खा. वाजे यांचे कडवा कालव्याचे आवर्तन सोडण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना पत्र
खा. वाजे यांचे कडवा कालव्याचे आवर्तन सोडण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना पत्र
नाशिक प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील कडवा लाभ क्षेत्रात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने कडवा कालव्याचे आवर्तन सोडून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा. राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात खा. वाजे यांनी म्हटले आहे की,सिन्नर व निफाड तालुक्यातून जाणारा कडवा धरणावरील कालव्यावर बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. यावर्षी सिन्नर तालुक्यात पुरेश्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली नसून टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच उन्हाची तिव्रता वाढल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याकरिता आवर्तनाची मागणी होत आहे.
सिन्नर व निफाड तालुक्यातील मौजे किर्तांगळी, खडांगळी, पिंपळगाव, पंचाळे, महाजनपुर, सोनगाव, रामनगर (बेरवाडी), भुसे, औरंगपुर (श्रीरामपूर), भेंडाळी व लाभ क्षेत्रातील नागरिकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सद्य स्थितीत कडवा धरणात मुबलक पाणी साठा असून कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडल्यास सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेवातील पाणी योजनांचे तलाव व बंधारे या मध्ये पाणी सोडल्यास विहिरींना पाडार येऊन या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर कडवा धरणाच्या कालव्याचे आवर्तन सोडणे बाबत आपले स्तरावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी. असे या पत्रात म्हटले आहे.