क्राईम

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना चिंताजनक, दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला?


  • नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत
  • वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना चिंताजनक 
  • दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला?

 

मायकल खरात::नाशिकरोड, आपली दुनियादारी

Advertisement

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय कार्यालयांसह, रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड, व्यापारी संकुल, शाळा, न्यायालय, आय एस पी प्रेस, वाटेल तिथे कुठेही अ भरणारे अनाधिकृत भाजी बाजार, फळबाजार, रस्त्यालगत असलेले झिरो मार्जिनच्या आस्थापना, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय(बिटको रुग्णालय), नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालय, अशी अनेक ठिकाण आहेत. ज्यामुळे येथे गर्दी ही नित्याचीच. गजबजलेलं ठिकाण आणि गर्दी म्हणजे चोरांसाठी त्यांची कलाकारी दाखवण्याची पर्वणी. या घटना रोखण्यासाठी पोलीस कमी पडतात ही बाब जेव्हढी महत्वाची तितकाच महत्त्वाचा नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचा कारभार.या विभागाच्या कार्यप्रणालीवर संतप्त प्रतिक्रिया नाशिकरोड मधील सर्वसामान्यांकडून उमटत आहेत.ही लोक नेमकी कुणासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून काम करतात हे आजवर खरंतर कळलेलं नाही. हातात पावती पुस्तक घेऊन फिरणारा महापालिकेचा माणूस सर्रास बाजारात वावरताना दिसतो. दहा वीस रुपयाच्या पावत्या फाडल्या जातात. काही जणांना तर पावत्याही दिल्या जात नाहीत. पैसे मात्र घेतले जातात,अशी देखील माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. म्हणजे पावत्या फाडून रस्त्यावर भरणाऱ्या बेकायदेशीर बाजाराला अधिकृत करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना. मग बातमी लागताच फक्त गोरगरिबांवर आपला बुलडोजर चालवायचा इतकच आजवर होत आले आहे. या परिसरात काही अनधिकृत पार्किंग देखील आहेत. त्या ठिकाणाहून देखील दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.पेट्रोल चोरीच्या घटना या अनधिकृत पार्किंग मध्ये सर्रास घडत असतात अशा अनधिकृत पार्किंग शोधून त्या देखील बंद करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सर्रास रस्त्यावर कुठेही अनधिकृत पार्किंग केली जाते, वाहतूक शाखेचे याकडे सर्रास दुर्लक्ष, जिथे खरी गरज तिथे न थांबता नको त्या पॉइंटला थांबत कारवाई करतात की आणखी काय करतात माहित नाही, पण काहीतरी करतात.कामात व्यस्तच असतात. रोज सकाळी व दुपारी जेलरोड मार्गावर असलेल्या शाळा भरततांना व सुटताना तुफान गर्दी होते याकडेही कुणाचंही लक्ष नसते. कुणीही या, कुठेही गाडा लावा, टपरी टाका, हातगाडी लावा, काहीही करा, बेशिस्तपणाने नाशिक रोड परिसरात कळस गाठला आहे. विरोधात बातम्या प्रसिद्ध करताना पत्रकाराला असुरी आनंद होत नाही, फक्त तुम्ही विसरलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला वेळीच लक्षात आणून देणे कर्तव्य असल्याने बातम्या प्रसिद्ध होतात तरी देखील समाज हिताचं कार्य करूनही पत्रकार कायम खलनायकच ठरतो. चोरीच्या घटना घडत आहेत यामध्ये पोलिसांची पाठराखण नाही त्यांची देखील यंत्रणा निश्चितच कुठेतरी कमी पडतेय याचं अवलोकन त्यांनी करायलाच हवं मात्र नाशिक रोड परिसरात अशा प्रकारे विद्रूपीकरण करून अनाधिकृतीकरण वाढत चालल्यानेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *