पत्रकारांसाठी ५ एकरावर स्वतंत्र वसाहत उभारून पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार: आमदार डॉ.राहुल पाटील; परभणीत व्हॉईस ऑफ मिडिया व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे महाआरोग्य शिबिरात आरोग्य कार्ड वाटप
पत्रकारांसाठी ५ एकरावर स्वतंत्र वसाहत उभारून पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार: आमदार डॉ.राहुल पाटील;
परभणीत व्हॉईस ऑफ मिडिया व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे महाआरोग्य शिबिरात आरोग्य कार्ड वाटप
परभणीः प्रतिनिधी
पत्रकारांच्या समस्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले असून येत्या निवडणुकीमध्ये महविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्रीपद मिळाल्यावर परभणीत 5 एकर जागेवर पत्रकारांसाठी वसाहत उभारण्यात येईल, पत्रकारांना मानधन, विमा कवच, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिले आहे.
सर्व पत्रकारांसाठी व्हॉईस ऑफ मिडिया आणि आमदार डॉ.राहुल पाटील यांचे आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.6) करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल मस्के पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, शिवसेना संपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, वनामकृवितील अधिष्ठाता डॉ.उदय खोडके, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे,मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कैलास चव्हाण, गजानन काकडे, प्रशास ठाकूर, डॉ.आमेर, नवनीत पाचपोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विमा कवच असले पाहिजे. आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने शासनाने त्यांना अनुदान दिले पाहिजे. व्हॉईस ऑफ मीडियाने आरोग्य कार्ड देण्याचे चांगले पाऊल उचलले असून त्याचा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा. याठिकाणी आर.पी.हॉस्पिटल मध्ये माराठवाड्यातील सर्वात मोठी कॅथ लॅब सुरू केली असून याच इमारतीत १० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगीतले. ज्येष्ठ नागरिक मंचच्या ३०० शाखा कार्यरत आहेत. नुकतेच महाआरोग्य शिबिरातून १७ हजार साहित्याचे वाटप केले आहे. ५ हजार महिलांना रोजगारासाठी शिवणयंत्र वाटप करण्यात आले असून त्यातून त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत. महायुती सरकारने निरनिराळ्या महामंडळांच्या केलेल्या घोषणा आर्थिक तरतूद नसल्याने कागदावरच आहेत. हे सरकार बदलण्याची सर्वसामान्य जनता वाट पाहत असून लवकरच आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पत्रकारां साठी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आ.पाटील यांनी दिले.
व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल मस्के यांनी पत्रकारांची अवस्था वाईट असल्याचे सांगून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज प्रतीपादित केली. सगळ्या पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, परभणीत राबविलेला आरोग्य कार्ड उपक्रम हा राज्यभर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.नावंदर यांनी आर.पी.वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून परभणीत उपलब्ध झालेल्या सर्व सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे असून आर्थिक महामंडळ स्थापनेची मागणी आ.पाटील नक्कीच पूर्ण करतील असे सांगितले. डॉ.खोडके यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांना दिलेल्या आरोग्य कार्ड उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन प्रदीप कांबळे तर आभार प्रदर्शन श्रीकांत देशमुख यांनी केले. यावेळी व्हॉईस ऑफ मिडिया जिल्हा शाखेच्या वतीने आ.पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
208 पत्रकारांना आरोग्य कार्ड वाटप
परभणी येथे व्हॉईस ऑफ मिडिया व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे महाआरोग्य शिबिरात 208 पत्रकारांना आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. दरम्यान, सकाळी 8 वाजल्यापासून पत्रकार, छायाचित्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी होऊन लाभ घेतला.एकुण 350 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.