वर्तमान युगात भ. महावीरांच्या विचारांची सार्थकता
वर्तमान युगात भ. महावीरांच्या विचारांची सार्थकता
जीवसृष्टी अनादी आहे, अनंत आहे, स्वयंमेव आहे. जेंव्हा पृथ्वीवर अत्याचार होतात, अधर्माचे साम्राज्य पसरते तेंव्हा धर्माच्या उत्थानासाठी कोणी ना कोणी महापुरुष निर्माण होतो हा नियतीचा नियमच आहे. भगवान महावीरांच्या जन्मकालीन भारतीय परिस्थिती अत्यंत दयनीय होती. रविवारी (दि.२१) त्यांची जयंती आहे, त्यानिमित्त घेतलेला आढावा
सामाजिक विषमता व अमानुषीक यंत्रणा मानव जातीला व्याकुळ करत होती. अशा काळात महावीरांचा जन्म बिहार प्रांतातील वैशाली नगरीत कुंडलपूर येथे राजे सिद्धार्थ यांच्या यशस्वी राजवंशात माता त्रिशला देवीच्या कुक्षीत झाला. तीर्थकर महावीर एकाच जीवनातील साधनेने तीर्थंकर झाले ही असंभव कल्पना आहे. महावीरांच्या पूर्वभवांचे अवलोकन केल्यास आत्मा हा प्रवृत्तीच्या हातातील खेळणे नसून प्रयत्न, पुरुषार्थ व उद्यमतेने शुद्रापासून महान व सामान्य जनापासून “जिन” चे सर्वोच्च पद प्राप्त करू शकतो. लहानपणापासूनच ते अत्यंत साहसी, निर्भिक तसेच दिन दुःखींचे करुणासागर होते. ऐन तारुण्यात विशाल साम्राज्याचा त्याग करून दीक्षा घेऊन स्वपर कल्याणकारी साधनेत समर्पित झाले.
साधू जीवनात त्यांनी साडेबारा वर्ष कठोर तप साधना एकांतात केली. त्यांचे साधक जीवन म्हणजे समता, सहिष्णुता, क्षमा, तपस्या व ध्यान यांचा अचूक संगम होता. मानव, दानव, देवनिर्मित उपसर्गाना त्यांनी अदम्य साहस, अपराजेय संकल्प व अनंत आत्मबलाच्या जोरावर पराजित केले. महावीरांच्या साधक जीवनाचा अध्याय समतेच्या साधनेने सुरु झाला व समतेच्या सिद्धीमध्ये त्याची परिसमाप्ती झाली. केवळज्ञान, केवळदर्शन प्राप्तीमुळे ते सर्वदर्शी सर्वज्ञ झाले व मुक्तीच्या दारावर पोहोचले. भगवान महावीरांनी कैवल्यप्राप्तीनंतर चत्विध संघाची स्थापना केली. साधू साध्वींसाठी श्रमण श्रमणी तर सामान्य संसारी गृहस्थाश्रमी लोकांसाठी श्रावक-श्राविका वर्ग निर्माण केला. संघाची व्यवस्था, शिक्षा व अनुशासन योग्य व्यक्तींच्या हाती सोपवले. तथापी मूलतः ती आत्मानुशासनानेच संचलित होती, त्यांनी विनय धर्माला सर्वात उच्च स्थान दिले.
स्वतःला सापडलेले सत्य, आत्मरहस्य याचा जनतेला बोध देऊन साधकाचा आंतरात्मा जागृत करण्यासाठी त्यांनी जे अध्यात्मिक चिंतन दिले ते जात, कुळ, पंथ व देश या सर्वांच्या सीमेत बदध करता येणार नाही. त्यांची जीवन साधना एकीकडे प्राणीमात्राच्या अंतर्मनातील सुप्त चेतना जागृत करते तर त्यांचा उपदेश समाजातील मोहनद्रेचा भंग करतो. भगवान महावीरांनी सर्वसामान्य माणसांना आपल्या ज्ञानाचा बोध व्हावा म्हणून संस्कृत ऐवजी प्रचलित जनभाषा अर्धमागधीचा वापर सुरू केला. गुलाम प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता, धर्मयुद्ध देवतांच्या नावावर पुरोहितांद्वारे होणारे जनसामान्याचे शोषण, यज्ञ यागात लाखो प्राण्यांचा बळी, नरबळी प्रथा, स्त्रियांना कनिष्ठ दर्जा ह्या रुढी नष्ट करण्यासाठी ते कटिबदध झाले. त्यांनी ईश्वराला, परमात्म्याला सृष्टीचा निर्माता, शासक न मानता आत्मवादाला, पुरुषार्थाला प्राधान्य दिले. परमात्मा आत्मा व सृष्टीमध्ये ढवळाढवळ करत नाही. तो निर्विकार, निरंजन व सिद्ध स्वरूप आहे. दुःखदाता, दुःख भोक्ता व दुःखमोक्ता स्वयं आत्माच आहे. कर्म विरहित, परम विकसित शुद्ध आत्माच परमात्मा बनतो. त्यामुळे ईश्वर एक नाही तर अनेक आहेत. जातीयवादाला विरोध करतांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे जन्माने होत नाहीत तर आपण अंगीकारलेल्या स्वीकृत कर्मामुळेच होतात. कोणालाही अस्पृश्य न मानता आपण केलेल्या पापानांच अस्पृश्य समजावे. त्यांची दलितांविषयी सहानुभूती मौखिक नव्हती तर आपल्या शिष्यवृंदात त्यांनी इंद्रभूती, अग्निभूती वगैरे (ब्राह्मण) मेघकुमार, दर्शनभद्र वगैरे (क्षत्रिय) धन्ना शालिभद्र वगैरे (वैश्य) यांच्याबरोबरच हरिकेश मुनी (चांडाळ) मैतार्यमुनौ, अर्जुनमुनी (माळी) सहिष्णूज (कुंभार) वगैरे शूद्र या सर्वाना समान स्थान दिले. मानव जातीच्या स्वातंत्र्याबद्दल आवाज उठवित, गुलाम प्रथेला विरोध करतांना कोणीच कोणाचा ग्लाम नाही, दास नाही, नोकर नाही. स्वामी व सेवक ही मानव जातीला काळीमा फासणारी मोठी भिंत असून, त्यामुळेच अन्याय अत्याचाराचा जन्म होतो. भगवान महावीरांनी त्या काळात वनस्पती, पाणी, अग्नी, वायू व पृथ्वीत सुद्धा जीव असतो असे प्रतिपादन केले. सूक्ष्मजीव विज्ञानाबद्दल त्यांनी दिलेल्या माहितीची शोधकता अजून सुद्धा पूर्णत्वास आलेली नाही, पाण्याचा गैरवापर व वृक्षतोडीचा निषेध करून पर्यावरण संतुलन व संरक्षण आवश्यकतेचे महत्त्व दाखवून दिले.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हा भगवान महावीरांचा पंचज्जाम धर्म आहे. श्रमण- श्रमणी वर्गाला या महाव्रतांचे संपूर्णतः पालन आवश्यक आहे. तर श्रावक श्राविकांना 12 अणुव्रता द्वारे या तत्त्वांचे पालन सांगितलेले आहे. सामाजिक विषमतेचे मूळ कारण हिंसाच आहे. भ. महावीरांचा प्रथम संदेश “जगा आणि जगू द्या” हाच आहे. सर्व प्राणीमात्रांना आत्मवत समजून मन, वचन, काया ने अहिंसेचे पूर्णतः पालन आवश्यक. वस्तूला यथार्थ स्वरूपात प्रकट करणे म्हणजे सत्य आहे. संपूर्ण संसार सत्यावरच अधिष्ठित आहे. अस्तेय म्हणजे अचौर्य, परधन इच्छा, मुर्छा, तृष्णा, हस्तलाघव, खोटे वजन माप, वस्तूमध्ये भेसळ करणे, कोणतिही वस्तू मालकाला न विचारता घेणे हे एक प्रकारचे चौर्य आहे. कधीही करू नये. साधू साध्वींसाठी पूर्णतः ब्रह्मचर्य व्रताचे पालन व गृहस्थाश्रमी लोकांसाठी परस्त्रीचा त्याग व विवाहित स्व सी शी मर्यादित, असक्त न होता, विषय भोगांमध्ये संतुष्ट राहावे. कोणत्याही वस्तूस मुर्छा, ममत्व व बुद्धिपूर्वक ग्रहण करणे, मर्यादाहीन असामाजिक रूपात उपभोग घेणे म्हणजे परिग्रह होय. अपरिग्रह म्हणजे निस्पृहता, असक्तिचा त्याग, इच्छामुक्ती. अपरिग्रह मध्ये श्रावक स्वेच्छापूर्वक धन, संपत्ती, नोकर चाकर आदिची मर्यादा करतो. उर्वरित सहोदर बंधच्या नात्याने गरजवंतांना दान करतो. ह्या व्रतांमध्ये समत्वयोग व अनासक्तिचे शिक्षण दिल्यामूळे समाजवादी समाज रचनेची सर्व आवश्यक तत्वे विद्यमान आहेत.
सहाव्या दिशा परिमाण व्रत मध्ये शोषणाच्या हिंसात्मक प्रवृत्तींचे क्षेत्र मर्यादित संकुचित करणे हा उद्देश आहे. सातव्या उपभोग परिभोग परिमाण व्रत मध्ये भोग्य वस्तूंचा उपयोग सीमित करण्यास सांगितलेले आहे. आवश्यक भोगापभोगापासून नाही तर अमर्यादित भोगापासून मानवाच्या मुक्तीची कामना केलेली आहे. आठव्या अनर्थ दण्ड परिमाण व्रतामध्ये निरर्थक प्रवृत्तींना रोखण्याचे विधान केलेले आहे. नववा सामायिक व्रत समतेची आराधना करण्यासाठी व दहावा देसावगासिक व्रत संयमाच्या आवश्यकतेवर, अकरावा पौषधव्रत तपस्येबद्दल तर बारावा अतिथी संविभाग व्रत सुपात्र दानावर भर देतो. ह्या बारा व्रतांबरोबरच 15 कर्मदान सुद्धा वर्जित केलेले आहे. यामध्ये हिंसा अधिक मात्रात असेल असे व समाजविरोधी तत्त्वांना पोषण करणारे व्यवसाय करु नये याचा सामावेश आहे.
भ. महावीरांनी मानव हितार्थ दिलेले चार मुख्य सिद्धांत म्हणजे जीवनात अहिंसा, विचारांमध्ये अनेकांत दृष्टी, वाणीमध्ये स्यादवाद, अपेक्षावाद व समाजात अपरिग्रह सिद्धांत. महावीरांचे जीवनदर्शन, तत्त्वचिंतन इतके वैज्ञानिक, सर्व कालिक आहे की आजच्या विश्वातील संपूर्ण जटिल कठीण समस्यांचे निराकरण करण्यास समर्थ आहे. अनेकांत वाद म्हणजे एकच सत्य अनेक प्रकाराने व्यक्त करण्याची पद्धती होय. अनेक वेळा सत्याचे स्वरूप सुद्धा विविधांगी असते. वस्तूतील अनेक विरोधी तत्वांना सापेक्ष दृष्टीने बघणे आणि स्वीकारणे म्हणजे अनेकांत वाद. सत्यासंबंधी हट्टाग्रही दुराग्रही नको म्हणून स्यादवाद तत्वाची निर्मिती केली. वस्तूमध्ये असलेल्या अनेक धर्माचे सापेक्ष दृष्टीने विवेचन करणे म्हणजे स्याद्वाद. साऱ्या ठराविक चाकोऱ्या साऱ्या संकुचितता ह्या परम सत्याला प्रकट करू शकत नाहीत म्हणून प्रत्येक वक्तव्यास स्यात् (कथंचित, परहॅप्स) जोडतात. सत्या संबंधी सारी वक्तव्य एकाच वेळी सार्थक होऊ शकतात. प्रत्येक वस्तूचे अपेक्षापूर्वक विश्लेषण केल्यास सात विकल्प बनतात. यालाच सप्तभंगी म्हणतात. विरोधकांचा दृष्टिकोन पारखून, आपला एकांगी दृष्टिकोन सोडून स्याद्वाद तत्त्वाचा अवलंब केल्यास समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही. सर्वधर्म समभाव हा अनेकान्तवाद तत्वाचा उत्तम अविष्कार आहे.
स्पर्धात्मक तुलना, संघर्ष, प्रतिस्पर्धा यामुळे मानव संकुचित बनून सर्वत्र अशांती, असंतोष, दुःख यामध्ये वाढ होत आहे. प्रगत औदयोगिक युगात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे तर गरीब अधिक गरीब होत आहे. अन्न, वस्त्र व निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. काहींना पोटाची भूक भागविण्या इतकेही अन्न मिळत नाही तर दुसरीकडे क्षमतेपेक्षा अधिक अन्न बनविल्यामुळे फेकले जाते. काहींना अंग झाकण्याइतके ही वस्त्र मिळत नाही तर दूसरीकडे मॅचिंग व फॅशनच्या नादात कॅपड्यांचा ढीग रचला जातो. काहीजण गगनचुंबी इमारतीत राहतात तर काहीजण झोपडी मध्ये. काहीजणांना तर फुटपाथचा आश्रय घ्यावा लागतो. आजच्या शिक्षण पद्धतीत पाश्चातांचे अंधानुकरण, व्यावहारिक दृष्टिकोनाचा अभाव, आर्थिक निर्भरता, आरक्षण यामुळे पात्रतेनुसार समान शैक्षणिक संधी उपलब्ध होत नाही. झटपट श्रीमंत बनण्याच्या अभिलाषेने आज व्यापारी, कर्मचारी, शेतकरी व जनतेमध्ये नैतिकता नष्ट होऊन सर्वत्र भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. आज धर्माच्या नावाखाली चाललेल्या दहशतवादी कारवायांमुळे सर्व जग संत्रस्त झाले आहे. वाढती लोकसंख्या, आवश्यक साधनसामुग्रीचा अभाव, सामाजिक विषमता, विजेचा व पाण्याचा गैरवापर, पर्यावरण असंतुलन, सामाजिक कार्यात खर्चिक आँडंबर ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर भगवान महावीरांच्या सिद्धांतात, व्रतात सापडून येते. याची फलश्रुती म्हणजे इच्छांचे नियमन, समाज उपयोगी साधनांचे स्वामीत्व विसर्जन, शोषणमुक्त समाजाची स्थापना,
जनहितासाठी संविभाग दान व आध्यात्मशुध्दी आहे. सत्यं शिवं सुन्दरम् चे प्रतिक असलेले भ. महावीरांचे पुनीत चरित्र अनंत काळ, युग-युगान्तरात जीवनोस्थानाचा अमर संदेश देत राहील. भ. महावीरांना कोटिशः वंदन!
-डॉ. पारस सुराणा