तुकाराम गाथा ;अभंग क्र.८९३: अस्त नाही आता एकची मोहोरा…
तुकाराम गाथा ;अभंग क्र.८९३: अस्त नाही आता एकची मोहोरा…
अस्त नाही आता एकची मोहोरा
पासूनी अंधारा दुरी जालो
साक्षत्वे या जालो गुणाचा देखणा
करी नारायणा तरी खरे
आठवे विसरू पडीयेला मार्गे
आले तेचि भागे यत्न केले
तुका म्हणे माझा विनोद देवासी
आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही न हो
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या ७५१व्यां जन्म महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात शुक्रवार (दि.२२) रोजी गाथामूर्ती ह .भ .प. रामभाऊ महाराज राऊत तथा ‘श्री विठ्ठल’ यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चार चरणांच्या या अभंगावर सखोल निरूपण केले. या अभंगाचा हा भावार्थ…..
अभंगाच्या प्रास्ताविकातच तुकोबाराय ‘अस्त’ हा शब्द वापरत आहे. संसार, प्रपंच, परमार्थ यात कोणत्या गोष्टीचा अस्त होतो हे तुकोबाराय अधोरेखित करत आहेत. ज्याचा ज्याचा अस्त होतो पुन्हा त्याचा उदय कधीच होत नाही. आणि ज्याचा उदय होतो त्याचा अस्त कधीच होत नाही. संसाराचा अस्त आहे आणि परमार्थाचा उदय आहे पण या दोन्ही गोष्टी त्याच साधकाला समजू शकतील जो देह भावाविषयी उदास आहे. त्याला स्वतःला शरीराहून आपण वेगळ्या आहोत या स्थितीकडे जायचे आहे. किंबहुना तुकोबाराय ज्या स्थितीमध्ये स्वतःला पाहत आहेत ती स्थिती त्यांची देहभाव अस्त झाल्याची स्थिती आहे. आणि देह भावात जे अज्ञान आहे त्या ज्ञानापासून त्यांना ज्ञानाकडे अर्थातच प्रकाशाकडे जायचे आहे. म्हणून ते म्हणतात आता एकची मोहरा पासून अंधारा दूर झालो. परमार्थामध्ये स्थिती आणि प्रपंचामध्ये परिस्थिती महत्त्वाची आहे वैराग्य प्राप्त होणे ही देवाची कृपा आहे म्हणूनच वरील अभंगांमध्ये तुकोबाराय अध्यात्मातल्या स्थितीप्रवण अवस्थेबद्दल बोलत आहे. संसारामध्ये भगवंताची कृपा होते ज्या कृपेने सर्वसामान्य जीव सुखावतात ती कृपा तुकोबारायांना नको आहे त्यांना जी कृपा हवी आहे ती कधीही अस्त न पावण्याची कृपा हवी आहे. ज्या कृपेने साधक अवस्थेतला जिज्ञासू नेहमीच उदय अवस्थेत राहील अशी आशा ते परमेश्वराकडे करत आहे. तुकोबाराय म्हणतात धन मान आणि प्रारब्ध हे तर माणसाला स्वाभाविकपणे त्याच्या संचितांने मिळतातच मात्र याहून वेगळी जी परमार्थिक स्थिती आहे ती मात्र प्रत्येकाला प्रारब्धाने मिळत नाही तर तिची याचना करावी लागते साधना करावी लागते आणि यासाठी संतांच्या वचनावर ते ठाम आहेत. महात्म्यांची परमार्थिक स्थिती कशी कशी असावी हे एका बाजूने स्पष्ट करताना तुकोबाराय त्या स्थितीला पोहोचलेले महात्मे आहेत. पण शेवटी माणूस आहे साधक हा सदा सर्वकाळ ईश्वर कृपेच्या अधिष्ठानतच राहील हे मात्र सांगता येत नाही म्हणून स्वरूपावरची ही स्थिती कायम कशी राहील अखंड कशी राहील यासाठी तुकोबाराय प्रयत्नशील आहेत कारण संसारामध्ये भ्रामक आणि भ्रम निर्माण करणारे अनेक विषय साधकाला भेडसावत असतात .त्याचा त्याच्याशी अखंड लढा चालू असतो म्हणून ही वृत्ती सदैव तदाकार राहो, यासाठीही ते देवाकडे मागणी करत आहेत
….. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ते म्हणतात आता तर माझी स्थिती कधीही अस्त होणार नाही अशी झाली आहे अर्थातच मी ज्ञानी झालो आहे मग ते ज्ञान अंगी आल्याने माझ्यात काय परिवर्तन झाले? तर साक्षत्वे या जालो गुणाचा देखणा. ‘साक्ष’ या शब्दाला तुकोबारायांनी फार जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापरले आहे. साक्ष देणारा हा नेहमी तटस्थ असतो. साधकाचा जो गुण तुकोबारायांना अपेक्षित आहे तो साक्षीदारासारखा आहे. दृष्टांतातच सांगायचे जर झाले तर न्यायालयात साक्षीदार जेव्हा एखाद्या घडलेल्या घटनेचा वृत्तांत सांगतो त्यावेळी तो पूर्णपणे तटस्थ असतो फक्त ‘पाहिलेलं आहे ‘ या एकाच अनुभवावर तो न्यायालयाशी बोलत असतो. अर्थातच तो घटनेवेगळा असतो. नेमकं हेच तुकोबारायांना हवा आहे प्रपंचात राहून मी स्वतःला कधीही असतं न पाहणाऱ्या परमार्थिक स्थितीला प्राप्त झालो हे मी तटस्थपणे पाहतो आहे स्वतःला साक्षी ठेवून पाहतो आहे आणि त्यामुळे मी अधिक देखणा झालो आहे कारण मी शरीराचा, मी देह असल्याचा भ्रम सोडून स्वतःला साधक दशीत पूर्णपणे समर्पित केलेले आहे म्हणून मी स्वतःला एका वेगळ्या गुणाने, सौष्ठवाने, देखणेपणाने पाहतो आहे ,ही अवस्था तुकोबाराय स्वतःच्या अनुभूतीची सांगत आहेत.
तुकोबारायांच्या याच भूमिकेशी अथवा या स्थितीची परिपूर्ती आपल्याला सद्गुरु निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने मिळाली असे ज्ञानोबाराय सोळाव्या अध्याय सांगतात
मावळवीत विश्वाभासू
नवल उदयला चंडांशू
अद्वयाब्जीनिविकाशू वंदू आता
जो अविद्याराती रुसोनिया गिरी
ज्ञानाज्ञानचांदनिया जो सुदिनुकरी ज्ञानिया स्वबोधाचा
ज्ञानदेव म्हणतात विश्वाचा आभास नष्ट करणारा अद्वैत रुपी कमलिनीचा विकास करणारा सूर्य मोठ्या तेजाने उदय पावला आहे. त्याला मी वंदन करतो.
विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश आणि या ज्ञानरूप प्रकाशाचा कधीही अस्त होत नाही अर्थातच स्वतःच्या देखण्या आणि गुणवान अशा या आत्मस्थितीला तुकोबारायांनी देखणी म्हटले आहे.
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय देवाला आळवणी करत आहे की नारायणा हे सर्व खरे करून दाखव तुझ्या आशीर्वादाने ते खरे होईल मात्र मी आता देह विरहित झालेलोच आहे. तुझी कृपा तेवढी अपेक्षित आहे आता मला कशाचाही आठव येत नाही सर्व मार्ग मी विसरलो आहे जे अज्ञानरूपी अंधकाराचे होते. जे प्रयत्न करून मिळालं ते माझं भाग्य आहे. आता तुम्ही आणि मी वेगळा नाही आपण एकरूप झालो आहोत.
रामकृष्ण हरी
शब्दसंकलन :प्रा.अमर ठोंबरे