येवल्यात सस्पेन्स कायम ; निर्णय प्रलंबित ठेवल्याने संभ्रम, अफवांना उत
येवल्यात सस्पेन्स कायम ;
निर्णय प्रलंबित ठेवल्याने संभ्रम, अफवांना उत

नाशिक प्रतिनिधी
राज्याचे हेवीवेट नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण चळवळीतून उभे राहिलेले नेतृत्व मनोज जरांगे यांच्यातील टोकाला गेलेले वितुष्ट ओबीसी मराठा समाजातील दरी रुंदावण्यास कारणीभूत ठरल्या नंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भुजबळ आणि जरांगे काय भूमिका घेतात यावर निवडणुकीचा निकाल कसा लागणार याचे गणित अवलंबून असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यातच माघारीच्या पूर्व संध्येला मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांना अंतरवली सराटी येथे बोलावून घेत कुणी लढायचे, कुणी माघार घ्यायची, कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला पाडायचे यावर मनोज जरांगे उपस्थित समुदायाशी चर्चा करून निर्णय घेणार होते.
नियोजित कार्यक्रमाप्रमाणे अंतरवली सराटीत मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांची दिवसभर मांदियाळी होती. इतर राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनीही अंतरवली सराटीत पायधूळ झाडून आरक्षण चळवळीचे पंढरपूर बनू पाहणाऱ्या या स्थानाचे आशीर्वाद मिळतात का याची चाचपणी केली.
मनोज जरांगे यांनी ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही निवडक विधानसभा मतदार संघातील उमेदवारांबाबत ठोस निर्णय घेऊन निर्णय जाहीर केला. तथापी येवला मतदार संघात काय होणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे, त्याच उत्सुकतेने येवल्याचे शेकडो कार्यकर्ते अंतरवली सराटीत दिवसभर ठाण मांडून बसले होते. रात्री बारा वाजे पर्यंत येवल्यात कुणी लढायचे, लढायचे की नाही यावर मनोज जरांगे यांनी आपले मत दिले नाही. अर्थात अपक्षांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत असे स्पष्ट करून त्यांनी अस्पष्ट संकेत दिले असले तरी सकाळी निर्णय जाहीर करणार असल्याने संभ्रम सोबत घेऊनच येवलेकर माघारी परतले आहेत.
कशी असेल लढत?
येवल्यात छगन भुजबळ हे महायुतीचे राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे माणिकराव शिंदे हे शरद पवारांचे राष्ट्रवादी उमेदवार आहेत. तर गेल्या पाच वर्षांपासून विधानसभा लढविण्याची तयारी करीत असलेले कुणाल दराडे आणि मराठा समाजाचे सचिन आहेर हे महा परिवर्तन शक्ती या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करीत मैदानात आहेत. जरांगे हे येवल्यातून आहेर किंवा दराडे यांच्यापैकी एकाला पसंदी देतील अशी अटकळ सकाळ पासून बांधली जात होती. तथापी रात्री बारा पर्यंत यापैकी एकही नाव अंतिम झाले नव्हतं. उलट अपक्षांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत. असा निरोप घेऊन येवलेकरांनी परतीचा रस्ता धरल्याचे वृत्त आहे. यातून काही संकेत अस्पष्टपणे मिळत आहेत. या दोन्ही अपक्षांनी आपले अर्ज माघे घेतले तर तुतारी चिन्हावर लढत असलेले महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे आणि महायुतीचे छगन भुजबळ अशी दुरंगी लढत होऊ शकते अशी नवी अटकळ बांधली जात आहे सचिन आहेर हे नांदगावचे आमदार उमेदवार आणि भुजबळ यांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे समर्थक आहेत, तर कुणाल दराडे हे देखील भुजबळ यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात असल्याने या दोघांची माघारी शिंदे यांच्या पथ्यावर पडून तुल्यबळ लढत होऊ शकते. अर्थात येवल्याचा आजवरचा इतिहास पाहता हा अंदाज वर्तवणे तितके सहज सोपेही नाही. नांदगाव मध्ये समीर भुजबळ यांनी दिलेले आव्हान मोडून काढण्यासाठी भुजबळ परिवार येवल्यातच रोखून धरण्याचे काम करण्यासाठी सुहास कांदे किती श्रम घेतात त्याच सोबत कुणाल दराडे यांचे समर्थक किती आणि कशा प्रकारे आघाडीच्या पदरात दान टाकतात यावरच या दोन्ही मतदार संघाच्या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास येवलेकर संभ्रमात असून ही निवडणूक भुजबळ यांच्यापेक्षाही जरांगे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.