मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून पहिला गुन्हा दाखल* सोलापुरातील दोन कॅफे विरुध्द तक्रार
*मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून पहिला गुन्हा दाखल*
सोलापुरातील दोन कॅफे विरुध्द तक्रार
सोलापूर – : प्रतिनिधी
महायुती सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कागदपत्र जमा करण्यासाठी बहिणींना वनवन भटकावं लागत आहे.
अशात महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकजण कागपत्रांसाठी पैशाची मागणी करत असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये एका तलाठ्यावर कारवाई देखील करण्यात आली. मात्र, त्यानंतरही ह्या घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता सोलापूरमध्ये या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या 2 नेट कॅफेवर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेकडून पैसे घेणाऱ्या 2 चालकांवर कारवाई करण्यात आली. लाभार्थी महिलांकडून योजनेतील फी ची रक्कम न आकारता 100 – 200 रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे चालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी सारिका वाव्हळ यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. संबंधित दोन्हीही नेट कॅफे अधिकृत महा-ई-सेवा केंद्र नसतानाही सर्वसामान्यांची लूट केली जात होती.