प्रविण धनाईत आत्महत्या ; पोलिस अधीक्षकांची जबाबदारी वाढली; सुमोटो चौकशी हाच विश्वास पुनर्स्थापनेचा मार्ग
प्रविण धनाईत आत्महत्या ;
पोलिस अधीक्षकांची जबाबदारी वाढली;
सुमोटो चौकशी हाच विश्वास पुनर्स्थापनेचा मार्ग
प्रविण धनाईत आत्महत्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने आता नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षकांवर थेट जबाबदारी येऊन ठेपली आहे. हे प्रकरण केवळ एका युवकाच्या मृत्यूपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेची कसोटी बनले आहे.
सुमोटो दखल का आवश्यक?
तक्रारदाराच्याच वडिलांनी मूळ गुन्हा खोटा असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
अधिकारक्षेत्र डावलून गुन्हा नोंदविल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित आहेत.दहशत, धमकी आणि मारहाणीनंतर युवकाने आत्महत्या केली आहे.अशा परिस्थितीत पोलिस अधीक्षकांनी सुमोटो दखल घेऊन स्वतंत्र चौकशी आदेशित करणे ही केवळ अपेक्षा नव्हे, तर संस्थात्मक गरज आहे.
गौरवशाली इतिहास कलंकित होऊ देऊ नका
नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचा इतिहास गौरवशाली आहे. संघटित गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि संवेदनशील प्रकरणांत निष्पक्ष तपास ही या शाखेची ओळख राहिली आहे.मात्र,जर खोट्या गुन्ह्याचा, दिशाभूल करणाऱ्या तपासाचा किंवा दबावाखालील कारवाईचा ठपका गुन्हे शाखेवर बसला,तर हा कलंक एका प्रकरणापुरता न राहता संपूर्ण इतिहासावर उमटेल.हा इतिहास वाचवण्याची जबाबदारी थेट पोलिस अधीक्षकांवर आहे.
तपास करणारे ते कर्मचारी कोण?
या प्रकरणात सातत्याने एक प्रश्न उपस्थित होत आहे.नाशिक स्थानिक गुन्हे शाखेतून तपास करणारे ते कर्मचारी कोण आहेत?त्यांनी कुणाच्या आदेशावरून या प्रकरणात हस्तक्षेप केला?
अधिकारक्षेत्र, पुरावे आणि तक्रारींची छाननी करताना कोणती प्रक्रिया पाळली गेली?त्यांच्या कार्यवाहीची लेखी नोंद, आदेशपत्रे व केस डायरी उपलब्ध आहेत का?या प्रश्नांची उत्तरे व्यक्तिगत आरोपांऐवजी प्रशासकीय चौकशीतूनच मिळाली पाहिजेत.
विश्वास पुनर्स्थापनेची जबाबदारी
आज नागरिकांचा प्रश्न सरळ आहे.पोलीस यंत्रणा स्वतःच्या चुका तपासण्याचे धाडस दाखवणार का?जर पोलिस अधीक्षकांनी सुमोटो चौकशी,स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास,आणि संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली,तरच नाशिक पोलिसांचा गौरवशाली वारसा अबाधित राहील.अन्यथा,मौन म्हणजे केवळ मौन नव्हे,ते संशयाला खतपाणी घालणारे ठरेल.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांची दादागिरी
नाशिक ग्रामिण पोलिस दलात काही पोलिस कर्मचाऱ्यांची नेहमीच दादागिरी राहिली आहे. याच दादा कंपूतील दोन तिन कर्मचाऱ्यांच्या दादा तपासाने प्रवीणचा बळी घेतला अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.यातील एक दादा सापुतारा नाशिक मार्गावरील पोलिस ठाण्यात काम करीत असतांना गुटखा वाहतूक आणि अन्य अवैध व्यवसाय मॅनेजमेंटमध्ये तरबेज होता. त्याच पात्रतेवर त्याची स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागली असून पूर्वीसारखीच मॅनेजमेंट सुखनैव सुरु असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी राखून आहे. याच मर्जीचा फायदा लाटून सहकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध षडयंत्र करण्याचा नवा उद्योग सुरु केला असून इनपुट लक्षात घेऊन त्याचे सारे लाड वरिष्ठ अधिकारी पुरवीत असल्याची चर्चा पोलिस दलात सुरु आहे. आपली अवैध ‘वट’ कायम राखण्यासाठी हा कर्मचारी खाकीचे ‘शील’ पायदळी तुडवून ‘धन’ कमवीत अजय राहण्याचा खटाटोप सुरु असतांना पोलिस अधीक्षक गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.
-बी. के. तथा कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie



