उच्चभ्रू वस्तीतील घरफोडी प्रकरणी तीन संशयितांना अटक ; ५७ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
उच्चभ्रू वस्तीतील घरफोडी प्रकरणी तीन संशयितांना अटक ;
५७ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
Advertisement
नाशिक प्रतिनिधी
राका कॉलनीतील गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेविकेच्या घरात घरफोडी करून सुमारे एक किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. या घरफोडीतील मुख्य संशयित पुणे जिल्ह्यातील असून त्याच्याविरोधात घरफोडी, चोरीचे सुमारे ४० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांकडून पोलिसांनी घरफोडीतील सोन्याचे दागिने हस्तगत केले असून चोरट्यांनी परकीय चलन नदीत फेकल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.गोरखसिंग गागासिंग टाक (३५), दीपक तुकाराम जाधव (३३) व अमनसिंग पंजाबसिंग टाक (३०, तिघे रा. भिमवाडी, गंजमाळ) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. तिघांनी मिळून मंगळवारी (दि.६) मध्यरात्री राका कॉलनी येथील नवकार रेसिडेन्सी येथील रहिवासी डॉ. ममता शैलेंद्र पाटील यांच्या घरात घरफोडी करून ५७ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १८०० अमेरीकन डॉलर असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सुचनांनुसार उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला. त्यात राका कॉलनीतील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना दुचाकीस्वार तिघे आढळले. त्यानुसार पोलिसांनी राका कॉलनीपासून सुमारे ५ ते ६ किमी अंतरावरील सीसीटीव्ही तपासले. त्यात दुचाकीस्वार चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीवरून गंजमाळपर्यंत चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर गंजमाळ परिसरात सापळा रचून तिघांनाही घरातून पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी घरफोडीतील ८६६.३४० ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिणे व लगड हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच १५ जीजी ०२५१ क्रमांकाची दुचाकी व तिघांचे मोबाइल असा एकूण ५७ लाख ६६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्यांकडील दुचाकीही त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी तपास करणाऱ्या पथकास ७५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.