भगवान महावीरांच्या दृष्टीकोनातून मानव जन्माची दुर्लभता आणि सार्थकता
भगवान महावीरांच्या दृष्टीकोनातून
मानव जन्माची दुर्लभता आणि सार्थकता
इ.स. पुर्वी ५९९ व्या वर्षी भ. महावीरांचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला बिहार राज्यातील क्षत्रीयकुंडपूर गावी राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. भ. महावीरांना भ. महावीर होण्यासाठी सम्यकत्व प्राप्ती झाल्यानंतर २७ मोठया जन्मातुन आणि चारही गतितुन जावे लागले. प्रथम तीर्थंकर भ. ऋषभनाथ यांच्या काळात ‘नयसार’च्या जन्मात साधु-मुनींना भिक्षा देण्याच्या इच्छेच्या स्वरुपात त्यांना सम्यकत्वाची प्राप्ती झाली आणि तीर्थंकर गोत्राची पार्श्वभूमी तयार केली, आणि त्यानंतर २७ मोठ्या जन्मांद्वारा, यात मनुष्य, स्वर्ग, नरक आणि तीर्यंच गतितुन जन्म घेऊन २७ व्या जन्मात ते भ. महावीरांच्या रुपात जन्म घेऊन भ. महावीर झाले.
भ.महावीरांच्या सत्ताविसाव्या जन्मातील जीवनाचे साधारणपणे तीन कालखंड पडता येईल. माता त्रिशलादेवीच्या गर्भात प्रवेश केल्यापासुन ते जैन भागवती दीक्षा घेईपावेतोचा तीस वर्षांचा गृहस्थाश्रमाचा प्रथम कालखंड होय. त्यांना त्यांच्या पुर्व जन्मीच्या कर्मामुळेच गर्भातच मती ज्ञान, श्रुती ज्ञान आणि अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. जैन भागवती दीक्षा घेताच त्यांना मन:पर्याय ज्ञान या चौथ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. येथुन कैवल्य ज्ञानाची प्राप्ती होईपावेतोचा खड्तर तपश्चर्येचा आणि परिषह त्रासांचा साडे बारा वर्षांचा दुसरा कालखंड होय. आणि कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सामान्य जनतेत येऊन बोली भाषेत धर्मोपदेश देऊन लोकांना सदमार्गाला आणि मोक्षमार्गाला नेण्याचा मार्ग दाखवण्याचा त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा सुमारे तीस वर्षांचा तिसरा कालखंड होय.
भ. महावीरांचे काळात १४ पूर्व ज्ञानाइतके ज्ञान ज्ञानी पुरुषांना असत. त्यावेळेस हे ज्ञान लिखीत स्वरुपात नव्हते तर ते श्रुत ज्ञान स्वरुपात होते. कालांतराने या ज्ञानाचा क्षय होऊ नये म्हणुन त्यांच्या अनुयायांनी हे ज्ञान लिपीबद्ध केले.ते ११ पूर्व ज्ञानाइतकेच लिपीबद्ध होऊ शकले, बाकी ज्ञानाचा हळूहळू लोप झालेला आहे. भ. महावीरांचा हा उपदेश आज ३२ आगमात लिपीबद्ध झालेला आहे. भ. महावीरांना त्यांच्या त्यांच्या महानिर्वाणाचा काळ स्पष्टपणे दिसु लागला होता. पावापुरी क्षेत्री त्यांचा अंतीम चातुर्मास चालु होता. दिवाळीच्या दोन दिवस अगोदर तेला उपवासाचे प्रत्याखान घेऊन त्यांनी सतत दोन दिवस अखंडपणे ४८ तास ते अंतीम उपदेश देत राहिले, हाच त्यांचा उपदेश उत्तराध्ययन सुत्रात त्यांच्या अनुयायांनी लिपीबद्ध केलेला आहे. या उत्तराध्ययन सुत्रात साधकांनी मोक्ष कसा मिळवावा याचे निरुपण त्यांनी केलेले आहे. या सुत्रात एकुण ३६ अध्ययन असुन त्यातील तिसरा अध्याय “चतुरंगीय” नावाने ओळखला जातो.
या “चतुरंगीय” अध्यायात भ. महावीरांनी मानव जन्म, धर्म श्रवण, धर्म श्रद्धा, आणि त्याप्रमाणे धर्माचे आचरण या चार दुर्लभ बाबींचे विवेचन केलेले आहे. संसाराची जीवनयात्रा आणि जन्म मृत्यूचा फेरा अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत चालणार आहे, त्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही. या संसाराच्या रहाटचक्रात एखादाच पुण्यात्मा असा असतो की, त्याची सौभाग्याने जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होऊन तो सिद्ध, बुद्ध आणि मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त करु शकतो.
संसारचक्रात मानव जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ असल्याचे भ. महावीर या अध्ययनात सांगतात. कारण मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे की, ज्या जन्मात कर्मक्षय करुन कर्ममुक्त होऊन मनुष्य सिद्ध, बुद्ध आणि मुक्त होऊ शकतो आणि मानव स्वतःच आत्म्याचा महात्मा आणि महात्म्याचा परमात्मा होऊ शकतो. इतर कोणत्याही जन्मात ते शक्य नसते. म्हणुन मानव जन्मच मोक्ष प्राप्तीची संधी आहे असे समजुन देव गतीतील जीव देखील मानवाचा हेवा करतात. म्हणुनच भ. महावीर मानव जन्माला दुर्लभ संबोधतात.
नरक गतीतील जीव अनेकानेक आणि अखंड दु:खाने व्यथित आणि पिडीत असतात. त्यामुळे त्या जीवात विवेक आणि धर्म भाव जागृत होत नाही. तीर्यंच जीवात एकेंद्रिय जीवापासून ते पंचेंद्रिय जीवांचा आणि सर्व पशु-पक्ष्यांचा आणि किटकांचा समावेश असतो, ते पुर्व संस्काराने प्रेरीत होऊन कदाचित त्यांचा विवेक जागृत होऊन ते धर्माचरणही करतील, परंतु त्यांच्यात मोक्षात जाण्याची शक्ती नसते. ते फक्त जीवाला सन्मार्गाला घेऊन जाऊ शकतील. देव गतीतील जीव म्हणजेच स्वर्गातील जीव संपुर्णपणे सुखासीन अर्थात सुख उपभोगत असल्यामुळे ते सुख उपभोगतच आपले जीवन व्यतीत करतात, त्यामुळे ते या जन्मात श्रमण दीक्षा घेण्यास योग्य नसतात.मनुष्य जीवनातच विवेक जागृत होऊन “मानवता” थोडयाशा प्रमाणात येऊ शकते, इतर तीन गतीत ते शक्य नसते.
संसारी जीव गेल्या अनेक जन्मातील कर्मानुसार देव, नारकी, तीर्यंच आणि मनुष्य या चार प्रकारच्या गती मधल्या चौऱ्यांशी लक्ष योनितुन भ्रमण करीत असतो. दुष्कर्मामुळे जीव मनुष्य योनीऐवजी इतर जन्मातच जन्म घेत भटकत असतो. जेथे त्याला अनेक प्रकारची आणि अनंत आणि सहनशीलतेच्या पलीकडील दु:खे भोगावी लागतात. आत्यंतिक सुखमय देव योनीत देखील आत्यंतिक सुखोपभोगामुळे त्याला संसारातून विरक्ती प्राप्त होऊ शकत नाही, त्यामुळे त्याने धर्मात पुष्कळ पुरुषार्थ केल्यानंतर प्रवृत्ती, भद्रता, विनयता, द्याशिलता आणि परगुण सहिष्णुता इ. कारणामुळे मानव योनिसाठी अनेकानेक अवरोधक कर्मांचा क्षय केल्यानंतरच मनुष्य जन्माची प्राप्ती होऊ शकते.
मनुष्य जन्म मिळाल्यावर देखील अनार्य, म्लेंछ, यवन किंवा हिंसक आणि पापाचरण करणाऱ्या धर्मरहित कुळात जन्म झाला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण मनुष्य त्याच संस्कारात वाढत असतो. मानवता, आर्यक्षेत्र, उत्तम जाती, उउत्म कुल, सर्वांगीण परिपूर्णता, आरोग्य, परलोक प्रवण बुद्धी, धर्म परायण, आणि धर्म संस्कारावर श्रद्धा आणि संयम हे देखील उत्तमोत्तम दुर्लभ गुण आहेत. मनुष्यरूपी शरीर प्राप्त झाल्यानंतर देखील मानवता प्राप्त करणे दुर्लभ आहे. कारण मनुष्यरूपी शरीर पूर्व जन्मातील केलेल्या कर्माच्या कारणामुळे कसाई, वेश्या, चोर, खुनी, डाकू इ. स्वरुपात जन्म घेत असतात. खरा मनुष्य जन्म कर्मफळ निष्फळ केल्यानंतरच आर्य आणि कुलीन वर्गात धर्म संस्कार मिळत असतात.
कुलीन वर्गात आणि आर्य क्षेत्रात जन्म मिळाल्यानंतर श्रुत धर्म अर्थात धर्मश्रवण करण्यास मिळणे दुर्लभ आहे. मानव रुपात जन्म मिळाल्यावर त्याला खरा धर्म ऐकावयास मिळाला पाहिजे, तरच त्याचे हृदय द्र्वीत होऊन मन परिवर्तीत होऊन अंतकरण धर्म संस्कारीत आणि परिपूर्ण होईल. त्यामुळे त्याच्या अंर्तमनात आत्मविकासाची प्रवृत्ती तीव्र स्वरुपात जागृत होईल आणि धर्म श्रवणात त्याला गोडीही होईल आणि धर्म श्रवणासाठी तो सतत आसुसलेला राहील. भ. महावीरांनी या धर्म श्रवणात सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच महाव्रतांची माहिती प्रतिपादन करुन साधु वर्गाने ते पूर्ण रुपात आत्मसात करावयाचे आहेत तर संसारी जीवांनी ते अणु रुपात अनुसरावयाचे आहे.
वरीलप्रमाणे भ. महावीरांच्या धर्माचे श्रवण केले तरी त्यावर श्रद्धा असल्याशिवाय त्याचा लाभ होत नाही, म्हणुन धर्म श्रवणानंतर धर्म श्रद्धेला भ. महावीरांनी दुर्लभ सांगितलेले आहे. धर्म श्रवण जरी केले तरी हिंसेचा त्याग आणि परिग्रहाचा त्याग करुन अपरीग्रहाच्या, सत्याच्या, अहिंसेच्या, अस्तेयच्या, ब्रह्मचर्याच्या, अनेकांतवादाच्या मार्गावर जाण्यासाठी धर्म श्रद्धा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय धर्म श्रवणाचा लाभ होत नाही. जो अहोरात्र आणि सतत आरंभ-समारंभ अर्थात हिंसा, असत्य, परिग्रह, चौर्यकर्म आणि अब्रह्मचर्य आणि एकांतवादी वर्तनात मश्गुल असतो आणि केवळ कोणत्याही मार्गाने संपती जमा करण्यातच गर्क असतो त्याला धर्म श्रवणाची गोडी प्राप्त होणे कठीण असते. आळस, मोह, अवज्ञा, अहंकार, क्रोध, प्रमाद, कृतघ्नता, कृपणता, भय, शोक, अज्ञान, व्याकुळता, व्यग्रता इ. मानवाच्या प्रवृत्ती धर्म श्रवणात आणि धर्म श्रद्धेत व्यत्यय आणत असतात.
धर्म श्रवण करावयास मिळाला परंतु त्याच्यावर श्रद्धा नसेल तरीही त्याचा उपयोग होत नाही, म्हणुन धर्मावर श्रद्धा असणे हा देखील मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेला एक दुर्लभ गुण असल्याचे भ. महावीर प्रतिपादन करतात. यथार्थ दृष्टी, सत्याची ओळख, संबोधी इ. धर्म श्रद्धेचे प्रमुख अंग आहेत. पुष्कळ व्यक्ती धर्म श्रवण करतात मात्र त्यांचे प्रत्यक्षातील वर्तन त्याचेशी विपरीत असते, ज्यांचा विश्वास देव, गुरु आणि धर्मावर धर्म श्रवण करुनही श्रद्धा नसते. ज्यामुळे मोक्ष प्राप्तीच्या ध्येयाप्रत जाता येत नाही. देव, गुरु आणि धर्मावर श्रद्धा आणि विश्वास असणे आणि मोक्षासाठी मोक्ष मार्गावर श्रद्धा असणे मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे.
वरीलप्रमाणे तीन बाबींची प्राप्ती झाली तरी संयमात आणि धर्माचरणात पुरुषार्थ केल्याशिवाय मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. मोह, मान, माया, लोभ, मद, अहंकार इ. विकारांमुळे मनुष्याला संयम, धर्म चारित्र्यावर श्रद्धा असतांना देखील पुरुषार्थ करता येत नाही म्हणुन धर्म श्रवण केल्यावर मोह, मान. माया, लोभ, मद, अहंकार इ. षडरिंपुवर विजय मिळ्वून संयमात पुरुषार्थ केला तरच मोक्षप्राप्ती होऊ शकते.
अशा प्रकारे भ. महावीरांनी आर्यक्षेत्र आणि कुलीन वर्गातील मनुष्य जन्म, धर्म श्रवण, धर्मावर श्रद्धा, आणि धर्मात पुरुषार्थ या चार अंगाची दुर्लभता सांगुन त्या बाबी प्राप्त करुन घेतल्यावरच कर्मांचा क्षय होऊ शकतो, आणि सर्व प्रकारच्या कर्मांचा क्षय झाल्यावरच मोक्ष प्राप्ती होऊ शकेल असे प्रतिपादन केलेले आहे. आणि यातच मानव जन्माची सार्थकता सामावलेली आहे, असेही भ. महावीर पुढे स्पष्ट करतात.
मगनलाल माणकचंद बागमार, नाशिक