आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी डॉ भारती पवारांविरुद्ध तक्रार ?
आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी डॉ भारती पवारांविरुद्ध तक्रार ?
भरारी पथकाचा खुलासा
चांदवड प्रतिनिधी
-दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती. मात्र सदर अधिकाऱ्यांनी भरारी पथक पाठवून तपासणी केली असता डॉ.भारती पवार यांनी कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचा खुलासा केला.
सध्या देशभर सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकांचा ऐन उन्हाळ्यात तप्तज्वर पसरला आहे. अशातच प्रत्येक उमेदवार आपण कसे सक्षम आहोत, यासाठी आपल्या कामांचा, परिचयाचा लोकांना बोध होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे. यामध्ये कधी कधी अनेक वेळा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंगही होत असतो. असाच प्रकार आज महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध निदर्शनास आला, मात्र त्यात तथ्य निघाले नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी त्यांच्या विकास कामांची पुस्तिका विनापरवानगी वाटप करत असल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे तात्काळ अधिकाऱ्यांनी भरारी पथक पाठवून सदर विकास कामांच्या पुस्तिकेची पाहणी केली असता, त्यावर मुद्रक प्रकाशक व प्रतींची संख्या छापलेली आढळून आली. लोकप्रतिनिधी कायदा कलम 127 अ नुसार अशी पुस्तिका वाटण्यासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसते. तथापि सदरचा खर्च निवडणूक खर्चात समावेश करणे आवश्यक असते. संबंधितांनी तशी लेखी ग्वाही दिली आहे. तसेच सदर माहिती सहाय्यक खर्च निरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात येईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.