धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरीजी महाराजांच्या भेटीला..
धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरीजी महाराजांच्या भेटीला..
ओझर : प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी डॉ. सुभाष भामरे नाशिक- ओझर मध्ये दाखल झाले. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्याचे विद्यमान खासदार असून आणि लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवारही आहेत.
डॉ. सुभाष भामरे यांनी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शांतिगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी ओझर येथील जनशांती धाम येथे आलो होतो. ही राजकीय भेट नाही. दर्शनासाठी मी आलो आहे.असे त्यांनी सांगितले. मात्र धुळे जिल्ह्यात शांतिगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत भक्त परिवाराचा पाठींबा मिळावा म्हणून ते शांतिगिरीजी महाराजांच्या दर्शनासाठी आले असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय जय बाबाजी परिवाराच्या आग्रहाखातर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जय बाबाजी भक्त परिवार सात लोकसभा मतदार संघात निर्णायक ठरणार असून भक्त परिवाराकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यासर्व ठिकाणी लाखोंच्या संख्येने जय बाबाजी भक्त परिवार असून महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज सांगतील त्या उमेदवाराला मतदान करण्याचा भक्त परिवाराचा निर्णय आहे.