क्राईम

खाकीतील माणूस : कर्तव्य, संवेदना आणि समाजाशी नाते जपणाऱ्या अधिकाऱ्याचा वाढदिवस


खाकीतील माणूस : कर्तव्य, संवेदना आणि समाजाशी नाते जपणाऱ्या अधिकाऱ्याचा वाढदिवस

……. कुमार कडलग…….. नाशिक…….

आजचा दिवस पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासाठी केवळ वैयक्तिक वाढदिवसाचा नाही, तर त्यांच्या कार्यपद्धतीतून उलगडणाऱ्या लोकाभिमुख पोलिसिंगच्या मूल्यांचा आढावा घेण्याचा दिवस आहे. खाकी वर्दी ही अनेकांसाठी अधिकाराची निशाणी असते; पण गुरव यांच्यासाठी ती जबाबदारीची आठवण आहे.समाजाप्रती, कायद्याप्रती आणि माणुसकीप्रती.

पोलीस सेवेत येताना प्रत्येक अधिकारी काही स्वप्नं घेऊन येतो. काळाच्या ओघात ती स्वप्नं धुसर होतात, तडजोडींच्या फेऱ्यात अडकतात. मात्र गुरव यांच्या कामकाजात आजही एक गोष्ट ठळकपणे दिसते.पोलीस ठाणे म्हणजे कार्यालय नाही, ते गावाचे कुटुंब आहे ही ठाम भावना. सहाय्यक पोलीस निरीक्षक असोत वा पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी ही भूमिका केवळ सांगितली नाही, तर जगून दाखवली आहे.

नैताळे येथील श्री मतोबा महाराज मंदिरातील चोरीप्रकरण हे त्यांच्या कार्यशैलीचे अलीकडचे उदाहरण ठरते. श्रद्धेवर आघात झाल्यावर श्रद्धाळू,कायदा हातात घेण्याची शक्यता असते, संताप अनावर होतो. अशा वेळी कडक कारवाईपेक्षा आधी गरज असते ती संवादाची, समजुतीची आणि विश्वास निर्माण करण्याची. गुरव यांनी तेच केले.घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थिती, ग्रामस्थांशी थेट संवाद, तपासातील प्रत्येक टप्प्याची माहिती देत आश्वासन. तपासाची गती आणि संवेदनशीलता यांचा समतोल त्यांनी साधला.

त्यांचे कर्तृत्व केवळ एका घटनेपुरते मर्यादित नाही. त्यांच्या सेवाकाळात अनेक वेळा तणावग्रस्त परिस्थिती शांततेत बदलताना दिसली आहे. लहानसहान वाद असोत, मोठे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न असोत;कायदा आणि करुणा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांच्या कामकाजात सातत्याने जाणवतो. त्यामुळेच पोलीस आणि समाज यांच्यातील दरी कमी करण्याचे काम त्यांनी केले आहे.

आजच्या काळात पोलिसांवर टीका करणे सोपे आहे. काही वेळा ती योग्यही असते. पण अशा वेळी कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाचा धांडोळा घेणेही तितकेच आवश्यक असते. कारण समाजाचा पोलिसांवरील विश्वास हा अशाच अधिकाऱ्यांमुळे जिवंत राहतो. गुरव यांचे काम सांगते की पोलिसिंग म्हणजे केवळ गुन्हे नोंदवणे नाही, तर लोकांचे दु:ख ऐकणे, राग समजून घेणे आणि न्यायाचा मार्ग दाखवणे होय.

वाढदिवस हा आयुष्यातील एक टप्पा असतो.मागे वळून पाहण्याचा आणि पुढे जाण्याचा. आज त्यांच्या वाढदिवशी, त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहताना असे वाटते की खाकीतही माणूसपण जपता येते, अधिकारातही नम्रता असू शकते आणि कर्तव्यातही आपुलकी असू शकते.

पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. समाजाशी नाते जपणारी, संवेदनशील आणि जबाबदार पोलिसिंगची हीच परंपरा त्यांच्या हातून पुढेही घडत राहो.हीच अपेक्षा.

……………..

Advertisement

खाकीचा पायगुण : जी वास्तू हागणदारी झाली होती, तिथे कायद्याचा दरारा उभा राहिला…

निफाड पोलीस ठाण्याच्या इतिहासात एक काळ असा होता, की नव्याने बांधलेली, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली इमारत असूनही पोलीस ठाणे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते.एका कोपऱ्यात.. कोंदाटलेल्या जागेत.. कामकाज सुरु होते. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पॉलिसिंगच्या कार्यक्षमतेवर झाला नाही तरच नवल.अनेक महिने नवीन इमारत पूर्ण होऊनही ती वापरात येऊ शकली नाही. कारण काय?

स्थानिक अतिक्रमण, दुर्लक्ष, प्रशासनाची उदासीनता आणि हळूहळू त्या वास्तूला पडलेला हागणदारीचा विळखा.

ज्या वास्तूतून कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा होता, तिथे कायद्याचीच अवहेलना होत होती. ही केवळ इमारतीची दुर्दशा नव्हती, तर कायद्याच्या प्रतिष्ठेची विटंबना होती.

अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले आणि मनावर घेतले.

तेव्हा त्यांनी कुठलेही भावनिक भाषण केले नाही, कुणावर दोष ढकलला नाही. त्यांनी जे केले, ते पोलीस अधिकाऱ्याने करायला हवे तेच कायद्याच्या चौकटीत राहून, पण ठामपणे. सर्वात आधी त्यांनी नव्या पोलीस ठाण्याभोवती झालेले अतिक्रमण उध्वस्त केले. कुणाची ओळख, कुणाचा दबाव, कोणतीही भीती आड आली नाही. कायदा सर्वांसाठी समान,हा संदेश कृतीतून दिला गेला.

यानंतर सुरू झाली प्रत्यक्ष स्वच्छतेची मोहीम. जी वास्तू जणू काही हागणदारीचे ठिकाण बनली होती, ती साफ करण्यात आली. परिसर स्वच्छ झाला, वातावरण बदलले. आणि मगत्या इमारतीत प्रत्यक्ष पोलीस ठाण्याचा कारभार सुरू झाला.

हा केवळ कार्यालय स्थलांतराचा प्रसंग नव्हता. ही होती वास्तूप्राणप्रतिष्ठा. ज्या दिवशी पोलीस ठाण्याने त्या इमारतीत पाऊल ठेवले, त्या दिवसापासून त्या परिसराने कात टाकली. कायदा-सुव्यवस्थेचा दरारा दिसू लागला. अतिक्रमण, बेशिस्त, गुन्हेगारी प्रवृत्ती या साऱ्यांवर एक मानसिक अंकुश बसला.

लोक म्हणतात, “पायगुण असतो.”

निफाड पोलीस ठाण्याच्या बाबतीत तो अनुभव आज अनेकजण बोलून दाखवतात. कारण वास्तू बदलली, आणि परिसरही बदलला. कायदा केवळ फाईलीतून नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरला.

पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे हे काम त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक आहे. गुन्हे तपास, बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था हा तर त्यांच्या कामाचा भाग आहेच. पण संस्थेची प्रतिष्ठा, पोलिस ठाण्याचा दरारा आणि समाजाला दिला जाणारा संदेश याची जाण असलेला अधिकारी क्वचितच आढळतो.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा घेताना, निफाड पोलीस ठाण्याच्या या नव्या इमारतीची कहाणी विशेषत्वाने आठवते. कारण ती कहाणी सांगते.

खाकीचा दांडा योग्य हातात असेल, तर केवळ गुन्हेगारच नव्हे, तर व्यवस्था देखील सुधरते.

आणि कधी कधी, एका अधिकाऱ्याचा पायगुण संपूर्ण परिसराला नवी दिशा देतो.

*……. दुनियादारी won’t lie……..*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *