संक्रमनातून प्रगतीकडे, पण……!
संक्रमनातून प्रगतीकडे, पण……!
संपादकीय
15 ऑगस्ट 2024 भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिवस..या 77 वर्षात विविध संक्रमणातून भारत वर्षाची जडणघडण झाली.प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परकीय आक्रमण झेलत, लोकसंख्येच्या भस्मासुराला सांभाळत सतत विकासाचा ध्यास घेत, तावून सुलाखून निघालेला भारत प्रगती पथावर आहे.यात कुणाचेही दुमत नाही. भारताची प्रगती जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. याचा सार्थ अभिमान एक भारतीय म्हणून नेहमीच असणारआणि तो असायलाही हवा.देश स्वतंत्र झाला. तेव्हा उपासमारीचे,दारिद्र्याचे भीषण संकट देशासमोर होते. 1994 पर्यंत देशातील एकूण लोकसंख्येच्या 45 टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली होती. 2011 च्या दरम्यान हा आकडा
जवळपास 21.9% वर पोहोचला. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार 2019 पर्यंत 10.2% लोकसंख्या ही दारिद्र रेषेखाली येत आहे..लोकसंख्येत भारत अव्वल असला, तरी याच काळात देशात असमानतेची प्रचंड वाढ झालेली दिसून येते. फोर्बच्या यादीतील भारतीयांची नावे,जसजशी वाढत चालली आहेत, तशीच समाजातील कनिष्ठ स्तरातील वर्गाचे राष्ट्रीय संपत्तीमध्ये योगदान कमी होत चालले आहे. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार देशातील एकूण 77% राष्ट्रीय संपत्ती दहा टक्के श्रीमंत लोकांमध्ये एकवटली आहे, तर सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांमध्ये 58% राष्ट्रीय संपत्ती आहे.. आजही भारतात 50 टक्के लोकसंख्या, ही सर्वात गरीब म्हणून प्रमाणित आहे. आज आपली लोकशाही इतकी प्रगल्भ असूनही सर्वाधिक तरुण मनुष्यबळ असून देखील, असंघटित आणि संघटित क्षेत्रात अपुरे वेतन आणि वेतनातील तफावत,याबाबतीत मोठ्या देशांचा विचार केला असता, भारताचा वेतन तफावतीच्या बाबतीत सर्वात वरचा क्रमांक लागतो. यामुळे भारत सध्या सामाजिक आणि आर्थिक असमानतेच्या संकटांच्या चक्रव्युहात अडकत चालला आहे. ‘गरिबी गुन्ह्याची जनक आहे’,या एरिस्टॉटलच्या वाक्याची प्रचिती भारतात विशेष करून महाराष्ट्रात आरक्षणाचे जे डोंब माजले आहे, यात दिसून येते.कृषी क्षेत्राचा विचार केला असता, अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या नादात,भारत अतिरिक्त उत्पादन करत आहे. आजच्या काळात शेती खाली असलेली जमीन, कमी असली तरी उत्पादन मात्र वाढले आहे. परंतु या अतिरिक्त उत्पादनातून, मिळालेला लाभ,भांडवल प्रत्यक्ष उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यास आपण कुठेतरी कमी पडत आहोत. कारण लाभार्थी भांडवलदार,त्यांनी उचललेली मोठी कर्जे आणि ती बुडवण्याची सवय याचा दुरोगामी परिणाम आपसूकच कृषी क्षेत्रात आपल्या बळीराजावर होत आहे. नगण्य कर्जापोटी शेतकरी आत्महत्या वाढत आहे. तीच परिस्थिती पशुधनाविषयी आहे.
भारत स्वतंत्र झाल्यापासून हरितक्रांती सोबत श्वेतक्रांतीही झाली. भारताचे पशुधन वाढले. परंतु त्यासोबतच 1947 रोजी भारतात सुमारे 300 कत्तलखाने होती.1994 ला ती जवळपास 4000 वर गेली.आजमीतिला देशात 15 पट कत्तलखान्यांची वाढ झाली आहे.. देशात रोज पाच हजार पेक्षा जास्त गाईंची कत्तल केली जाते. इकॉनोमिक रिपोर्टनुसार वाढती चामडी निर्यात ,मांस निर्यात यामुळे पशुवध हा व्यापारीक आणि औद्योगिक रूप घेत आहे. याचा परिणाम पृथ्वीच्या पर्यावरणावर, शेणखतामुळे काळी मातीच्या दर्जावर ,पशुऊर्जा ,परिवहन आहार पुर्ती ,,कीटकनाशक ,,औषधी कृषी या क्षेत्रांवर होत आहे.
महिलांचा विचार करता भारतात महिलांना 50 टक्के आरक्षण, स्त्री स्वातंत्र्य,स्त्री साक्षरता याचा चढता आलेख, कितीही सुखावणारा असला तरी 2021 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार भारतात महिलां बाबत घडलेल्या गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक होती. चार लाखापेक्षा जास्त गुन्हे हे अपहरण ,बलात्कार घरगुती हिंसाचार, हुंड्यांमुळे, हत्या -आत्महत्या आणि गैर वर्तवणुकीच्या आहेत. महाराष्ट्र यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला कलकत्त्ता येथील महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार,मन सुन्न करणारा आहे. तिच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिच्या शरीरात सापडणारे १५१ ग्रॅमचे सिमेंन खरंच माणुसकीला काळीमा फासणारे उदाहरण आहे. स्वातंत्र्याचा आनंद अशा घटनांनी दुःखाने काळवंडून जावा ही खरंच शोकांतिका आहे. भारताची प्रतिमा जगभरात ‘गाय आणि नारी’ त देव पूजन संस्कृतीने पुण्यशील म्हणून अनुकरणीय ठरली आहे.
कृषी क्षेत्राचा विचार करता,काळी माती आईसारखी पुज्यनीय,आपली संस्कृती आहे आणि बळीराजाला जगाचा पोशिंदा अशी जगमानसात मान्यता आहे. काळी माती, गाय आणि नारी या तिन्हीना माता म्हणून पुजणाऱ्या संस्कृतीतील आपला नवयुवक बेरोजगारी,व्यसन आणि गुन्ह्यांच्या दलदलीत मरत चालला आहे. ज्या तरुणावर, त्यांच्या खांद्यावर काळी माती, गाय आणि नारी यांना जोपासण्याची,सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्याला असमानतेच्या विषातून काढायची जिम्मेदारी कुणाची ? स्वातंत्र्यसंध्येला भेडसावणारा हा प्रश्न, त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पुन्हा भेटू …