शरद पवार यांनी आडगावच्या सभेत जागवल्या आठवणी ; कबड्डीचे गाव आता आय टी पार्क साठी सज्ज झाल्याचा दावा
शरद पवार यांनी आडगावच्या सभेत जागवल्या आठवणी ;
कबड्डीचे गाव आता आय टी पार्क साठी सज्ज झाल्याचा दावा
नाशिक, आडगाव /प्रतिनिधी
पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. गणेश गीते, मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते, देवळाली मतदारसंघाचे उमेदवार योगेश घोलप यांच्या प्रचारासाठी आडगाव येथे काल आयोजित केलेल्या प्रचारसभेत पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, आम्हाला सहकार्य करणारे अन्य पक्षातील सहकाऱ्यांसह सहभागी झालो.
महाराष्ट्राची सत्ता व अधिकार महाविकास आघाडीच्या हातात येत नाही,तोपर्यंत आम्ही जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवता येणार नाही. त्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या मतांनी आम्ही सांगितलेले चारही उमेदवार निवडून देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
आडगावला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. एकेकाळी मक्याचे उत्पादनासाठी हे गाव महत्वाचं होतं. महाराष्ट्राच्या कबड्डीचा मी ३०-३५ वर्ष अध्यक्ष होतो. कबड्डीसंबंधी आस्था असलेली जी गाव होती त्या गावांमध्ये आडगावच नाव हे नेहमी त्या काळी यायचं. त्या गावांमध्ये अनेक लोक होते, माझे आणि त्यांचे संबंध होते. दिवंगत सिताराम पाटील यांची मैत्री होती अशी अनेक नावे सांगता येतील. एकेकाळी हे गाव शेतकरी कामगारांच्या विचारांचे होते. मला आठवतंय की ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या रूपाने या जिल्ह्याला एक जागरूक खासदार देण्याचे काम तुम्ही लोकांनी आणि तुमच्या आधीच्या पिढीने केलं होतं. अशा अनेक लोकांबद्दल सांगता येईल.
आज या मतदारसंघामध्ये अनेक लोक निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना तिकीट द्यावीत अशी इच्छाही होती. पण सगळ्यांना ती संधी देता येत नाही. इथे नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये जगदिश गोडसे अनेक वर्षांपासून आम्हा लोकांबरोबर ते काम करत होते. तरुणांची शक्ती त्यांनी उभी केली. त्यांच्यामार्फत आम्हा लोकांचा विचार घरोघरी पोहोचवणे, यासंबंधीचे काम त्यांनी केलेले होते. दुर्दैवाने त्यांना आम्हाला संधी देता आली नाही. पण ते संधी मिळाली नाही म्हणून घरी बसले नाहीत. मी त्यांचे अभिनंदन करतो की ते जो कोणी उमेदवार आम्ही लोकांनी दिला, त्याच्यासाठी कष्ट करण्याची भूमिका ते आज घेत आहेत. त्यांच्या भूमिकेची नोंद मी आणि आमचे सहकारी नक्कीच घेऊ आणि योग्य वेळी योग्य निर्णय केला जाईल या प्रकारची खात्री मी आज तुम्हाला देऊ इच्छितो.
आडगावला टर्मिनलची जागा उपलब्ध आहे. माझ्या मते आज या ठिकाणी एक आयटी पार्क करण्याची गरज आहे. पुण्यात आम्ही तयार केलेल्या आयटी पार्कमध्ये लाखो तरुण-तरुणी काम करतात. पुण्याला जर ते होऊ शकतं तर नाशिकला का नाही? इथे जमीन नाही कष्ट करणारे तुमच्यासारखे लोक आहेत. शिक्षित अशा प्रकारची तरुणांची संख्या आहे. त्यांच्या हातांना काम द्यायला आयटी पार्क आम्ही या ठिकाणी करू शकलो तर हातांना तर काम मिळेल पण संपूर्ण नाशिकच्या स्थितीत एक प्रकारची सुधारणा होईल, ते करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही उद्याच्याला मोठ्या मतांनी आमचे उमेदवार निवडून दिले तर आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहू. जे काही तीन उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केले त्यांच्या पाठीशी तुम्ही शक्ती उभी केली तर मी खात्री देतो की नाशिक आणि नाशिक रोड या सगळ्या भागात जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्हा लोकांची पूर्ण शक्ती तुमच्याबरोबर राहील. उद्याच्याला महाराष्ट्राचा कारभार हा महाविकास आघाडीच्या हातात आल्यानंतर इथल्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सहाय्य करण्याची भूमिका आम्ही आणि आमचे सहकारी घेतील, असा विश्वास सगळ्यांना दिला.
-शरद पवार,
(आडगाव सभेतील भाषण )