी यांची धास्ती वाढली आहे.
यामध्ये तालुक्यातील नदी, नाले, ओहळ यांना महापुर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर अनेक रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मो-यांची फरशी असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात, बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत. यामध्ये सीमावर्ती भागातील पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. खुंटविहीर जवळील उंबरपाडा(पि) येथील नागरिक शेती कामानिमित्त पिंपळसोंड येथे गेले होते. ते पंधरा ते वीस नागरिक गावाजवळील फरशी वरुन पुराचे पाणी वाहात असल्याने अंबिकेची उपनदी कुंभारचोंड ओहोळच्या पलीकडे अडकून पडतात. उंबरपाडा हे गाव नदी पासून हाकेच्या अंतरावर असून घरी येता येत नाही. एका शेतकऱ्यांच्या बैलांनी पुरात उड्या मारुन नदी पार केली तर शेतकरी मात्र नदीच्या काठावर अडकून पडला आहे. या शेतक-यासह पंधरा ते वीस जण काठावर अडकून पडले आहेत. ते पुर ओसरल्यावर घरी रात्री,अपरात्री येतील.या कुंभारचोंड नदीला धुकट्या डोंगराचा तीव्र उताराचा भाग असल्याने पुराच्या पाणी तीव्र वेगाने वाहत असते. पिंपळसोंड गावाचा नेहमीच संपर्क तुटत असतो. या गावी आरोग्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने महिला प्रसुती, सर्पदंश, विंचू दंश, वन्य प्राणी हल्ला, आजारपण, अपघात झाल्यास राम भरोसे जीवन नागरिकांनी जगावे लागत असे.
जेव्हा पुराचे पाणी कमी होईल,ओसरेल तेव्हा हे नदीच्या काठावर दोन्ही बाजूंनी अडकलेले नागरिक जीव धोक्यात घालून पुराचे पाणी पार करून रात्री अपरात्री घरी पोहचतात. हे पिंपळसोंड गावाच्या पाचवीलाच पुजलेले आहे.इतर तालुक्यात जेथे पाऊस कमी पडतो तेथे वीस ते पंचवीस फूटाचे उंच उंचच पुल बांधले जातात. आणि येथे सुरगाणा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तेथे मात्र पाईपच्या मो-या बांधल्या जातात हे कोडे न उलगडणारे आहे. पिंपळसोंड गावाला पुल बांधावा अशी मागणी शिवराम चौधरी, मणिराम चौधरी, तुळशीराम खोटरे, सोन्या बागुल, नारायण गावित,देवराम महाले,मोतीराम चौधरी या नागरिकांनी केली आहे. तर दुसरीकडे बा-हे भागातील आंबुपाडा(बे) येथील वाकी नदीला पुर आल्याने तुटतो आंबुपाडा,जांभुळपाडा,कोटंबी,मोधळपाडा,खिरमाणी,कळमणे या गावांचा बा-हे भागाशी तसेच तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर आश्रम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे.सरपंच भाऊ भोंडवे,विलास भडांगे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश गांगोडे, माधव वाघमारे,चंदर चौधरी,यादव जाधव, जगदीश पवार,युवराज गवळी,नंदराज भोंडवे,नामदेव जाधव, प्रकाश गावित,परशराम गावित, विलास गावित.दतु वाघमारे,आणि ग्रामस्थ आंबुपाडा, जांभुळपाडा,कोटंबी, मोधळपाडा, खिरमाणी, कळमणे यांनी पुलाची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया-”
पिंपळसोंड हे गाव अतिदुर्गम भागातील गुजरात सिमेवरील दुर्लक्षित गाव असून या गावात आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, दळणवळण या मुलभूत सुविधा अद्याप तरी उपलब्ध झालेल्या नाहीत. माझे वय आज मितीश पंच्याहत्तर वर्षे आहे. लहान असतांना गेली चाळीस वर्षे या नदीवर पूल नव्हता जीव धोक्यात घालून नदी पोहून शेती कामानिमित्त पिंपळसोंड गावी जात होतो.पंधरा वर्षापूर्वी पाईपची मोरी बांधली आहे. पुराचे पाणी खुप येत असल्याने नदीच्या दोन्ही काठावर अडकून पडावे लागते. उपाशी तापाशी काठावर थांबावे लागते. पुराचे पाणी कमी झाल्यावर घरी यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करतोय आम्ही. आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच अगदी मंत्र्यांना निवेदने सादर केली आहेत. माझ्या हयातीत पुल शासनाने बांधला तर पाहून तरी जाता येईल. माझी अपेक्षा तरी शासनाने पुर्ण करावी हिच अपेक्षा.
-शिवराम चौधरी- माजी सैनिक पिंपळसोंड (उंबरपाडा)