रानभाज्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिने महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे: पालकमंत्री दादा भुसे पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हास्तरीय एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
रानभाज्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिने महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे: पालकमंत्री दादा भुसे
पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हास्तरीय एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
नाशिक (प्रतिनिधी ):
शहरातील नागरिक व पुढील पिढीपर्यंत रानभाज्यांचे महत्व पोहचविण्यासाठी या महोत्सवाची व्याप्ती वाढविणे, ही काळाची गरज बनली आहे, यासाठी अशा रानभाजी महोत्सवांचे आयोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषि विभाग, कृषि तत्रंज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री भुसे बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. नितीन ठोक, शेतकरी बाजार रोटरी क्लबचे चेअरमन चेतन पवार,यांच्यासह रानभाजी महोत्सवासाठी आलेले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, रानभाजी महोत्सव घेण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी जतन करून पिकवलेल्या, या रानभाज्यांची माहिती व महत्व शहरातील नागरिकांना समजून रानभाज्यांना चांगला बाजार उपलब्ध होण्यसाठी मदत होईल. त्याचप्रमाणे या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून, आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपले जाण्यास मदत होईल. हे रानभाजी महोत्सव साजरे करतांना, त्यांच्यातील नैसर्गिक संतुलनास धोका पोहचणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. या महोत्सवात आदिवासी महिलांकडून रानभाज्यांच्या विविध पाककृती प्रत्यक्ष दाखविण्यात येतात. अशा आरोग्यवर्धक रानभाजी महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रानभाज्यांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याची ताकद असते. असे सांगत या रानभाज्यांचे जीवनातील महत्व अधोरेखीत केले. तसेच रानभाजी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुरवातीला रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. तसेच पालकमंत्री भुसे यांनी रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने,आदिवासी शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध रानभाजीच्या स्टॉलला भेटी दिल्या.