आधार – प्रौढ मतिमंद संगोपन केंद्र, सातारा रामनवमीस प्रवेशासाठी सज्ज
आधार – प्रौढ मतिमंद संगोपन केंद्र सातारा येथे रामनवमी पासून सुरू
विश्वास गोरे – अध्यक्ष
बदलापूर ठाणे आणि डुकरा इगतपुरी येथील प्रकल्पावर आधारित आजीवन निवासी संकुल कार्यरत होणार.
सातारा प्रतिनिधी :
ठाणे, नाशिक जिल्ह्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातही ‘आधार’ या प्रौढ मतिमंदांचे आजीवन संगोपन करणाऱ्या संस्थेचे निवासी संकुल रामनवमीच्या मुहूर्तावर प्रवेशासाठी सज्ज होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विश्वास गोरे यांनी दिली.
दि असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ मेंटली रिटायर्ड चिल्ड्रेन, मुंबई या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आधार या प्रौढ मतिमंदांसाठीच्या तिसऱ्या आजीवन निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन गेल्यावर्षी 30 मार्च रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर हरपळवाडी, जि.सातारा येथे करण्यात आले होते. सुमारे १०० विशेष मुलांची संगोपन क्षमता असणारे हे संकुल येत्या रामनवमीपासून सुरू होत असून सुरुवातीला २५ मुलांच्या प्रवेशासाठी सज्ज झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गेल्या ३० वर्षांपासून संस्था कार्यरत असून तेथे आज २३५ मतिमंदांचे तहहयात संगोपन केले जात आहे. नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव डुकरा(इगतपुरी) येथे संस्थेने बारा वर्षांपूर्वी निवासी संकुल सुरू केले असून तेथे १११ प्रौढ मतिमंदांचे संगोपन केले जात आहे. सातारा येथील केंद्रामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर,सातारा, सोलापूर,रत्नागिरी, बेळगाव आधी जिल्ह्यातील विशेष मुलांच्या पालकांना मोठा आधार मिळणार आहे.
Advertisement
आधारची यापूर्वीची दोन्ही संकुले विविध सोयी सुविधांनी सज्ज असून तेथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, उत्तम निवास व्यवस्था, सुसज्ज स्वयंपाकघर व भोजन कक्ष, खेळण्यासाठी मोकळी जागा, औषधोपचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध असून सातारा येथेही या सुविधा अद्ययावत रित्या पुरवल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधारच्या प्रत्येक केंद्रात जपले जाणारे प्रत्येक मतिमंदाचे स्वातंत्र्य व केली जाणारी सुश्रुषा. यामुळे प्रत्येक प्रौढ मतिमंद आला आधार हे आपले हक्काचे घर वाटते,जेथे त्याला स्वतंत्रपणे जगण्याची मुभा मिळते.
मॉरिशियस येथील आदित फाऊंडेशनचे संस्थापक अभिजीत बोरा यांनी हरपळवाडी सातारा येथील आपली स्वमालकीची चार एकर जागा आधार संस्थेला उपलब्ध करून दिली आहे. विशेष मुलांसाठी काहीतरी भरीव काम करण्याची इच्छा असलेल्या अभिजीत बोरा यांना ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अच्युत गोडबोले व श्रीकृष्ण गोडबोले यांनी आधारचे अध्यक्ष विश्वास गोरे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांची भेट घडवून आणत सातारा केंद्राच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवली. आदित फाउंडेशनचे डॉक्टर दिनेश चांडक यांनी आधारच्या ठाणे आणि नाशिक या दोन्ही केंद्रांना भेटी देत संस्थेच्या कार्याची पाहणी करून माहिती घेतली. अभिजीत बोरा केवळ चार एकर जमीन देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी प्रकल्पाच्या उभारणीसाठीची आर्थिक मदत आदित फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली.
सोलापूर व जळगाव येथील मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या इतर संस्थांना मदत करून महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील सुमारे ४०० हून अधिक प्रौढ मतिमंदांचा सांभाळ करत ४०० कुटुंबांना दिलासा दिला आहे. यामुळे मतिमंदांसाठी काम करणारी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी संस्था म्हणून आधारचे नाव घेतले जाते.