स्वामी रामभद्राचार्य : 101 व्या वसंत व्याख्यानमालेचे दिमाखदार उद्घाटन
.
……..
भारताला एक नंबरची अर्थव्यवस्था बनविणे हीच
रामराज्याची मुळ संकल्पना
स्वामी रामभद्राचार्य : 101 व्या वसंत व्याख्यानमालेचे दिमाखदार उद्घाटन
नाशिक (प्रतिनिधी) :
एक असे राष्ट्र असावे, जिथे कुणालाही कष्ट नसावेत, जिथे प्रत्येक पुरुष एक पत्नीव्रती आणि प्रत्येक स्त्री पतिव्रता असावी. ही खरी रामराज्याची संकल्पना आहे. या संकल्पनेला अनुसरूनच येत्या काही वर्षांत भारत जगातील एक नंबरची अर्थव्यवस्था बनेल. असा विश्वास यंदाचा ज्ञानपीठ विजेते जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे केले.
नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या 101 व्या ज्ञानसत्राचे पहिले पुष्प त्यांनी बुधवारी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या हस्ते घंगाळात दीप प्रज्वलित करून व गोदावरी पात्रात दिपदान करून 101 व्या ज्ञानसत्राचा शुभारंभ करण्यात आला.
स्वामीजी म्हणाले की, रामराज्याची संकल्पना स्वामी वसिष्ठ यांनी मांडली. भारतीय संस्कृती ही या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे आणि याच भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची मुहूर्तमेढ प्रभू रामचंद्र यांनी याच पंचवटीत रोवली आहे.
भारतीय संस्कृती रक्षणासाठी याच पंचवटीत लक्ष्मणाने शूपर्णखेचे नाक कापले. याच पंचवटीतून रावणाने सीतेचे अर्थात भारतीय संस्कृतीचे अपहरण केले. हे विधिलिखित होते. हीच प्रभू रामचंद्रजीं च्या विकासाची सुरुवात होती. या एका घटनेने संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणले. म्हणुनच रामराज्याची संकल्पना नाशिकमधूनच देशभरात रुजली. यापुढे संस्कृती रक्षणाबरोबरच विकसित आणि उज्वल भारताची निर्मिती करणे ही रामराज्याची संकल्पना मानून आपण कामाला लागू या, असे आवाहनही त्यानी यावेळी केले.
अत्यंत ओघवत्या शैलीत संस्कृत, हिंदी आणि मराठी भाषेत स्वामीजींनी नाशिककरांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींना आणखी काही वर्ष सत्ता मिळाली, तर आपला देश लवकरच जगातील एक नंबरची अर्थव्यवस्था बनेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या पाच वर्षांत पाकव्याप्त काश्मीर आम्ही हस्तगत करणारच अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सुरुवातीला व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तत्पूर्वी किर्ती कलामंदिरच्या संचालिका रेखा नाडगौडा, आदिती पाणसे आणि सहकाऱ्यांनी प्रार्थना गीतावर नृत्य सादर केले. जगत्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्यासह पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, नवी दिल्लीच्या भारतीय ज्ञानपीठचे महाप्रबंधक आर. एन. तिवारी, मनपा आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मधुकर कड, एचएएलचे महाव्यवस्थापक सुब्रत मंडल, स्वामीजींचे परम शिष्य उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार प्रा. दिनेश शर्मा, स्वामीजींचे नियोजित उत्तराधिकारी रामचंद्रदास महाराज, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलपती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष संगीता बाफणा, उपाध्यक्ष विजय हाके, कार्योंपाध्यक्ष मनीष सानप, चिटणीस हेमंत देवरे, सहचिटणिस गणेश भोरे, अँड. हेमंत तुपे, खजिनदार अविनाश वाळूजे, कार्यकारी मंडळ सदस्य अँड. कांतीलाल तातेड, रूचिता ठाकूर,विजय काकड आदी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
———
चौकट
*जगतगुरूंचा नागरी सत्कार*
दरम्यान जगतगुरू स्वामी रामभद्राचार्य यांना 2024 चा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कुलपती पाटील यांच्या हस्ते स्वामीजींना शाल, श्रीफळ, पुष्पहार, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मिलिंद गांधी यांनी मराठी, तर हर्षि कापडिया यांनी इंग्रजी मानपत्राचे वाचन केले.
—————————–