आम्ही बांगलादेश, पाकिस्तानातून आलेलो नाही – राजेंद्र कोंढरे; मराठा महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशनाचा समारोप
आम्ही बांगलादेश, पाकिस्तानातून आलेलो नाही – राजेंद्र कोंढरे;
मराठा महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशनाचा समारोप
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्रात काही जण सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचे काम करत असून आगीत राॅकेल टाकण्याचे काम करत आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असताना, प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा कुणबी उमेदवार निवडून देऊ नये,असे विधान केले. हे घटनाबाह्य विधान असून,आम्ही काय बांगलादेश किंवा पाकिस्तानातून आलेलो नाही. प्रकाश आंबेडकर,हे बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला त्याचा आदर आहे. पण त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. या शब्दात मराठा महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पलटवार केला. मराठा महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशनाचा रविवारी (दि.११) समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
मराठ्यांनी अठरापगड जाती एकत्र केल्या. महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिलं. परंतू आता आपल्या विरोधात षडयंत्र सुरु आहे. कुत्सित भावनेने हिणविण्याचे काम सुरु असून वेळीच हे षडयंत्र ओळखा. कुणबी नोंदी असेल तर आरक्षण द्या. नाशिकमध्ये १ लाख ३२ हजार कुणबी प्रमाणपत्रे व्हाॅलिड सापडली. महासंघाच्या प्रयत्नाने १८ लाख प्रमाणपत्र मिळाली. जात पडताळणी समितीशिवाय कोणाला जात प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. पण काही लोक ती रद्द कसे करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. शासनाने नेमलेल्या तिन्ही आयोगाने मराठ्यांना मागास असल्याचा अहवाल दिला आहे. तरी आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ज्यांना कुणबी आरक्षण देता येईल त्यांनी ते घ्या. ज्यांना मिळणार नाही त्यांनी ईसीबीसी आरक्षणाचा फायदा घ्या असे आवाहन त्यांनी केले. राज्यात सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा होते असे सांगितले जाते. परंतू ३२ वर्ष अमराठा मुख्यमंत्री होते. त्याकडे डोळेझाक केली जाते. इतिहासात डोकावून भविष्य घडवता येत नाही. त्यामुळे मराठा तरुणांनी इतिहासाचा वारसा सांभाळत प्रगतीची दालन शोधावी व नवीन पीढी घडवावी.
अधिवेशनात करण्यात आलेले ठराव
👉 समाजातील निवृत्त अधिकार्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा गरजूंना द्यावा
👉 मराठा समाजाने आर्थिक, विधी, प्रशासकीय साक्षरता अंगी कारावी
👉 कर्नाटक व झारखंडमध्ये सारथी सारखी संस्था उभारावी
👉 समाजातील धनवंतांनी व्यवसाय, उद्योगात गुंतवणूक करुन रोजगार निर्मिती करावी
👉 समाजाने काळानुरुप बदल स्विकारावा
👉 डाॅ.प्रकाश आंबेडकर यांनी मराठा कुणबी उमेदवारांना निवडूण न देण्याचा वक्तव्याचा निषेध
👉 गरीब कुटुंबातील मुलींना शंभर टक्के परिक्षा व शैक्षणिक शुल्क माफ केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन
👉 मराठा समाजाने शेत जमिनी विकू नयेत