गत वर्षी क्रितिका व ऋतुजाने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड ; प्रमाणपत्राने दोघींचा सन्मान
जिल्हाधिकाऱ्यांकडून विश्वविक्रमी बालवैज्ञानिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
गत वर्षी क्रितिका व ऋतुजाने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड ; प्रमाणपत्राने दोघींचा सन्मान
नाशिक: प्रतिनिधी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन,मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले “हायब्रीड रॉकेट मिशन मागील वर्षी पट्टीपलम्, चेन्नई येथून अंतराळात यशस्वीरित्या सोडण्यात आल्याने विश्वविक्रम झाला. सहभागी बालवैज्ञानिकांपैकी ऋतुजा काशीद व क्रितिका खांडबहाले यांचा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विश्वविक्रमी बालवैज्ञानिक कुमारी ऋतुजा विलास काशीद,कुमारी क्रितिका माधव खांडबहाले तसेच त्यांचे मार्गदर्शक डॉ.अब्दुल कलाम फाउंडेशनच्या राज्य समन्वयिका मनीषा चौधरी आणि जिल्हा समन्वयक व विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे यांचा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते तसेच, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रवीण पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह व विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पालक ऍडव्होकेट माधव खांडबहाले, विलास काशीद, एडवोकेट अरुण खांडबहाले आदी उपस्थित होते.
चौकट
गेल्या वर्षी तामिळनाडूच्या पट्टीपलममधुन १५० पिको सेटॅलाइटचे अवकाशात उड्डान झाले होते. देशातील पहिली हायब्रीड रॉकेट मोहीम यशस्वी झाली. सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पिको सेटॅलाइट विकसित केले.
त्यात नाशिक जिल्ह्यातील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गि.दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या बालवैज्ञानिक कुमारी क्रितिका माधव खांडबहाले (इ.८वी)आणि कुमारी ऋतुजा विलास काशीद(इ.९वी) या विद्यार्थिनींचा तसेच त्यांचे मार्गदर्शक विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे.या मुलींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव देशात पोहचवले असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. तामिळनाडूतील पट्टीपलम् येथून स्पेस झोनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंदा मेगलिंगम,तेलंगणा राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन तसेच इस्रोचे शास्त्रज्ञ,डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सलीम शेख,महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी,समन्वयिका मनीषा चौधरी आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशभरातील मुलांनी तयार केलेले १५० पिको उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आले होते.
कोट
गेल्या वर्षी तामिळनाडूच्या पट्टीपलममधुन १५० पिको सेटॅलाइटचे अवकाशात उड्डान झाले होते.त्यात आपल्या बाल वैज्ञानिक ऋतुजा आणि क्रितिका या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. नाशिकमध्येही पुढील काळात अधिकाधिक शास्त्रज्ञ निर्माण होऊन जिल्हयाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जातील.
बाबासाहेब पारधे
अप्पर जिल्हाधिकारी,नाशिक
कोट
विश्वविक्रमी बालवैज्ञानिकांचे यशामुळे मनोबल निश्चित वाढले आहेत. इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.पुढील काळात देखील हे अधिक जोमाने काम करतील, यात शंका नाही. या विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
– प्रवीण पाटील,
शिक्षण अधिकारी ( माध्यमिक) जि.प.नाशिक