ताज्या घडामोडी

पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली श्रीरामपूर शहरात खळबळ, बी.एन.एस. १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल


पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली

श्रीरामपूर शहरात खळबळ, बी.एन.एस. १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :

दारूच्या व्यसनातून होणाऱ्या मारहाणी व संशयाच्या कारणावरून पत्नीनेच पतीच्या डोक्यात लाकूड मारून व गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील दत्तनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता दत्तनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार टिळकनगर बीटचे बीट अंमलदार पो.कॉ. कैलास तुकाराम झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृत इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून गळ्याच्या उजव्या बाजूस काळसर व्रण आढळून आला. सदर इसमाचे नाव मानसकुमार शाहु असे असून तो विजु पटाट यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या पत्नीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत मृतदेह तात्काळ अंत्यविधीसाठी नेण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांचा संशय बळावला.

Advertisement

पोलिसांनी मृतदेह साखर कामगार रुग्णालयात हलविला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पुढील शवविच्छेदन पी.एम.टी. रुग्णालय, लोणी येथे करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण “Ligature Strangulation” (गळा आवळल्याने मृत्यू) असे स्पष्ट करण्यात आले असून रासायनिक विश्लेषणासाठी अवयव राखून ठेवण्यात आले आहेत.

आकस्मिक मृत्यू क्रमांक १०/२०२६ अंतर्गत चौकशीदरम्यान पोलीस निरीक्षक देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी मयत मानस ची पत्नी हिची सखोल चौकशी केली असता तिने पती मानसकुमार शाहु हा दारू पिऊन नेहमी मारहाण करत असून संशय घेत असल्याने त्याच्या डोक्यात आंब्याचे लाकूड मारून व गळा आवळून ठार मारल्याची कबुली दिली.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मयत मानसकुमार पत्नी  हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

……

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *