नाशिक शहर बंदला हिंसक वळण ; दोन गटात दगडफेक, पिंपळचौकात घरात घुसून मारहाण ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
नाशिक शहर बंदला हिंसक वळण ;
दोन गटात दगडफेक, पिंपळचौकात घरात
घुसून मारहाण ;
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
नाशिक प्रतिनिधी
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पुकारलेल्या नाशिक शहर बंदला हिंसक वळण लागले. शहरातील दूध बाजार परिसरात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने तसेच काही ठिकाणी दगडफेकीसह हल्ल्याचे प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील विविध भागातून मोटार सायकल रॅली काढत व्यावसायिकांना दुकाने बंद करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येत होते. तर या मोटार सायकलस्वारांकडून जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात होत्या. शुक्रवार (दि.१६) रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अशीच एक मोटार सायकल रॅली पंचवटी भागातून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेनरोड मार्गे दुधबाजार परिसरापर्यंत निघाली होती. या मोटार सायकल रॅलीच्या मागे पंचवटी परिसरातूनच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे वाहन होते. सदरची रॅली हि दोन वाजेच्या सुमारास दुधबाजार परिसरात आली असता, त्या ठिकाणी काही मुस्लिम समाजाचे युवक हे दर्गेत नमाज पठणासाठी जात होते. त्याचवेळी आंदोलन कर्त्यांनी घोषणा दिल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि दोन्ही गटांमध्ये वाद झाले. यावेळी मुस्लिम युवकांकडून मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या, चार ते पाच दुचाकी चालकांवर हल्ला चढवण्यात आला.तर काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.
दुधबाजार परिसरात आलेल्या मोटार सायकल रॅली चालकांवर व वाहनांवर हल्ला झाल्याची माहिती बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांनी दोन्ही गट पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेची माहिती हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच गाडगे महाराज पुतळा परिसरात जमाव जमला यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जमावाला समजावत तेथून काढून दिले. तर दुसरीकडे मात्र पिंपळ चौक येथे उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनावर काही अज्ञात लोकांनी दगडफेक करत काचा फोडल्या. तर भाजपचे पदाधिकारी बबलू परदेशी यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण करत जखमी केली. या हल्ल्यात बबलू परदेशी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येत होते तर त्यांच्या घरावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याने बाहेर लावलेले फलक वस्तूंचे नुकसान झाले. पिंपळ चौक येथे आमदार देवयानी फरांदे यांचेकडून लावण्यात आलेले होर्डिंग अज्ञात आंदोलनकर्त्यांनी लाठी काठीच्या सहाय्याने फाडले.
दुसरीकडे पोलीस मेनरोड, गाडगे महाराज चौक, दुधबाजार, सीबीएस परिसरात शांतता राखण्याचे काम करती असताना मात्र शुक्रवारी(दि.१६) सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान जुन्या नाशिक येथील बडी दर्गा भागात घरांच्या गच्चीवरून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी दगड आणि रिकाम्या काचेच्या बाटल्या पोलिसांच्या दिशेने फेकण्यात आल्या होत्या. म्हसरूळ टेक भागात झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. यावेळी पोलिसांकडून जमाव पसरविण्यासाठी दोन अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले.
चौकट :
बडी दर्गा भागातील दगडफेकीत पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांना उजव्या कानाला दगड लागल्याने जखमी झाले असून एक दगड त्यांच्या बरगडीला लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे.
चौकट :
मोटार सायकल रॅलीला परवानगी नसताना देखील ती निघाली होती, जर त्या रॅलीला वेळीच रोखले असते तर शहराची शांतता भंग झाली नसती.
चौकट :
पोलीस आयुक्त याकडेही लक्ष द्या…
म्हसरूळ टेक भागात घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
कोट :
पोलीस आयुक्तालयाकडून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त)