ताज्या घडामोडी

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन; शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटन,आर्थिक विकासाला चालना- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन;

शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटन,आर्थिक विकासाला चालना- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

 

अहिल्यानगर (सचिन मोकळ):-

Advertisement

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले.शिर्डी विमानतळ येथील कार्यक्रमाप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर,शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम उपस्थित होते.प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले,शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईबाबांच्या भक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर व नाशिक परिसरातील कांदा, द्राक्ष,शेवगा,पेरू व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा कृषी माल देश विदेशात निर्यात होईल,असेही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.रायगड येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाचे नेहमीच सहाय्य राहिले आहे. शिर्डीला श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे.साईबाबा भक्तांच्या सेवेसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत साकारत आहे. या इमारतीची अंदाजित किंमत ६४५ कोटी रूपये आहे.यामुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. ५५ कोटी खर्चून शिर्डी विमानतळावर कार्गो सेवा उभारली जात आहे.यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडिंग सुविधा सुरू होणार आहे.शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. येत्या काळात येथे येणाऱ्या साईभक्तांमुळे शिर्डी हे भारतातील सर्वांत जास्त प्रवाशांनी गजबजलेले विमानतळ ठरणार आहे. यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिर्डी विमानतळ हे संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव ‘साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नामकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *