ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

जलजीवन योजनेतील अपूर्णतेमुळे पाणीटंचाईची शक्यता आ. खताळ; टंचाईपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न 


जलजीवन योजनेतील अपूर्णतेमुळे पाणीटंचाईची शक्यता

 

आ. खताळ; टंचाईपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न 

 

संगमनेर / प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण झालेल्या दाखविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत, तसेच टँकर सुरू करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

तालुक्यात आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत प्रांताधिकारी कार्यालयात टंचाईपूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंता शैलेजा डावखरे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता तसेच ग्रामपाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

 

मागील वर्षी तालुक्यात केवळ २१ पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र सध्या ज्या भागांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन योजना राबविण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणीही सायखिंडी व पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. तसेच सायखिंडी व पठार भागातील काही वाड्या-वस्त्यांमध्ये अद्याप जलजीवन योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यास तात्काळ पाहणी करून टँकर सुरू करण्यात यावेत आणि कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अडचण येऊ देऊ नये. जलजीवन योजनेचे काम पूर्ण दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर ते अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.

 

कोट-

“ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासेल, त्या सर्व गावांचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टंचाईच्या काळात तालुक्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याविना राहावे लागू नये, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी तातडीने दूर करून, आवश्यक ठिकाणी त्वरित टँकर सुरू करण्यात यावेत. नागरिकांना पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क अबाधित राहिला पाहिजे.”

 

— अमोल खताळ (आमदार)

………………………………………..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *