*‘व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने ई -फायलिंग संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे २२ जून रोजी आयोजन*
*‘व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने ई -फायलिंग संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे २२ जून रोजी आयोजन*
मुंबई – (प्रतिनिधी)
देशभरातील वृत्तपत्राची नोंदणी आणि अन्य तत्सम कार्य पाहणार्या प्रेस रजिस्ट्रॉर जनरल ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या वतीने वृत्तपत्राच्या नविन कायद्यानुसार सुरु करण्यात आलेल्या प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्रांनी दरवर्षी एप्रिलपासून करावयाच्या ई-फायलींग संदर्भात येणार्या अडचणी आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकारांच्या विकासासाठी झटणार्या व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत शनिवार, २२ जून रोजी रात्री ८ ते १० या वेळेत (ऑनलाईन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात व्हाईस ऑफ मिडीयाच्या साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष तथा तांत्रिक सल्लागार संदीप पिंपळकर हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रम संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांसोबतच सर्व दैनिके, साप्ताहिक, मासिके आणि अन्य वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांसाठी खुला राहील. याबाबत अधिक माहिती देतांना साप्ताहिक विंगचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद बोरे यांनी सांगीतले की, वृत्तपत्रविषयक कामकाज राहणार्या रजिस्ट्रार ऑफ न्युजपेपर्स ऑफ इंडियाचा १८६७ चा ब्रिटीशकालीन कायदा बंद करुन प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अशा नव्या नावाने वर्ष २०२३ चा नवा कायदा अस्तित्वात आणल्या गेला आहे. यासोबतच या कायद्यात माध्यमांचीही व्याप्ती वाढवून त्यात मुद्रीत माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल माध्यम अशा कक्षा रुंदावण्यात आल्या आहेत. तसेच वृत्तपत्रांनी दरवर्षी करावयाच्या वितरण व्यवस्थेचा गोषवारा ई फायलींगच्या माध्यमातून नव्या वेबसाईटवर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे या ई फायलींग व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राचे मालक, प्रकाशक, मुद्रक आणि सनदी लेखापालाचीही नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले असून सर्वांना आधार सिग्नेचरच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आले आहे.
मात्र या नव्या वेबसाईटचे अनेक संपादक आणि पत्रकारांना ज्ञान नसल्याने ते या व्यवस्थेपासून अद्याप अनाभिज्ञ आहेत. ही बाब हेरुन व्हाईस ऑफ मिडीयाच्या पुढाकारातून सदर आभासी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन सर्व संपादक आणि पत्रकारांना याचा फायदा होईल. तरी सर्व माध्यमांच्या संपादक आणि पत्रकार बांधवांनी या आभासी प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केले आहे.