क्राईम

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक जागरूकता अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे;  -संजय कुमार-मुख्य महाप्रबंधक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक जागरूकता अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे;

 -संजय कुमार-मुख्य महाप्रबंधक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

         मराठी संस्कृती जतन करा 

……………………………………………………………………………..

नाशिक (प्रतिनिधी) : आजच्या डिजीटल युगात आर्थिक फसवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाऊले उचलली आहेत. जोपर्यंत आपली स्वतःची वैयक्तिक फसवणूक होत नाही तोपर्यंत व्यक्तीला घटनेचे गांभीर्य लक्षात येत नाही. म्हणूनच प्रत्येकाने सजगपणे, जाणीवपूर्वक ऑनलाईन, डिजीटल व्यवहार करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही जागरूक करणे, सतर्क करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आर्थिक मोह, प्रलोभने ही आर्थिक गुन्हेगारीची मुख्य कारणे आहेत त्याचा वेळीच प्रतिबंध करा, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक संजय कुमार यांनी केले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., नाशिक, विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक व जनसेवा को-ऑप. बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकात्मिक लोकपाल योजना-2021’ ‘ग्राहक जागरूकता अभियान’ या योजने अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शरमन हॉल (गुरूदक्षिणा हॉल), कॉलेज रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यशाळेला नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक असे 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

मा. संजय कुमार पुढे म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायमच जनतेच्या आर्थिक सुरक्षतेसाठी, ग्राहक हितासाठी, आर्थिक कल्याणासाठी कटीबद्ध आहे. त्याच जाणिवेतून ग्राहक जागरूकता अभियान चळवळ आरबीआयने सुरू केली आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकावी.

नाशिक तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था संदीप जाधव म्हणाले की, नागरी सहकारी बँकांचे गुणवत्तापूर्ण ध्येय म्हणजे ग्राहकांचे परमोच्च समाधान करणे, ग्राहकांना न्याय मिळवून देणे हे आहे. परंतु आजकाल ठेवीदार, गुंतवणूकदार संस्थेच्या सक्षमतेकडे बघत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवते, त्यासाठी आर्थिक साक्षरता, सुरक्षितता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

नाशिकच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके म्हणाले की, आजच्या काळात आर्थिक गुन्हे, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सतर्कता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आर्थिक सुबत्ता असलेल्या वर्गाची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यासाठी सर्व सामान्यांपर्यंत ग्राहक जागरूकतेची चळवळ पोहोचवावी व काही संशयित लिंक, कॉल्स आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा.

Advertisement

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स् असोसिएशन लि., मुंबईचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. आपल्या बँक व्यवहारांवर नियमितपणे लक्ष ठेवावे तसेच अधिकचे खाते बंद करणे कधीही चांगले. कुठल्याही अनोळखी लिंकला, मेसेजला लगेच प्रतिसाद देणे कटाक्षाने टाळावे. डिजीटल व्यवहारांबाबत कोणतीही माहिती, शंका समाधान मिळविण्यासाठी बँकांशी संपर्क साधावा, जाणकारांशी चर्चा करावी. आर्थिक समुपदेशक म्हणून प्रत्येकाने भूमिका बजवावी. येणारा काळ हा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय) चा असून एआय वापराचे अनेक धोकेही आपल्याला माहिती असतील. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक हॅकर्स आपल्याच कुटुंबियांचा आवाज, त्यांचा मोबाईल क्रमांकावरून आपल्याशी संपर्क साधतात व आपली आर्थिक फसवणूक करतात. अशा धोक्यांना वेळीच ओळखून आपल्याला डिजीटल युगात वाटचाल सुरू ठेवायची आहे.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि., मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा म्हणाले की, सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजीटल सुविधेचा जबाबदारीने वापर करावा. सुरक्षितता, संयम यांची सांगड घालून व्यवहार करणे काळाची गरज आहे. आर्थिक व्यवहार व सावधानता ह्या दोन बाजू आहेत त्याचा अंगीकार करावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनांचा वेळोवेळी अभ्यास करावा.

बँक ऑफ महाराष्ट्राचे एलडीएम भीमा लवटे म्हणाले की, आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तात्काळ पोलीसांकडे तक्रार नोंदविणे गरजेचे असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सायबर सिक्युरीटी धोरणांची अंबलबजावणी करणे आवश्यक आहे.

असोसिएशनचे व्यवस्थापक रामलाल सानप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘एकात्मिक लोकपाल-2021’ योजनेअंतर्गत कार्यक्षम, प्रभावी आणि जलद तक्रार निवारण यंत्रणेच्या उपलब्धतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे कार्याध्यक्ष वसंतराव खैरनार यांनी सुत्रसंचालन केले.

याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक अनिरूद्ध मलिक, सहाय्यक व्यवस्थापक आकाश काबरा, सहाय्यक विजय जाधव तसेच जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी उपमहापौर गुरमित बग्गा उपस्थित होते.

यानंतर अनिरूद्ध मलिक व आकाश काबरा यांनी लोकपाल योजने संदर्भात पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकेचे समाधान केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसेवा सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *