Happy Birth Day :3 october मागे वळून पाहतांना:- चर्चा तर होणारच “
Happy Birth Day :3 october मागे वळून पाहतांना:- चर्चा तर होणारच “
पोलिस… Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies. They are uniformed individuals who are responsible for keeping law and order intact. They are a group of पर्सनेल. अशी सर्वसाधारण पोलिस शब्दाची अर्थफोड आहे. लोकशाही राज्य व्यवस्थेत या गणवेशधारी व्यवस्थेला घटनात्मक संस्थेचा दर्जा प्राप्त आहे. देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या या यंत्रणेची रचना आपले एक वेगळे वैशिष्ट्य निर्देशीत करते.महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर पोलिस यंत्रणेची रचना काहीही असो पोलिस महासंचालकापासून शिपाई पदापर्यंत कायदा सुव्यवस्था राखणे हीच एकमेव जबाबदारी असते.
गेल्या काही वर्षातील नाशिक जिल्हा पोलिसांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला तर काही स्मरणीय पोलिस अधीक्षकांची नावे नजरेसमोर येतात. त्यात पहिले नाव अर्थातच सचिन पाटील. जेव्हढे हसरे, तेव्हढेच वादग्रस्त. कुठलाही पोलिस अधिकारी व्यक्तिगत पातळीवर काय आहे,याचे सामान्य जनतेला काही देणेघेणे नसते. जनतेला हवा असतो न्याय.हवी असते पोलिसिंग. या पातळीवर सचिन पाटील यांच्या कारकिर्दीचा हिशेब मांडला तर आजवरच्या नाशिक अधीक्षक कार्यालयाच्या इतिहासातील उज्वल कामगिरी या शीर्षकाखाली त्या कारकिर्दीची नोंद करावी लागेल.अर्थात हे आमचे किंबहुना आमच्या विचार सरणीशी सहमत असणाऱ्या अभ्यागतांचे मत आहे. त्या मतांशी इतरांनीही सहभागी व्हावेच असा आग्रह अजिबात नाही. अनुभव ज्याचा त्याचा. मात्र तब्बल तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत व्यतीत केल्यानंतर व्यवस्थेकडून जनमानस कुठली अपेक्षा ठेवते, व्यवस्था ती किती आणि कशी पूर्ण करते, याचा ताळेबंद मांडण्या इतपत अभ्यास नक्कीच झाला आहे,त्या अभ्यासातूनच असे निष्कर्ष निघतात. असो. विषयांतर झाले पण उगाच कुणी व्यक्ती स्तोमाचा आक्षेप नोंदवू नये म्हणून आपलं सांगितलेलं बरं..
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पोलिस खात्याच्या विशेष रचनेत मेट्रो म्हणजे आयुक्तालय आणि नागरी म्हणजे अधीक्षक परिक्षेत्र असे सरळ दोन विभाग प्रथम दर्शनी दिसतात. भौगोलिक क्षेत्राप्रमाणे प्रशासकीय कामकाजाच्या आणि कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीने ही रचना केली आहे. या रचनेमुळे अधिकार आणि जबाबदारीत फार फरक पडत नाही. खरे तर अधीक्षक परीक्षेत्र आयुक्तालयाच्या तुलनेत व्यापक आणि किचकट भौगोलिक रचनेमुळे दळणवळणासह अन्य संदर्भातही आव्हानात्मक ठरते. नाशिक अधीक्षक परीक्षेत्राचा विचार करायचा झाला, तर उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पोलिस ठाणे, आदिवासी खेडे पाडे डोंगरदऱ्या, दळणवळणाचा वेग मर्यादित करणारे रस्ते, दोन राज्यासह पाच जिल्ह्यांची सीमा यां घटकांमुळे नाशिक अधीक्षक हद्दीत पोलिसिंग करणे दिव्य आहे. हे दिव्य पार करून पाटील पर्वात झालेली पोलिसिंग कौतुकास्पद ठरते.अर्थात पोलिस अधीक्षक म्हणून सचिन पाटील नायक म्हणजे सेनापती होते, तर तत्कालीन अप्पर पो. अधीक्षक आणि एसीबीच्या विद्यमान अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, त्यांच्या नंतर पदभार स्वीकारलेल्या सध्या पिंपरी चिंचवड येथे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी कांगणे, मालेगावचे तत्कालीन अप्पर पो. अधीक्षक आणि नाशिक पो. आयुक्तालयाचे प्रशासन सांभाळणारे विद्यमान पो. आयुक्त चंद्रकांत खांडवी, तत्कालीन उपविभागीय पो. अधिकारी यांच्यासह एलसीबी पो. नि हेमंत पाटील,तसेच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पो. नि. संदीप कोळी, प्रमोद वाघ, समाधान नागरे, भगवान मथुरे, नंदकुमार गायकवाड,दिवाणसिंग वसावे, रणदिवे,सपोनि स्वप्नील राजपूत, देवेंद्र शिंदे, नितीन शिंदे , निलेश बोडखे,राहुल वाघ, मोताळे,मयूर भामरे, श्रीकृष्ण पारधी, अनिल वाघ, गणेश म्हस्के, पप्पू कादरी, पी एस आय सागर नांद्रे,महेश निकम यांसारखे शिलेदार,आणि कर्मचाऱ्यांची फौज सचिन पाटील यांच्या तत्कालीन पोलिसिंगला सकारात्मक बळ देत होती. म्हणूनच आजही ते पर्व नाशिककरांच्या चर्चेत आहे.
कायदा सुव्यवस्था राखणे म्हणजे काय यावर प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. मात्र ढोबळमानाने समाजात शांतता नांदणे, घडलेल्या गुन्ह्यांची तात्काळ दखल घेऊन उकल करणे, तपास निष्कर्षापर्यंत नेवून घटनेत सहभाग असलेल्या दोषींना सजा होईपर्यंत पाठपुरावा करने म्हणजे कायदा सुव्यवस्था. यात नाशिकचे पोलीस अधीक्षक आणि एकूणच तत्कालीन जिल्हा पोलिस दल सर्व कसोटीवर उतरले होते.
जिल्हा पोलीस यंत्रणेची भुमिका जनमानसात एका वेगळ्या अर्थाने रुजविण्यात सचिन पाटील यशस्वी ठरले.ऐतिहासिक अध्यात्मिक सामाजिक आणि तितकाच भारदस्त राजकीय वारसा असलेल्या,भौगौलिक दृष्ट्याही वेगळेपण जपणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पोलीसींग राबवणे सहज सोपी गोष्ट नव्हती.
आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव,आदिवासी भागातील मोडस आॕपरंडी सोबत जिल्ह्यातील राजाश्रीत पांढरपेशी गुन्हेगारी अशा विविध पातळ्यांवर समांतर उपचार करून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या बांधण्याचे कौशल्य या काळात प्रकर्षाने पहायला मिळाले.
“वर्गवारीत बोलायचे झाले तर खुनासारख्या घटना अचानक घडतात, त्याची आधी कुणकुण लागण्याची सुतराम शक्यता नसते. म्हणून खूनाच्या घटनेने कायदा सुव्यवस्था ढासळली असे म्हणणे न्यायिक ठरणार नाही, मात्र याला दुसरी बाजुही आहे. अशा घटना घडल्यानंतर त्या घटनेचे उमटणारे संभाव्य पडसाद लक्षात येण्यासाठी गुन्ह्यांच्या जातकुळीचा अभ्यास असणे आवश्यक ठरते.इथेही पोलिस अधीक्षक म्हणून सचिन पाटील आणि त्यांची तत्कालीन टीम सरस ठरली. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांचा माग काढून त्यांच्या मुसक्या बांधण्यात तत्कालीन पोलिस दलाचे कौशल्य खऱ्या अर्थाने सिद्ध झाले. पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हाच नांदगाव मालेगाव तालुक्याच्या सीमेवर पडलेला दरोडा आणि त्यातून झालेले हत्याकांड नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेला वाकुल्या दाखवीत होते.तथापि सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारताच नांदगाव हत्याकांडासारखे पोलिसांच्या तपास कौशल्याला आव्हान देणाऱ्या प्रकरणांची वर्गवारी करून प्राधान्यक्रमाने तपासावर घेतले.घटनेची नव्याने समीक्षा करून गुन्ह्यांची जातकुळी शोधून तपासाचा मास्टर प्लॅन केला. तपास पथकाला केलेल्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारांचा माग सापडला. गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद झाले. त्यातून जिल्हा पोलिस दलाचे मानसिक कार्यक्षमता वाढली. मानसिकता बदलली.सेनापती तसा सैन्य ही नैसर्गिक भावना इथे वास्तवात दिसली.या जिल्ह्याची मानसिकता आणि सर्वार्थी प्रतिष्ठा सांभाळून केलेल्या विविध कारवाया हे विद्यमान पोलिस अधिक्षकांच्या कार्यप्रणालीचे वेगळेपण ठरले.
कायदा सुव्यस्थेच्या पातळीवर आवश्यक ती पोलिसिंग राबविताना कायदा सुव्यस्थेच्या मार्गात अडथळा ठरू शकणाऱ्या अन्य तत्सम बेकायदेशीर घडामोडीवरही पोलिस अधीक्षकांचे बारीक लक्ष असल्याचे यां काळात झालेल्या काही निवडक कारवायामधून दिसते. उदाहरणादाखल इगतपुरी सारख्या भागात सातत्याने रंगणाऱ्या रेव्ह पार्ट्या, चांदशी शिवारात सुरु असलेले हुक्का पार्लर, अवैध मद्य वाहतूक विक्री, प्रतिबंधित गुटखा वाहतुक तसेच विक्री, वाड्या पाड्यावर सुरु असलेल्या हातभट्ट्या अशा बेकायदेशीर धंद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या मोहिमेला यां काळात मिळालेला वेग यां वर्षातील पोलिसिंग खास वैशिष्टय ठरले. यात मैलाचा दगड ठरावा अशा कारवाया यां ठिकाणी निर्देशीत कराव्या लागतील. नांदगाव दरोड्याच्या तपासाची यशोगाथा लिहून झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी कथित प्रतिष्ठेचा बुरखा पांघरून काळे धंदे करणारे किंवा या धंदेवाईकांना राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी आर्थिक पाठबळ देणाऱ्या मंडळीकडे आपला मोर्चा वळवला. इगतपुरीचे रेव्ह पार्टी प्रकरणातील बड्या धेंडाचा सहभाग असो नाहीतर मालेगावसारख्या शहरात राजाश्रयाखाली सुरु असलेला बायोडिझेलचा काळाबाजार. या कथित प्रतिष्ठेला उघडे पाडण्याचे काम, मालेगाव चांदवड मधील बायोडिझेल तर चांदोरीत सुरु असलेल्या मद्य निर्मितीचा अवैध कारखाना उध्वस्त करून पूर्णत्वास नेले.चांदोरीत हा दारू बनविण्याचा बेकायदेशीर मामला चव्हाट्यावर आणण्याचे पोलिस अधीक्षकांनी दाखवलेले धाडस राज्यभर चर्चेत होते. उपलब्ध आकडेवारीनुसार एव्हढ्या मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू निर्मितीचा पर्दाफाश होणारे हे राज्यातील पहिलेच प्रकरण असावे.
एका बाजूला बेकायदेशीर मंडळींचे धंदे कायद्याच्या वेशीवर टांगताना कष्ट करून पिकवलेल्या मालाचे पैसे बुडवून शेतकऱ्यांना छळणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कायद्याची वेसण घातली. वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांकडे थकलेले शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये सचिन पाटील यांनी वसुल करण्याच्या पातळीवर आणले.
कायदा सुव्यवस्थेसाठी सामाजिक सलोखा हा कळीचा मुद्दा ठरतो,हे सचिन पाटील यांच्यासारख्या कसलेल्या अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांना कुणी मुद्दामहून सांगण्याची गरज भासली नाही.याची प्रचिती मालेगावसह जिल्ह्यातील इतर संवेदनशील गावात आली. नाशिक जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या तसा जागा असलेला जिल्हा. राजकीय कुरघोडीतून पोसले जाणारे गावागुंडीचे राजकारण सामाजिक सलोख्याच्या छाताडावर केव्हा नंगानाचं करील,याचा काही भरोसा नाही. ही बाब जाणून असलेल्या सचिन पाटील यांनी सामाजिक सलोखा शाबूत राहील यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून विशेष लक्ष दिले होते . ठाणे आयुक्तालय परीक्षेत्रातील काही सवेंदनशील परिसराचा अनुभव त्यात मालेगावसह जिल्ह्यातील अन्य काही घडामोडी कानावर असल्याने जिल्हा सामाजिक दृष्ट्याही शांत ठेवण्याच्या दिशेने त्यांनी उचललेली पाऊले अपेक्षित परिणाम साधून गेली. केवळ धार्मिकच नव्हे तर जातीय आणि राजकीय समीकरणे पोलिसिंगची नजर चुकविणार नाहीत अशी सारी व्यवस्था उभी केली. परिणामस्वरूप पदभार स्वीकारण्यापूर्वी धगधगणारे मालेगाव शांत राहिले.
कायदा सुवस्था एका बाजूला आणि मानवता दुसऱ्या बाजूला. अंगावर वर्दी आहे, खलनिग्रहणायची प्रतिज्ञा घेतली म्हणून अंगी मुरलेले काठीण्य वरून दिसत असले तरी आतून फणसाच्या गरापेक्षाही मऊ असलेला माणूस या वर्दीच्या आत आहे, याचीही अनुभूती याच काळात पोलीस दलासह सामान्य माणसानेही घेतला. एरवी भरदार अंगयष्टी, पिळदार मिशी आणि गंभीर चेहरा पाहून थरथरणारे शरीर जेंव्हा खांद्यावर पडणाऱ्या हातांचा स्पर्श मित्रत्वाची जाणीव करून देतो, तेंव्हा कळते सचिन पाटील या वर्दीवाल्यात एक माणुसही आहे, अगदी तुमच्या माझ्या सारखा हाडामासाचा.
अशा या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
शुभेच्छुक :कुमार कडलग,
जिल्हा अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक
संचालक मार्कंडेय प्रकाशन, नाशिक