महाराष्ट्र

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग राजकारणाच्या रुळावरून घसरतोय ; विकासाचा रुळ की राजकारणाचा सापळा?


नाशिक–पुणे रेल्वे मार्ग राजकारणाच्या रुळावरून घसरतोय ;

विकासाचा रुळ की राजकारणाचा सापळा?

संपादकीय

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक भविष्याचा कणा आहे. मात्र दुर्दैवाने, हा प्रकल्प आता विकासाच्या गतीवर नाही तर राजकीय स्वार्थांच्या रुळावर धावताना दिसतो आहे.

संगमनेर मार्गे जाणारा हा रेल्वेमार्ग सर्वार्थाने तर्कसंगत, लोकाभिमुख आणि भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर आहे. व्यापारी वाहतूक, औद्योगिक विकास, शैक्षणिक दळणवळण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सगळ्यांसाठी संगमनेर हा नैसर्गिक संगमबिंदू आहे. तरीही अचानक “धोकादायक भूभाग”, “तांत्रिक अडथळे” अशा कारणांची ढाल पुढे करत मार्ग शिर्डीकडे वळवण्याचा प्रयत्न होतो आहे.

प्रश्न साधा आहे,हे अडथळे काल निर्माण झाले का?
की निवडणुकांच्या आधीच काहींना नवे गणितं जुळवायचे आहेत?
नारायणगावजवळील जीएमआरडी प्रकल्पाचा मुद्दा आज पुढे केला जातो आहे. पण तो प्रकल्प मंजूर होत असताना रेल्वे मार्गाचे नियोजन कुठे होते? आज जर हा मार्ग धोकादायक वाटतो, तर काल तो सुरक्षित कसा होता? उत्तरं नाही, आहेत फक्त सबबी!

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लोकभावनांकडे होणारे सरळसरळ दुर्लक्ष. संगमनेर, अकोले, राहाता, सिन्नर या पट्ट्यातील लाखो नागरिकांसाठी हा रेल्वे मार्ग जीवनवाहिनी आहे. तरीही निर्णय दिल्लीत बसून, जमिनीवर पाय न टेकवता घेतले जातात,हीच खरी लोकशाही आहे का?

Advertisement

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानभवनात केलेले आंदोलन हे केवळ प्रतीकात्मक नव्हते; ते सत्तेला आरसा दाखवणारे होते. “आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, मूक प्रेक्षक नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. पण प्रश्न असा आहे की,आ. खताळ हे ज्यांच्या ओंजळीने पाणी पितात त्या पूर्वेकडील नेत्यांची या मुद्द्यावर भूमिका काय आहे, आ. खताळ त्यांना स्पष्टपणे विचारण्याचे धाडस दाखवतील का?आहे. खताळ यांनी ज्यांनी या रेल्वे मार्गाचा आराखडा बदलण्यासाठी दिल्ली दरबारी राजकारण केले, ते संगमनेरचे प्रतिस्पर्धी आहेत, संगमनेरच्या विकासाचे पारंपरिक विरोधक आहेत, हे अनेक मुद्द्यावर स्पष्ट असतांना त्यांच्याच गळ्यात गळा घालून आहे. खताळ संगमनेरचा विकास कसा साधणार असा संगमनेरकरांना प्रश्न आहे.

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग हा श्रद्धेच्या राजकारणासाठी वळवला जात असेल, तर तो विकासाचा खून आहे. रेल्वे रुळांवर राजकीय भावनांची गाडी धावली, तर ती कधीच योग्य स्थानकावर पोहोचत नाही. विकासाला गणित लागते, श्रद्धा नाही.

आज निर्णय संगमनेरला डावलून घेतला गेला, तर उद्या इतर जिल्ह्यांच्याही विकासावर गदा येईल. म्हणून हा प्रश्न केवळ संगमनेरचा नाही.तो महाराष्ट्राच्या प्रादेशिक समतोलाचा आहे.

सरकारने स्पष्ट सांगावे,हा मार्ग नेमका कुठे जाणार?
तांत्रिक अहवाल सार्वजनिक का केले जात नाहीत?
आणि लोकांशी चर्चा न करता निर्णय का लादले जात आहेत?
जोपर्यंत या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत नाशिक–पुणे रेल्वे मार्गावरील राजकारण उघडं पाडणं हीच खरी पत्रकारिता आणि हीच जनतेची जबाबदारी आहे.

विकासाला रुळ हवा,राजकारणाला नाही.या गृहीतकावरच या मार्गाचा आराखडा अंमलात यायला हवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *