51 वा स्मृतिदिन 22 एप्रिल – आठवणींना उजाळा
“51 वा स्मृतिदिन 22 एप्रिल
अरविंद गुजराथी सिन्नर
खाण्यासाठी अन्न नाही, पिण्याला पाणी नाही, हाताला काम नाही अशा या भयान होरपळलेल्या सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते व विडी कामगार नेते यांच्या दुष्काळाने नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी २२ एप्रिल १९७३ रोजी एक प्रचंड ऐतिहासिक मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला होता, मोर्चावर काही समाज कंटकांनी दगडफेक केल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १) ज्ञानेश्वर विठोबा साठे २) अशोक रामभाऊ पगार ३) चिंतामण रामचंद्र क्षत्रिय ४) गणपत गंगाधर वासुदेव ५) अशोक गणपत कवाडे हे हुतात्मे शहिद झाले.
या शहीद झालेल्या हुतात्म्यांचे चिरःकाल स्मरण रहावे म्हणुन एक भव्य हुतात्मा स्मारक उभे करण्याची सुचना पुढे आल्याने याची संपुर्ण जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली एक हुतात्मा स्मारक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सन १९७३ ते १९८९ पर्यंत १५ वर्षे जागेसाठी पाठपुरावा करून अखेर तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी सिन्नर मध्ये समक्ष भेट देऊन सिन्नर नगरपालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी श्री. दैठणकर सोो. यांना हुतात्मा स्मारकासाठी जागा देण्याचे आदेश दिले व त्याप्रमाणे नियमानुसार जागा देण्यात आली. त्यानंतर हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्यातून नगर पालिका कार्यालयासमोर एक भव्य हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले असून दरवर्षी २२ एप्रिल रोजी ठिक १२ वा. २ मिनिटांनी नगरपालिकाचा भोंगा वाजवून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
याहीवर्षी ५१ वा स्मृतिदिन २२ एप्रिल २०२४ रोजी ठिक १२ वा. २ मिनिटांनी भोंगा वाजवून मा.श्री. संभाजी गायकवाड साहेब (पोलिस निरीक्षक) यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराथी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे केले आहे.