नाशिक बदनामीच्या गर्तेत ! ‘बडी भाभी’ ची कुटुंबासह नार्को टेस्ट करा ! – ड्रग्ज प्रकरणी वसंत गिते आक्रमक
नाशिक बदनामीच्या गर्तेत ! ‘बडी भाभी’ ची कुटुंबासह नार्को टेस्ट करा !
– ड्रग्ज प्रकरणी वसंत गिते आक्रमक
नाशिक – प्रतिनिधी
क्रांतीकारकांची भूमी, भाविकांचे शहर, मंत्रभूमी ते तंत्रभूमी, शैक्षणिक हब अशा विविध बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकची ड्रग्ज संस्कृतीमुळे महाराष्ट्रासह देशात बदनामी झाली आहे. शहरातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात ओढणाऱ्या माफियांना सत्ताधाऱ्यांचा राजाश्रय लाभला आहे. यातील सुत्रधार ‘चिपड्या’ ला जामीन मिळवून देणाऱ्या व जामीन मिळाल्यानंतर सहकुटुंब स्वागत करण्यात आले. अशा ‘बडी भाभी’ ची कुटुंबासह नार्को टेस्ट करण्याची आक्रमक मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी नाशिक शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ करण्यासाठी कंबर कसली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. गिते म्हणाले, गेल्या १० वर्षात केंद्र, राज्य व महापालिका अशी एकाच पक्षाच्या हाती सत्ता असतानाही मुंबई, पुणे, नागपूर या शहरांच्या तुलनेत नाशिक भकास झाले. येथील आमदारांनी शेवटच्या महिन्यात उद्घाटने करीत विकासाचा आव आणला. परंतू नाशिककर सर्व जाणून आहेत. शहरात गांजा, चरस, कुत्ता गोळी तसेच ड्रग्जची खुलेआम विक्री होत आहे. शाळा-महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था भोवती ड्रग्ज माफियांनी जाळे विणले आहे. यात गुंतलेल्या छोटी भाभी उर्फ नसरीन शेख तसेच चिपड्या उर्फ इरफान शेख या गुन्हेगारांना ‘बडी भाभी’ पोसते, जामीन द्यायला जाते, असा स्पष्ट आरोप केला. एवढेच नाहीतर १००/१५० कॉल ‘बडी भाभी’ गुन्हेगारांना करते.
शहर पोलीस कार्यक्षम आहेत. क्लीष्ट गुन्ह्यांची उकल असो व गुन्हेगारांचा एन्काउंटर शहर पोलिसांनी केला. मात्र ड्रग्ज प्रकरणात कारवाई करू नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकते. पोलिसांना बदल्या करण्याची धमकी दिली जाते. गेली १० वर्ष हा सत्तेचा माज चालू असल्याचा गंभीर आरोप श्री. गिते यांनी केला.
नाशिकचे नाव या ‘बडी भाभी’ ने देशासह संपूर्ण राज्यात बदनाम केले असून १० वर्षांच्या सत्तेचा माज जिरवण्याची हीच वेळ असून त्यासाठी नाशिककरांनी साथ द्यावी, असेही श्री. गिते म्हणाले.
गुन्हेगारांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जातो. ड्रग्ज प्रकरणातील चिपड्या जामीनावर सुटल्यानंतर दीर व मुलाला घेऊन त्याच्या स्वागतासाठी कोण गेलं होतं, असा सवालही वसंत गिते यांनी उपस्थित केला. मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण करणाऱ्या या आमदाराने मराठा व ओबीसी यांच्यात वाद लावला. त्यांना मतदानातून धडा शिकवा व ‘मशाल’ विजयी करा, असे आवाहन वसंत गिते यांनी केले.
—————————————————-
नाशिक बदनामीच्या गर्तेत !
मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिंदे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्ज व त्यासाठी लागणारा कच्चा माल सापडल्यामुळे राज्याला हादरा बसला. त्यानंतर शहराला ड्रग्जचा विळखा बसल्याचे विविध घटनांमधून पुढे आले. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध होते. हे ड्रग्ज मिळवण्यासाठी घरात चोरी करणे, खोटं बोलणं, बाहेरून पैसे उधार घेणं असे प्रकार घडत आहेत. तसेच व्यसनाधीनमध्ये तरुणींचा सहभाग देखील मोठा असून अनेकदा ड्रग्ज मिळवण्यासाठी मुलींना ‘कॉम्प्रमाईज’ करावे लागते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती परिसरात तर चक्क क्यूआर कोडद्वारे ड्रग्ज दिले जातं असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अशा हाय प्रोफाईल ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आणि ऑनलाईन पैसे जमा झाल्यानंतर एमडी ड्रग्ज दिले जाते. एमडी ड्रग्जसाठी माल हा कोड प्रचलित आहे. तर विद्यार्थी बुकसेशन्स हा कोड वापरतात, यासह चॉकलेट, कॅट, कॉटर, खंबा अशा विविध शब्दांचा वापर करतात. ही परिस्थिती समस्त पालकांसाठी चिंताजनक आहे.